दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना
नागाळी – दोनापावल येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर चार ते पाचजणांनी दरोडा घातला. यावेळी दरोडेखोरांनी बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून तसेच, बंगल्यातील वृद्ध दाम्पत्याला पलंगाला बांधून बंगल्यातील दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेला 48 तास पूर्ण झाले तरी दरोडेखोरांचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागू शकलेला नाही. पोलिसांनी दरोडेखोरांनी पळविलेल्या ऐवजाची सविस्तर माहिती अजूनपर्यंत अधिकृतपणे जारी केलेली नाही.
बंगल्यात चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला आणि दागिने आणि रोख रक्कम लुटली. याबाबत पणजी पोलीस स्थानकावर कायद्यासंबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पोलीस खात्याचे जनसंपर्क अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
पणजी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही धागेदोरे मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. पोलीस महासंचालक आलोक कुमार, उपपोलीस महानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व इतरांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सुरक्षा रक्षकाला मारहाण, वृद्ध दाम्पत्याला बांधले
नागाळी दोनापावल येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यातील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. दरोडेखोरांनी जयप्रकाश धेंपो (77) आणि त्यांची पत्नी पद्मिनी (71) या दाम्पत्याला पलंगाला बांधून ठेवले. त्यानंतर बंगल्यातील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून त्याला मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा कान कापल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. घरात वृद्ध दाम्पत्याव्यतिरिक्त अन्य कुणीच नव्हते. रविवारी सकाळी घरकाम करणारी महिला बंगल्यावर आल्यानंतर ही दरोड्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पणजी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.