- – दत्ता भि. नाईक
समस्या निर्माण करायची व तिच्यावर नंतर उपाय शोधायचा यातून अमेरिका हळूहळू नैराश्याच्या मार्गाकडे जात आहे. आधुनिकीकरणाचा कोणता मार्ग स्वीकारायचा असा प्रश्न उभा राहिल्यास तो अमेरिका नव्हे! हे या घटनाक्रमांनी सिद्ध केले आहे. कर्तव्यदक्षता, समाजप्रेम, देशभक्ती यांसारख्या संस्कारांची आवश्यकता किती निकडीची आहे हे यावरून सिद्ध झाले आहे.
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्रराज्य इंग्लंडच्या साम्राज्यातून बाहेर पडणारे म्हणून मानले जाते. ४ जुलै १७७६ या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशात स्वातंत्र्यासाठी चळवळ चालवली गेली असली तरी स्वातंत्र्य शस्त्राच्या बळावरच मिळाले. फ्रेंच सेनादलांनीही अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धास मदत केली. म्हणून अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या प्रक्रियेस ‘अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध असे म्हणतात. यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यरक्षणात शस्त्रास्त्रांचे महत्त्व अमेरिकन नागरिकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर शस्त्रसज्ज राहिले पाहिजे व वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी नागरिकांनी शस्त्रसज्ज राहिले पाहिजे, ही मानसिकता अमेरिकन जनमानसामध्ये रुजलेली आहे.
‘राजाशिवाय राज्य असू शकते’ हा संदेश अमेरिकेने तत्कालीन युरोपला दिला. बदलत्या काळानुरूप राज्यघटना लिहिणारा बहुधा हा पहिला देश असावा. अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’चा नरसंहार करणार्या युरोपमधील व प्रामुख्याने इंग्लंडमधील लोकांनी वसवलेला हा देश, त्यामुळे आक्रमक व खूनशी लोकांचा नागरिकांमध्ये भरणा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या देशाच्या घटनेमध्ये प्रथम पंचवीस वर्षांमध्ये दहा घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. त्यांतील पहिली घटनादुरुस्ती व्यक्तिस्वातंत्र्यासंबंधाने होती, तर दुसरी घटनादुरुस्ती म्हणते की, स्वतंत्र देशाची आवश्यकता म्हणून नागरिकांचे शस्त्रे बाळगण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेतले जाऊ नये.
सुन्न करणारा आकडा
हा विषय आताच चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, २२ मे २०२२ रोजी अमेरिकेच्या अतिसमृद्ध अशा टेक्सास या राज्यातील युवल्डे या गावामधील एका प्राथमिक शाळेत साल्वादोर रामोस नावाच्या अठरा वर्षांच्या युवकाने केलेला अंदाधुंद गोळीबार. घरातून निघताना या युवकाने सर्वप्रथम आपल्या आजीवर गोळीबार केला व नंतर थेट जाऊन चौथीच्या वर्गातील एकोणीस छोटी मुले व त्यांच्या दोन शिक्षकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारले. हा प्रकार तब्बल दीड तास चालू होता. गुन्हेगाराला पकडण्यापेक्षा त्याच्यावर गोळीबार करूनच त्याचा काटा काढण्याची पद्धत अमेरिकेत प्रचलित आहे. अब्राहिम लिंकन व जॉन केनेडी यांच्या हत्यार्यांना गोळीनेच ठार मारले होते. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात गाजलेले खटले फारसे नाहीत. याही खेपेस पोलिसांनी तोच मार्ग पत्करला. साल्वादोर रामोस याला पकडण्याऐवजी पोलिसांनी गोळ्या झाडून त्याला तिथेच संपवून टाकले.
युवल्डे या गावात घडलेली ही घटना धक्कादायक असली तरी आश्चर्यकारक नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत व हिंसाचार करणारे बहुधा पौगंडावस्थेतील युवक आहेत. २०२२ सालच्या पहिल्या पाच महिन्यांचा अहवाल पाहता समूहात जमलेल्यांवर गोळीबार करून घडवून आणलेल्या नरसंहारात २२८ जणांचा बळी गेलेला आहे. संवेदनशील मानवी मनाला सुन्न करणारा असा हा आकडा आहे.
गन फॅक्टरीज बंद पडतील
आजच्या युगात कोणतीही गोष्ट क्षणात जगभर पसरते. गोळीबाराच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावणारे विद्यार्थी, मृत विद्यार्थी व शिक्षकांच्या समाधीसमोर पुष्पचक्रे वाहणारे नागरिक यांची छायाचित्रे सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत. नागरिकांना सरसकट बंदूक बाळगण्याचा अधिकार असावा की नाही याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. देशात वयस्क लोकसंख्येपेक्षा जास्त बंदुका नागरिकांजवळ आहेत असा सरकारचा अहवाल आहे. अमेरिकेतील उदारमतवादी लोकांना सध्या चालू असलेला बंदुका बाळगण्याचा कायदा असाच चालू राहावा असे वाटते, तर डावीकडे झुकणार्यांना संरक्षण देणे हे सरकारचे दायित्व असून व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ बंदूक बाळगण्याचा अधिकार असू नये असे वाटते. बंदूक बाळगणे याचा अर्थ स्वयंचलित बंदूक असू नये असे व्यक्तिस्वातंत्र्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. याशिवाय देशाच्या ग्रामीण व शहरीकरणापासून दूर व दुर्गम ठिकाणी राहणार्यांना अशा शस्त्रांची आवश्यकता असते असे यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत राहणार्यांना बंदूक वापरण्याचा परवाना सर्व लोकशाहीप्रधान देशांत मिळतो. आपल्याकडेही अशा व्यक्तींना बंदूक बाळगण्याचा परवाना परिस्थितीनुरूप दिला जातो. यामुळे सर्वच नागरिकांस सर्रासपणे परवाना मिळावा ही मागणी अस्थायी आहे.
सज्जन माणसाच्या हातात बंदूक दिली तर तो तिचा दुरुपयोग करणार नाही. ‘गन्स डोन्ट किल द पिपल, बट पिपल किल द पिपल’ असे काही मंडळींचे म्हणणे आहे. परंतु हे म्हणणे सार्वत्रिकपणे गैरलागू आहे. स्वातंत्र्य मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याचा दुरुपयोग करणारे लोक पदोपदी आढळतात. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य यांचाही दुरुपयोग कसा होऊ शकतो याचा आपल्याला अनुभव आहे. आपल्या संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. काही शाश्वत मूल्ये तशीच टिकून राहावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो, तर त्याचप्रमाणे कालबाह्य झालेल्या प्रथा आपण तेवढ्याच तीव्रतेने धुडकावून लावलेल्या आहेत. दोनशे वर्षांपूर्वीचा कायदा कालबाह्य झाल्यास स्वतःला आधुनिकतेचा प्रतिनिधी समजणार्या अमेरिकेने तो रद्द करावा, ही बदलत्या परिस्थितीची माफक अपेक्षा आहे. अमेरिकेत व्यापाराला खूपच महत्त्व आहे. बंदुकांच्या वापरावर बंदी आल्यास देशातील ‘गन फॅक्टरीज’ बंड पडतील म्हणून बंदूक निर्मिती करणार्यांची लॉबी प्रयत्नशील असणार. त्यामुळे अशा कोणत्याही कायद्याची अपेक्षा ठेवणे अनाठायी ठरेल.
आधुनिकीकरणाचा मार्ग कोणता?
हातात बंदूक आहे म्हणून कुणी तिचा वापर करणार नाही. आता तर वन्यपशूंची शिकार करण्यावरही बंदी आहे. सर्कशीतही पशूंचा वापर करता येत नाही. अशा परिस्थितीत बंदुकीचा वापर केवळ नरसंहारासाठीच करण्याची शक्यता वाढत आहे.
आल्फ्रेड टेनिसन या इंग्लंडच्या दरबारी कवीची ‘होम दे ब्रॉट हर वॉरियर डॅड’ या नावाची कविता अजरामर आहे. या कवितेत एक लहान मूल असलेल्या महिलेच्या युद्धात मरण पावलेल्या पतीचा देह घरी आणला जातो व त्यावेळच्या परिस्थितीचे प्रासादिक भाषेत वर्णन कवीने केले आहे. यावरून इंग्लंडच्या एकोणिसाव्या शतकातील कौटुंबिक जीवनाचे पैलू लक्षात येतात. अमेरिकेत स्थायिक झालेल्या इंग्लीश लोकांनी या संस्कारांपासून फारकत घेतलेली दिसून येते. आज अमेरिकेतील पंचवीस टक्के मुले ही ‘सिंगल पॅरंट’बरोबर राहतात. यांतील बहुतेकांचे वडील घर सोडून निघून गेलेले असतात. कौटुंबिक संस्काराला ही मुले वंचित झालेली आहेत. दुटप्पीपणा व व्यभिचार यामुळे चर्च ही संस्था डबघाईस आलेली आहे. ढासळलेली कुटुंबव्यवस्था सामाजिक बंधनांची जाणीव करून देऊ शकत नाही. मुलांना लहानाचे मोठे करताना एकल कुटुंबाची दमछाक होते. त्यातूनच शाळा-महाविद्यालये, क्रीडांगणे, क्लब यांसारख्या ठिकाणी साध्या भांडणांचे वैरामध्ये रूपांतर होत आहे. संचारमाध्यमे इतकी विकसीत झालेली आहेत की नकारात्मक गोष्टी, अश्लीलता, निर्जज्जता यांची रेलचेल आहे. परंपरेने चालून आलेल्या संस्थाव्यवस्था कालबाह्य होत चालल्या आहेत. स्मार्ट फोन व पब्जीसारखे खेळ, हिंसेला उत्तेजन देणारे व्हिडिओ गेम्स, मानसोपचारांच्या नावाखाली वापरली जाणारी आधुनिक औषधे व त्यावर अवलंबून राहण्याची वृत्ती, त्यातही औषधनिर्मिती करणार्या उद्योगांचे हितसंबंध यामुळे अतिव्यवहारवादी अमेरिका व्यवहारवादाच्या भोवर्यात सापडली आहे. एक समस्या सोडवण्याकरिता दुसरी समस्या उभी करणे अशा प्रकारच्या वृत्तीमुळे तरुण पिढी हैराण आहे.
या घटनाक्रमातून असा निष्कर्ष निघतो की, विकासाचा डोलारा उभा केल्याने समाजाचा मानसिक विकास होत नसतो. अमेरिकेत यावर चिंतन वा संशोधन होत नाही असे नाही. एकेकाळी बोकाळलेल्या ‘हिप्पी’ बनण्याच्या फॅडचे निराकरण याच समाजाने केले. अमेरिकेतून सर्वत्र पसरलेल्या ‘एचआयव्ही’वर नियंत्रण करण्यातही हा समाज बर्याच अंशी यशस्वी झाला. समस्या निर्माण करायची व तिच्यावर नंतर उपाय शोधायचा यातून हा देश हळूहळू नैराश्याच्या मार्गाकडे जात आहे. आधुनिकीकरणाचा कोणता मार्ग स्वीकारायचा असा प्रश्न उभा राहिल्यास तो अमेरिका नव्हे! हे या घटनाक्रमांनी सिद्ध केले आहे. कर्तव्यदक्षता, समाजप्रेम, देशभक्ती यांसारख्या संस्कारांची आवश्यकता किती निकडीची आहे हे यावरून सिद्ध झाले आहे.