– लाडोजी परब
हिरवा शालू नेसलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाचा चमत्कारच! परंपरा आणि निसर्गाचा अद्भुत खजिना या जिल्ह्याला लाभला आहे. इथली संस्कृती आणि परंपरा निसर्ग जतनाचा पदोपदी महान संदेश देते. निसर्गावर घाला घालणार्याला जागृत दैवत कठोर शिक्षा देतो असा दृढ विश्वास येथील समाजमनात रुजलेला. पर्यावरणरक्षण ग्रामस्थांच्या परंपरांतून आणि दंडकातून करणारा गाव कोकणात आहे. विश्वास बसत नाही? तर चला निवतीच्या अथांग निसर्गात, आणि पहा डुंगेश्वराच्या भक्तीला स्मरून ग्रामस्थ घेत असलेली शपथ. तेथील निसर्गसंपत्तीच्या वाटेला गेल्यास २४ तासांत डुंगेश्वर शिक्षा देतो, अशी शेकडो भाविकांची श्रद्धा! पर्यावरण राखून ठेवण्यासाठी मात्र ती निश्चितच फलदायी ठरते.
किल्ले निवती (ता. वेंगुर्ला) म्हटल्यावर समुद्राच्या अथांग लाटा आणि मनाला भुरळ पाडणारा निसर्ग डोळ्यासमोर आल्यावाचून राहत नाही. या किल्ल्याच्या शेजारी असलेल्या काळेभेद, जुनागड परिसरातले सौंदर्य विलोभनीय आहे. येथे भाविकांच्या हाकेला पावणार्या डुंगेश्वराची वसती आहे. येथील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, असा पूर्वापार दंडक आहे. झाडाची फांदीही तोडली तरी २४ तासांच्या आत शिक्षा ही ठरलेलीच असते. त्यामुळे येथे सावधानतेनेच जावे लागते. होडी भरकटली, तुफान वादळात बोट सापडली तर डुंगेश्वराचा धावा केला जातो. या संकटांतून वाचल्याचे अनेक दाखले येथील मच्छीमार आणि स्थानिक ग्रामस्थ देतात. आणि म्हणूनच अगाध महिमा असलेल्या डुंगेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय कुणीही भाविक येथून पुढे मार्गक्रमण करीत नाही. त्याच्या भेटीला जाण्यासाठी अरबी समुद्राचे दर्शन घेत घेत गर्द वनराईतून वाट तुडवत जावे लागते. वाटेत अनेक भगवी निशाणे आणि सर्पाच्या प्रतिकृती पाहावयास मिळतात. हे शिवाचे स्थान असल्यामुळे येथे पावित्र्य राखले जाते. चारही बाजूंनी घनदाट वनराई आणि विशेष म्हणजे या डुंगेश्वरावर वेलींचेच जणू छप्पर तयार झाले आहे. या स्थानावर ग्रामस्थांची एवढी श्रद्धा आहे की, तेथे असलेल्या नानाविध प्रकारच्या झाडांना कुणीही हात लावत नाहीत. काळेभेदच्या स्थानावर गरुड वेलपासून ते सह्याद्रीत अतिदुर्गम असलेले अमृता, पारव, आंबा, उपरसाळ, कांगणी, कारिणा, सर्पगंधा, काजरा, बिबा अशी वनौषधी गुण असलेली वनसंपदा आहे. येथे वनसंपत्तीबरोबरच सरपटणार्या प्राण्यांनाही डुंगेश्वराच्या दंडकामुळे जीवदान मिळाले आहे. डिंगोबा, गांगोबा हे दोघे भाऊ आणि त्यांची बहीण भावई समुद्रमार्गे एका देवतेच्या भेटीला जाण्यासाठी निवतीमार्गे निघाले होते. मात्र, तेथील स्थान आवडल्याने डिंगोबा निवतीलाच राहिला. तो याच किनारी स्थिरावला आणि डुंगेश्वर म्हणून स्थायिक झाल्याची आख्यायिका आहे. गांगोबा या देवतेचे मंदिर कोचरा, श्रीरामवाडी येथे आहे. भावई देवीचे मंदिर निवतीहून जवळच हाकेच्या अंतरावर आहे. डिंगोबाने मागे परतणार नसल्याचे सांगितल्याने झालेल्या वादामुळे आजही दोन भाऊ विशिष्ट दिवसाशिवाय एकत्र येत नाहीत, असे ग्रामस्थ सांगतात. गांगोबाची पालखी मिरवणूक निघाल्यानंतर कोचरा श्रीरामवाडी येथे ‘डिंगोबाचे खडक’ असे स्थान आहे. या स्थानाच्या पुढे पालखी जात नाही. येथे वनसंपत्तीचा अक्षरश: खजिना आहे. येथील झाडांना कुणीही तोडत नाही. त्यामुळेच वर्षानुवर्षे ही वनसंपत्ती आहे त्या जागी टिकून आहे. झाडे वादळाने तुटतात, मोडतात. मात्र, ती तोडली जात नाहीत. याच स्थानाशेजारी निवतीचा ओढा आहे. तो पुढे समुद्राला मिळतो. यामुळे डुंगेश्वराच्या स्थानी उजव्या बाजूला गोडे पाणी तर डाव्या बाजूला खारे पाणी पाहावयास मिळते. एका विशिष्ट दगडावर उभे राहून एका हातात खारे पाणी आणि एका हातात गोडे पाणी ओंजळीत घेऊन आपली इच्छा बोलावी, अशी येथे परंपरा आहे. समुद्रात कितीही तुफान आले, पाण्याची पातळी वाढली तरी डुंगेश्वराच्या स्थानापर्यंत ते आजतागायत कधीही पोहोचलेले नाही. या गर्द झाडीमध्ये देवाला प्रसाद देताना अन्नदान करण्याची परंपरा आहे. गोवा, महाराष्ट्रातील अनेक भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी भोजनाचा प्रसाद म्हणून आस्वाद घेताना होणारा आनंद अवर्णनीय असतो. एका बाजूला गोड पाण्याची विहीरही आहे. मच्छीमार बांधव सागराला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छीमारीसाठी बाहेर पडतात. यानंतर जाळ्यातील पहिल्याच माशाचा नैवेद्य डुंगेश्वराला दाखविला जातो. कित्येकदा येथील झाडांची तोड करण्यासाठी आलेल्या लोकांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अनंत दाखले ग्रामस्थ देतात. त्यामुळे या देवावरील श्रद्धा अधिक दृढ झाली आहे. या जागृत स्थानामुळे येथे मंदिर उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला होता. मात्र डुंगेश्वराने कौल दिला नाही. निसर्गदैवत असलेल्या डुंगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि निसर्गवेड्यांनी या स्थानाला अवश्य भेट द्यावी.
निसर्ग आणि अध्यात्म यांचा अतूट संगम आहे. अशी काही दुर्गम स्थळे कोकणात आहेत, जी संस्कृती अभ्यासकांसाठी अनेक गोष्टी शिकण्यासारखी आहेत. तेथील परंपरा आणि रीतीरिवाज भिन्न आहेत. मात्र, त्यातून बोधक विचार समाजमनात दृढ होत आहेत. अशा अद्भुत आणि अगम्य स्थळांबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. कोकणातील माणूस विलक्षण भक्तीवेडा आहे. काही ठिकाणी अंध:श्रद्धा म्हणून त्यांना हिणवण्याचे प्रकारही झाले, परंतु शेकडो लोकांना आलेले अनुभव आणि त्यातून समाजाचे नुकसान न होता, चांगलेच झाल्याचे दाखले मिळतात. डुंगेश्वराच्या स्थानाचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. डुंगेश्वर आणि येथील लोकांचा अतूट श्रद्धाभाव आहे. म्हणूनच येथील कारभार चोख, पारदर्शक चालत आलेला आहे, आणि तो निरंतर चालणार आहे.