निद्रा भाग – १

0
280
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव

रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात वापर. आणि हे लहान मुलांना लावलेल्या चुकीच्या सवयींमुळेच तर होते. बाळ जर झोपत नसेल तर त्यांना मोबाईलचा नाद लावला जातोय. मग ती मुलं बसतात दिवसरात्र मोबाईलवर गेम्स खेळत किंवा इतर गोष्टी चाळत.

निद्रा/झोप ही शरीराच्या ३ महत्त्वपूर्ण जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे. यांनाच त्रयोपस्तंभ (आहार, निद्रा व ब्रह्मचर्य) म्हणून ओळखले जाते. यांच्याच जोरावर शरीर बळकट होते व खंबीर उभे राहते व यातील एकाची कमतरता शरीराला अधोगतीला घेऊन जाण्यास समर्थ आहे. योग्यवेळी, योग्यस्थानी, योग्य स्थितीत, योग्य प्रमाणात घेतलेली निद्रा शरीराला फायदाच करते. याच्या उलट ज्यांना हे शक्य होत नाही त्यांना आरोग्य/ स्वास्थ्यासंबंधित नेहमीच काही न काही तक्रारी असतातच. शारीरिक सोबत मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडते.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार अनिद्रा/निद्रानाश यालाच इंसोम्निया असे म्हटले जाते. म्हणजेच झोप अपुरी, निकृष्ट दर्जाची होणे, झोपण्यास अडचण होणे किंवा न लागणे, ती व्यवस्थित राखण्यात कष्ट, खंडीत असणे (मध्येच जाग येणे) व त्यामुळे झोपेतून लवकर उठणे, झोप जास्त प्रमाणात येणे, झोपेत विचित्र व असामान्य वर्तन करणे यांसारख्या कित्येक समस्या असतात. झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा, भीती वाटल्यासारखे होणे (एंग्झायटी), चिंतित होणे, औदासिन्यता (डिप्रेशन) येणे, एकाग्रता बिघडणे/लक्ष न लागणे, डोकेदुखी इ. या सर्व गोष्टी तर परस्पराने आल्याच सोबत.

या सर्वांमागील मुख्य कारणे म्हणजे अमली, उत्तेजक पदार्थांचे सेवन/दुरुपयोग जसे की धूम्रपान, मद्यपान, कैफीन (कॉफी मधील घटक) इ, मनोरंजनासाठी वापरली जाणारी द्रव्ये. यासोबत कामाचे वेळापत्रक बदलणे, विशेषकरून जे शिफ्ट्समध्ये काम करतात (रात्रपाळी करतात), रोजच्या मानसिक तणावातून जाणे (अभ्यास- कामाचा व्याप, व्यवहारातील वचनबद्धता, घरातील/नातेसंबंधातील वादविवाद यासारखे).
हल्ली तर झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घेण्याची चुकीची सवयी लोकांना लागली आहे. आणि तेदेखील अनेकवेळा कुठल्याही वैद्यांच्या सल्ल्याविना. आणि जर एखादा दिवस गोळ्यांशिवाय गेला तर झोप अजिबातच येत नाही कारण आपणच आपल्या शरीराला याचे वाईट व्यसन लावलेले असते. अशा परिस्थितीत ह्या गोळ्या आपण अतिरिक्त मात्रेमध्ये सेवन करण्याची मोठी भुलचुक करतो व तिथेच फसतो. शरीरातील अवयव निकामी होण्याची शक्यता जास्त असते.

रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात वापर. आणि हे लहान मुलांना लावलेल्या चुकीच्या सवयींमुळेच तर होते. बाळ जर झोपत नसेल तर त्यांना मोबाईलचा नाद लावला जातोय. मग ती मुलं बसतात दिवसरात्र मोबाईलवर गेम्स खेळत किंवा इतर गोष्टी चाळत. काही मुले तर दिवसाची झोपतात व रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. अशाने त्यांची पूर्ण दिनचर्या बिघडते. शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस लवकर उठूनच अभ्यास करावा आणि रात्री झोपण्याच्या वेळेस झोपावे… या गोष्टीचा विसरच पडलेला दिसतो. हे काही कारणास्तव थोड्या काळासाठी चालूनही जाते पण सवय मात्र होऊ देऊ नये. म्हातारपणात शरीरातील वातदोष वाढल्यामुळे (त्यासोबतच भीती, शोक, चिंता यासुद्धा) झोप न येण्याचे प्रमाण जास्त जणांमध्ये दिसून येते.

जेथे आजूबाजूला गडबड- लोकांची वर्दळ आहे, भरपूर आवाज आहे अशा वातावरणात गाढ़ झोप येणे मुश्कील आहे. ज्यांना मानसिक आजार आहेत, काही औषधांमुळे, सततच्या दूरचित्रवाणी/संगणकाच्या वापरामुळे झोपेवर परिणाम होतो.

झोपण्याची पद्धतपण तेवढीच महत्त्वाची आहे. अस्थिर जागा, वाहनामध्ये झोपणे टाळावे. तसेच अडगळ असलेल्या जागेत (जेथे संपूर्ण शरीर व्यवस्थित पसरू शकत नाही) व्यवस्थित झोप लागणे शक्यच नाही. तरीही काही लोकांना तेथेही झोप लागतेच म्हणा. पण जर मान अकडली तर त्या वेदनेमुळे झोपेवर अनुचित परिणाम होतो. तसेच अनेक इतर व्याधी ज्यात डोकेदुखी आहे, येथे देखील झोप व्यवस्थित होणार नाही हे मात्र नक्की. दिवसा झोपल्याने अंगातील कफदोष वाढतो व प्रमेह/मधुमेह, कुष्ठ, स्थौल्य/लठ्ठपणा यासारखे आजार होतात. काही लोकांना दुपारी जेवल्यावर लगेचच किमान तासभर तरी झोप घेण्याची सवय असते. ती चुकीची आहे. बिछान्यावर लोळू नये. १०-१५ मिनिटे आरामखुर्ची/ऑफिस चेअरवर (सेमी इन्क्लाइन्ड) थोडी विश्रांती घेतली तर चालते. दुपारी जर झोपला तर रात्रीची झोप लवकर येणार नाही आणि हेच आजारांना निमंत्रण असेल.
(क्रमशः)