नैराश्यावर आशेची मात

0
31
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- 655, अंतरंगयोग- 241

आजच्या शिक्षणपद्धतीत इतर विषयांबरोबर अशा बोधदायक गोष्टींची फार गरज आहे. शिक्षण फक्त कर्मकांडात्मक नको. गोष्टीपासून बोध घेऊन जर प्रत्येकाने तसे आचरण केले तर नैराश्य नक्की कमी होईल.

विविध धाग्यांनी विणलेल्या मानवी जीवनात- प्रत्येक व्यक्तीला- विविध क्षेत्रांत आव्हाने येतात. मग त्यात विद्यार्थी, प्रौढ, नोकरी करणारे, व्यापारी, खेळाडू, व्यावसायिक, सैनिक… स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध… सगळेच आले! प्रत्येकाची समस्या वेगळी. त्याला सामोरे जाण्यासाठी एकच उपाय नाही, परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी पावले उचलावी लागतात. केव्हा यश तर केव्हा अपयश येते. अनेकजण निराश होतात. त्यांचे औदासिन्य वाढतच जाते.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते नैराश्य (डिप्रेशन) हा भयानक रोग विश्वाच्या सर्व थरांत अतिवेगाने पसरत आहे. याला कारणेदेखील तशीच आहेत. काहीजण थोड्याच प्रयत्नांनी यशाच्या शिखरावर पोचतात, तर अनेकजण पुष्कळ कष्ट करूनदेखील अपयशाचे भागीदार होतात. प्रत्येकाची क्रिया-प्रतिक्रिया वेगवेगळी असते.
अनेक कारणांबरोबर एक मुख्य कारण म्हणजे माणसाची अपेक्षा. शैक्षणिक क्षेत्रात या विषयावर सखोल अभ्यास, चिंतन व त्याप्रमाणे आचरण अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेकजण रोगांना बळी पडतात, तर काही व्यसनाधीन होतात. अगदी कमकुवत मनाच्या व्यक्ती आत्महत्याही करतात. कारण त्यांना सामोर काळोख, दुःखच दिसते!

शास्त्रकार म्हणूनच सांगतात की, शिक्षणाबरोबर आत्मशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाचे विविध भाव आहेत- प्रेम, विश्वास, शांती… हे सर्व आवश्यक आहेतच, पण एक गुण म्हणजे ‘आशा’ ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती कुणीही केव्हाही सोडू नये. स्वतःचे प्रयत्न चालूच ठेवावे. याच आशेवर की केव्हातरी यश येणारच. नाहीतर सगळे जीवन- स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे निरस होऊन जाते.

यासंदर्भात एक छान गोष्ट आठवते- अगदी बोधदायक- गोष्ट अशी ः
एक दिवस एका अंधाऱ्या खोलीत चार मेणबत्त्या पेटत होत्या. प्रत्येक मेणबत्ती स्वतः जळून सभोवती छान प्रकाश टाकत होती. खोली त्या प्रकाशाने अगदी उजळून गेली होती. वातावरण एकदम प्रसन्न होते. त्याचवेळी त्या खोलीत एक लहान मुलगा आला. खोलीतला उजेड पाहून अतिप्रसन्न झाला. एवढ्यात एक मेणबत्ती फडफडू लागली व लगेच विझून गेली. मुलाने विचारले तेव्हा कळले की ती ‘शांती’ची मेणबत्ती होती. ती म्हणाली, “मी शांती पसरवून काय फायदा? मानवाला शांतीची किंमतच नाही. मी मात्र जळून संपणार. सर्व विश्वात अशांतीच पसरली आहे व वाढतच आहे. प्रत्येककडे नकारात्मक घटना वाढताहेत. तंटे, भांडणे, लढाया, युद्धे… दुर्भाग्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शांती हवी. पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसत नाहीत. अपवाद आहेत, पण त्यांची शक्ती अपुरी पडते!” मुलाला हे ऐकून वाईट वाटले. पण ते सत्य होते.

एवढ्यात दुसरी मेणबत्ती मिणमिणू लागली. हळूहळू तिचा प्रकाश कमी कमी व्हायला लागला. मुलाने आश्चर्याने विचारले- “ताई, आता तुमचे काय झाले?”
ती मेणबत्ती म्हणाली, “मी विश्वासाची मेणबत्ती. हल्ली मानवा-मानवांतला विश्वास कमी होताना दिसतोय. बहुतेकजण विश्वासपात्र नाहीत. त्यामुळे विविध समस्या उद्भवतात. उलट विश्वासघात वाढताना दिसत आहे. अशा मानवासाठी मी तरी का जळू?” आणि बोलता बोलता ती विझलीदेखील. मुलगा हिरमुसला. त्याला वाईट वाटले. पण तो असमर्थ होता. तिचे सांत्वनदेखील करू शकला नाही.

काळोख वाढला. आता दोनच मेणबत्त्या राहिल्या होत्या. तो मुलगा त्याला बसलेल्या धक्क्यातून बाहेर येतच होता तेवढ्यात तिसरी मेणबत्ती मंदावू लागली. कारण विचारलं तर म्हणाली, “बाळा, मी प्रेमाची मेणबत्ती आहे. मोठ्या आनंदाने व अभिमानाने मी चोहीकडे प्रेम पसरवत होते. कारण प्रेम ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण मला दिसले की मानव आज स्वार्थी, आत्मकेंद्री झाला आहे. स्वतःचे काही साधायचे असेल तर तो वरवर प्रेमाचे नाटक करतो. त्यामुळे घटस्फोटासारख्या घटना वाढतच आहेत. अशा या दुष्ट मानवासाठी मी माझे जीवन का व्यर्थ घालवू?” आणि मुलगा काही बोलण्याआधी तीदेखील विझली. काळोख आणखीनच वाढला. मुलगा निराश झाला. तो रडू लागला.

एवढ्यात चौथी मेणबत्ती त्याला प्रेमाने म्हणाली, “बाळा, झाले ते वाईटच झाले. पण मी आहे ना तोपर्यंत काळोख होणार नाही. मी पेटतच राहणार. मी ‘आशा’ आहे. व्यक्तीला आशा असली तर ती असाध्य गोष्ट साध्य करू शकते. म्हणतात ना- ‘प्रयत्नांती परमेश्वर’, ‘प्रयत्न केले तर वाळूतूनदेखील तेल निघू शकते.’ तुझ्यासारख्या तरुणाने तर आशावादी असायला हवे. मी तुला साथ देईन. आम्ही आशेचे किरण विश्वात पसरूया. तुम्ही तरुण एक छान गीत गाता- ‘होंगे कामीयाब, मन में है विश्वास…’ हे गीत मला फार आवडते. आम्ही दोघं मिळून त्या तीन मेणबत्त्यांना पेटवूया म्हणजे विश्वात आशेमुळे शांती, विश्वास, प्रेम आपोआप नांदेल. निराश होऊ नकोस, भिऊ नकोस, आत्मविश्वास व विश्वासाहर्ता वाढव. भगवंत प्रयत्नांना महत्त्व देतो. तो यश नक्की देईल. कदाचित थोडा वेळ लागेल, उशीर होईल, पण यश हे नक्की! म्हणूनच जाणकार म्हणतात- भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं।”
तो मुलगा भावपूर्ण व आत्मविश्वासाने हसायला लागला. त्याने आपले डोळे पुसले. आशेच्या मेणबत्तीला उचलले आणि त्या तीनही मेणबत्त्या त्याने पुन्हा पेटवल्या. परत पूर्वीसारखा लख्ख प्रकाश पसरला. वातावरण आनंदी झाले.
मेणबत्त्यांची गोष्ट ऐकून बालपणी ऐकलेली एक कथा आठवली ः
एकदा म्हणे सूर्य अस्ताला जाताना त्याने मोठमोठ्यांना- विद्वानांना, श्रीमंताना, सत्ताधाऱ्यांना विचारले की, ‘मी आता अस्ताला गेल्यानंतर सगळीकडे काळोखाचे साम्राज्य पसरणार. त्यावेळी जगाला प्रकाश तुम्ही देणार ना?’ कुणीच उत्तर दिले नाही. फक्त ते म्हणाले, ‘आम्हाला कुठे वेळ आहे जगासाठी? आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत!’
त्याचवेळी एक लहानशी पणती म्हणजे- ‘सूर्यमामा, तुम्ही चिंता करू नका. मी देईन प्रकाश जगाला तुम्ही उगवेपर्यंत!’
त्या वयात त्या पणतीचे कौतुक वाटायचे. गर्भितार्थ समजत नव्हता. आता तो थोडा समजतो. गोष्टी बोधासाठी असतात.
सारांश एकच- रामायणातल्या खारीसारखा आपणदेखील आपला छोटा वाटा उचलायचा. फळाची अपेक्षा न ठेवता कार्यरत राहायचे. मानसिक व आत्मिक समाधान अवश्य मिळेल. मानवी जन्माचे सार्थक होईल.

कथेवरून कथा आठवतात. अशीच एक कथा राजाची व कोळ्याची. गुहेतील ओल्या झालेल्या भिंतीवरून कोळी परत परत खाली पडत होता. पण त्याने आशा मात्र सोडली नाही. प्रयत्न चालू ठेवले. आणि काही वेळानंतर तो वर असलेल्या त्याच्या जाळ्यापर्यंत पोचला.
अगदी अशीच गोष्ट महाराणा प्रतापची सांगितली जाते. इतरदेखील अनेक गोष्टी आहेत.
आजच्या शिक्षणपद्धतीत इतर विषयांबरोबर अशा बोधदायक गोष्टींची फार गरज आहे. शिक्षण फक्त कर्मकांडात्मक नको. गोष्टीपासून बोध घेऊन जर प्रत्येकाने तसे आचरण केले तर नैराश्य नक्की कमी होईल.
आपण तरी बोध घेऊया. आशावादी होऊया. त्यासाठी गरज आहे आत्मशक्ती वाढवण्याची व शास्त्रशुद्ध योगसाधनेची!