निदाहास चषक टीम इंडियाकडे

0
112

>> कार्तिकच्या ८ चेंडूंतील नाबाद २९ धावांमुळे भारताचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय

निदाहास टी-२० तिरंगी मालिकेतली अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार ठोकत भारताच्या विजयाची गुढी उभारली. कोलंबो येथे झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने ४ गडी राखत बांगलादेशवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला ५ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकारामुळे भारताचा विजय झाला. बांगलादेशने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते.

नाणेफेक जिंकून भारताने बांगलादेशला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. बांगलादेशकडून सब्बीर रहमान याने तिसर्‍या स्थानावर फलंदाजीस येत ५० चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची आकर्षक खेळी केली. महमुदुल्लाने १६ चेंडूंत २१ व तळाला मेहदी हसनने केवळ ७ चेंडूंत नाबाद १९ धावा जमवून बांगलादेशला १६६ धावांपर्यंत पोहोचविले. भारताकडून युजवेंद्र चहल सर्वांत प्रभावी ठरला. केवळ १८ धावा मोजून त्याने ३ गडी बाद केले. युवा वॉशिंग्टन सुंदरने आपल्या चार षटकांत केवळ २० धावा देऊन बांगलादेशच्या धावगतीला वेसण घालण्याचे काम केले. उनाडकट, शंकर व शार्दुल यांच्या गोलंदाजीवर तुटून पडत बांगलादेशी गोलंदाजांनी धावा जमवल्या.

विजयासाठी १६७ धावांची गरज असताना सलामीवीर रोहित शर्माने ४२ चेंडूंत ५६ धावांची खेळी साकारली. राहुलने १४ चेंडूंत २४ धावांची आकर्षक खेळी केली. मधल्या फळीतील मनीष पांडे (२७ चेंडूंत २८) व विजय शंकर (१९ चेंडूंत १७) यांनी संघावर दबाव टाकण्याचे काम केले. शेवटच्या ३ षटकांत विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता असताना मुस्तफिझुर रहमानने १८वे षटक निर्धाव टाकले. या षटकात लेग बाईजच्या रुपाने एक धावा मिळाली तसेच मनीष पांडेच्या रुपात एक गडीदेखील भारताला गमवावा लागला. बांगलादेशकडून रुबेल हुसेनने आपली पहिली तिन्ही षटके चांगली टाकली होती. त्यामुळे १९वे षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली. त्याने आपला पहिला चेंडू ‘यॉर्कर’ टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्तिकने ‘लो फुलटॉस’चा हा चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावला. यानंतर पुढील चेंडूवर चौकार व त्यापुढील चेंडूवर षटकार ठोकून कार्तिकने लक्ष्य अवाक्यात आणले. १९व्या षटकात भारताने २२ धावा जमवल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना शाकिबने चेंडू कामचलाऊ गोलंदाज सौम्य सरकारकडे चेंडू सोपविला. पहिला चेंडू ‘वाईड’ टाकल्यानंतर त्याने पुढील तीन चेंडूंत केवळ दोन धावा दिल्या. विजय शंकरने यानंतर चौकार लगावला व पुढील चेंडूवर तो बाद होऊन परतला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना कार्तिकने षटकार ठोकून भारताचा मालिका विजय साकार केला.
वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर तर कार्तिक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

धावफलक
बांगलादेश ः तमिम इक्बाल झे. ठाकूर गो. चहल १५, लिट्टन दास झे. रैना गो. सुंदर ११, सब्बीर रहमान त्रि. गो. उनाडकट ७७, सौम्य सरकार झे. धवन गो. चहल १, मुश्फिकुर रहीम झे. शंकर गो. चहल ९, महमुदुल्ला धावबाद २१, शाकिब अल हसन धावबाद ७, मेहदी हसन मिराझ नाबाद १९, रुबेल हुसेन त्रि. गो. उनाडकट ०, मुस्तफिझुर रहमान नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ८ बाद १६६
गोलंदाजी ः जयदेव उनाडकट ४-०-३३-२, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२०-१, युजवेंद्र चहल ४-०-१८-३, शार्दुल ठाकूर ४-०-४५-०, विजय शंकर ४-०-४८-०
भारत ः शिखर धवन झे. आरिफुल गो. शाकिब १०, रोहित शर्मा झे. महमुदुल्ला गो. नझमूल ५६, सुरेश रैना झे. रहीम गो. रुबेल ०, लोकेश राहुल झे. सब्बीर गो. रुबेल २४, मनीष पांडे झे. सब्बीर गो. मुस्तफिझुर २८, विजय शंकर झे. मेहदी हसन गो. सरकार १७, दिनेश कार्तिक नाबाद २९ (८ चेंडू, २ चौकार, ३ षटकार), वॉशिंग्टन सुंदर नाबाद ०, अवांतर ४, एकूण २० षटकांत ६ बाद १६८
गोलंदाजी ः शाकिब अल हसन ४-०-२८-१, मेहदी हसन १-०-१७-०, रुबेल हुसेन ४-०-३५-२, नझमूल इस्लाम ४-०-३२-१, मुस्तफिझुर रहमान ४-१-२१-२, सौम्य सरकार ३-०-३३-१.

नागिन डान्स
बांगलादेशच्या खेळाडूंनी यजमान खेळाडूंना डिवचण्यासाठी नागिन डान्स केला होता. त्याचा प्रत्येय कालच्या सामन्याही आला. रोहित शर्माला बाद केल्यानंतर नझमूल इस्लामने नागिन डान्स करत जल्लोष केला होता. भारताला नमवून हा डान्स करायची संधी बांगलादेशी खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना मिळाली. कार्तिकने षटकार लगावून भारताला विजयी केल्यानंतर श्रीलंकन प्रेक्षकांनी बांगलादेशी खेळाडूंना डिवचण्यासाठी नागिन डान्स केला.