नाट्यमय घडामोडीत कमलनाथ सरकार अल्पमतात

0
228

>> मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंड; समर्थक २२ आमदारांचा कॉंग्रेस पक्षाला रामराम

मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी आमदारकीचा राजिनामा देत मुख्यमंत्री कमलनाथ यांची साथ सोडल्याने त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्याचबरोबर या राज्यातील एक प्रबळ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याने काल तेथे मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजिनामा दिलेले कॉंग्रेसचे आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे निष्ठावान आहेत. या सर्व घटनांमुळे राष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कालच ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश होईल अशी शक्यता होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे शिंदे आज भाजपात प्रवेश करतील असा अंदाज आहे.

गेल्या सुमारे वर्षभरापासून ज्योतिरादित्य शिंदे अस्वस्थ होते. शेवटी काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह अन्य सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

राजिनामा दिलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये तुलसी सिलावट, गोविंद सिंग राजपूत, डॉ. प्रभूराम चौधरी, इमार्ती देवी, प्रघुम्न सिंग तोमर व महेंद्र सिंग सिसोदिया हे मंत्री असून हरदिप सिंग डांग, राज्यवर्धन सिंग, ब्रजेंद्र सिंग यादव, जसपाल जज्जी, सुरेश धाकड, जसवंत जाटव, रक्षा संत्रम सिरोनिया, मुन्नालाल गोयल, रणवीर सिंग जाटव, ओपीएस भदोरिया, कमलेश जाटव, गिरिराज धंदोटिया, रघुराज कानसाना, ऐदलसिंग कानसाना व बिसाहुलाल सिंग हे आमदार आहेत. त्यांच्याबरोबरच शिंदे यांचे निष्ठावान असलेल्या राज्य व जिल्हा पातळीवरील कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनीही राजिनामे दिले आहेत.

२२ आमदारांच्या राजिनामाम्यामुळे
विधानसभेचे संख्याबळ २०६
ज्योतिरादित्य शिंदे यांचे निष्ठावान असलेल्या २२ आमदारांचे राजीनामे सभापतींनी स्वीकारल्यास मध्य प्रदेश विधानसभेचे संख्याबळ २२८ वरून २०६ वर येणार आहे. त्यामुळे जादुई आकडा १०४ एवढा आहे. मात्र २२ जणांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ ९२ वर घसरले आहे. तर भाजपचे सध्या १०४ आमदार असल्याने त्यांचे पारडे जड आहे. कॉंग्रेसला चार अपक्ष, दोन बसप व एक सपा आमदार मिळून ७ जणांचा पाठिंबा आहे. परंतु बहुमतासाठी कॉंग्रेसला हे संख्याबळ पुरेसे नाही. तसेच त्यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे ७ जण त्यांच्यामागे राहतील की तेही भाजपमागे जातील याबाबत सांगता येत नाही.

कॉंग्रेस आमदारांना आज
छत्तीसगड/राजस्थानात नेणार
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काल घेतलेल्या विधीमंडळ बैठकीला ८८ आमदार उपस्थित होते. यावेळी उपस्थित आमदारांनी कमलनाथ यांच्यावर सर्व कॉंग्रेस आमदारांना एका ठिकाणी ठेवण्यासाठी दबाव आणला. सर्व आमदारांना एकत्र ठेवावे व जे आमदार सोडून गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी आपल्याला संधी द्यावी यासाठी आमदारांनी या बैठकीत जोर धरला. त्यामुळे आज सर्व आमदारांना छत्तीसगड किंवा राजस्थानात नेण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. भाजपविरोधात लढा देण्याचा निर्धार आमदारांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती कॉंग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी दिली. तर कॉंग्रेस नेते पी. सी. शर्मा यांनी कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक पहायला मिळेल असे सांगितले.

विधानसभेत बहुमत अजमावण्यासाठी कोणाला निर्देश देणार काय असे विचारले असता टंडन म्हणाले, ‘तूर्त मी एक प्रेक्षक आहे. भोपाळमध्ये परतल्यानंतरच सर्व बाबी पाहून टिप्पणी करून शकेन. कोणी कसले पत्र दिले आहे, कोणी तक्रारी केल्या आहेत याची शहानिशा केल्यानंतरच मी बोलेन.’

ज्योतिरादित्यांचा
भाजपप्रवेश आज शक्य
ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात प्रवेश देण्याचा कार्यक्रम आज ११ रोजी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप आपल्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणाही आज करण्याची शक्यता आहे. भाजपच्या सीईसीची बैठक काल नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र या बैठकीत राज्यसभा उमेदवार निवडीवर ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यपाल टंडन लखनौहून
परतल्यानंतर घेणार निर्णय
कमलनाथ सरकार विरोधातील राजकीय नाट्य गेल्या दोन दिवसांपासून भोपाळ, बंगळुरू व दिल्लीत सुरू असतानाच राज्यपाल लालजी टंडन हे होळी सणानिमित्त सुट्टीवर लखनौत आपल्या कुटुंबियांसमवेत आहेत. आपण मध्य प्रदेशातील विद्यमान राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि भोपाळमधील राजभवनवर आल्यानंतर आपण राजकीय नाट्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. आपण १२ मार्चपर्यंत रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.

राजिनाम्यानंतर काही मिनिटातच
ज्योतिरादित्य कॉंग्रेसमधून बडतर्फ
असंतुष्ट असलेले मध्य प्रदेशमधील गुणा मतदारसंघाचे माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यानंतर काही मिनिटातच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बडतर्फ केले. या संदर्भात कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनात ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यास कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजिनामा देण्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

१८ वर्षांनंतर ज्योतिरादित्यनी
कॉंग्रेस पक्ष सोडला

सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजिनामा पत्रात ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे असे नमूद केले आहे. कॉंग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून १८ वर्षे काम केल्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. या राजिनामा पत्रावर ९ मार्च तारीख आहे. मात्र कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार हे पत्र काल मंगळवारी दु. १२.२० वा. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर प्रत्यक्ष हातात देण्यात आले आहे.
शिंदे यांनी हे पत्र ट्विटरवरही टाकले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आपल्याला आपल्या राज्याच्या नागरिकांची तसेच देशाची सेवा करायची आहे. मात्र या (कॉंग्रेस) पक्षात राहून मी ती सेवा करू शकणार नाही अशी माझी भावना झाली आहे.