नीतिश यांचा पलटवार

0
25

भ्रष्टाचाराचा आरोप झालेले तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत म्हणून पाच वर्षांपूर्वी महागठबंधनची साथ सोडून पुन्हा भारतीय जनता पक्षाशी संधान बांधणारे नीतिशकुमार आता भाजपाची साथ सोडून पुन्हा तेजस्वी यांना सोबत घेऊन बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता स्थापन करायला निघाले आहेत. लोकसभा निवडणूक दोन जेमतेम दीड वर्षावर आलेली असताना त्यांनी केलेले हे घूमजाव भाजपाच्या वर्मी लागणारे नक्कीच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार फोडून स्वतःचे सरकार बनवणार्‍या भाजपाला नीतिश यांनी शेरास सव्वाशेर होत धडा शिकवला आहे हे तर खरेच, परंतु आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपची समीकरणेही उलटीपालटी करून टाकणारा नीतिश यांचा हा निर्णय आहे.
नीतिश यांनी भाजपापासून फारकत घेण्याचा विचार का चालवला होता त्याचा ऊहापोह परवाच्या अग्रलेखात आम्ही केलाच आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लुडबुडीप्रतीची नाराजी हे तर त्याचे ठळक कारण आहेच, परंतु भाजपा आघाडीतून बाहेर पडून थेट आपले गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रीय जनता दल – कॉंग्रेस, – डावे पक्ष आदी सात पक्षांच्या महाआघाडीसोबत जाण्यामागील त्यांची पंतप्रधानपदाचीही महत्त्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही. विरोधी पक्षांपाशी पंतप्रधानपदाचा सर्वमान्य असा उमेदवार नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी त्या पदासाठी जी संभाव्य नावे होती, त्यावर एकवाक्यता होऊ शकली नव्हती हे तर दिसलेच आहे, अशावेळी आपली ‘सुशासन पुरूषा’ची स्वच्छ प्रतिमा घेऊन नीतिश विरोधकांच्या आघाडीवर स्वार होऊन पंतप्रधानपदाचे दावेदार व्हायला निघालेले दिसतात.
नीतिश यांच्या जाण्याने भाजपाला बिहारमध्येच नव्हे, तर संपूर्ण हिंदी भाषक पट्‌ट्यामध्ये मोठा दणका बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तेथे मित्रपक्षच उरलेला नाही. विशेष म्हणजे नीतिश यांच्याशी हातमिळवणी केल्याने जवळ आलेले अतिमागासवर्गीय आणि महादलित आता भाजपाला दुरावण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये कदाचित नरेंद्र मोदींची लोकप्रियता त्यांच्यापैकी काही घटकांना भाजपाकडे आकर्षित करील, परंतु त्यानंतर वर्षभरात होणार्‍या बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपाला ती मते मिळवण्याचे मोठे आव्हान असेल. राज्यसभेतील बहुमताचे गणितही जेडीयू दूर गेल्याने बिघडले आहे.
बिहारमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्वतःच्या जातीय मतपेढ्या आहेत. लालूप्रसादांचे राष्ट्रीय जनता दल यादव आणि मुसलमान मतांवरच राजकारणात आपले अस्तित्व टिकवून आहे. तेजस्वी यादव यांच्या कार्यकाळामध्ये राजदने तेथे नवी भरारी घेतली आहे. नीतिश यांचा संयुक्त जनता दल त्यांच्या कुर्मी आणि अन्य अतिमागासवर्गीय महादलितांच्या मतपेढीच्या जोरावरच मुसंडी मारत राहिला आहे. भाजपाची स्वीकारार्हता अजूनही उच्चवर्णियांमध्येच आहे. भाजप नेतृत्वालाही याची जाणीव आहे. म्हणूनच गेल्या काही काळामध्ये अन्य जनजातींना पक्षासोबत जोडण्याचा मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पक्षाने हाती घेतलेला होता. येणार्‍या काळात सर्व प्रादेशिक पक्ष नष्ट होतील आणि केवळ भाजपाच राहील अशी दर्पोक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांनी केल्याने सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते खवळले आहेत. नीतिश यांनाही भाजपा आपल्या पक्षाला संपवायला निघाला आहे याची प्रखर जाणीव झाल्याने ते आघाडीतून बाहेर पडले, परंतु अशावेळी बाहेर पडले आहेत की भाजपा बिहारमध्ये पुरता कोंडीत सापडला आहे. संयुक्त जनता दलावरील नीतिश यांची पकड खिळखिळी करण्याची संधीही भाजपाला तेथे लाभू शकलेली नाही. जे महाराष्ट्रात घडविता आले ते बिहारमध्ये घडू शकले नाही. त्यामुळे मुकाट सत्तेवर पाणी सोडून नीतिश यांच्या नावे ‘पलटूराम’ म्हणत बोटे मोडण्यापलीकडे त्यांच्या हाती काही राहिलेले नाही. फार तर आता ईडीचे शुक्लकाष्ट नीतिश यांच्या मागे लावले जाईल, परंतु त्यातून नुकसान भाजपाचेच असेल. आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ होणारे नीतिश त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे नावाजले गेले आहेत. सतरा वर्षे भाजपची सत्तासोबत केल्यानंतर एकदा ते बाजूला गेले होते, परंतु नंतर पुन्हा जवळ आले होते. आताही ते बाजूला झाले असले तरी पुन्हा भविष्यात भाजपाला जवळ करणारच नाहीत असे सांगता येत नाही. महागठबंधनशी त्यांचे कितपत जमेल. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला महागठबंधन कितपत साथ देईल त्यावर त्यांची त्यापुढील रणनीती असेल हे स्पष्ट आहे. २०१४ मध्ये ‘संघमुक्त भारत’ची घोषणा देणारे नीतिश त्यानंतर भाजपासोबत गेले होतेच ना!