नागरिकांनी पारंपरिक जमीन राखून ठेवावी ः मुख्यमंत्री

0
65

नागरिकांनी आपली पारंपरिक जमीन राखून ठेवली पाहिजे. जमिनीच्या विक्रीमुळे कायमस्वरूपी नुकसान होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केले.
ऍडवेन्त्झ ग्रुपच्या जय किसान ऍपचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी चेअरमन सरोज कुमार पोद्दार, झुवारी ग्लोबल चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कृष्णन यांची उपस्थिती होती.
राज्यातील बर्‍याच नागरिकांकडून जमिनीची विक्री केली जात आहे. जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशातून अलिशान गाड्या व मौजमजा करण्यासाठी वापरला जात आहे. जमीन विक्रीतून मिळालेला पैसा कालांतराने संपणार आहे. जमीन शाबूत ठेवल्यास तिचा डेअरी फार्म, शेती उत्पादन घेण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून पारंपरिक जमीन लागवडीखाली आणली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सीएसआर निधीचा वापर फलोत्पादन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केला पाहिजे. सरकारकडून फलोत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारकडून जमिनीची तपासणी करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. जमीन मालकांना पीकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी सेंद्रीय खतांना प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक खतामुळे जमिनीचे नुकसान होत आहे. तसेच नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होत आहेत. झुवारी कंपनीकडून शेतकर्‍यासाठी चांगला उपक्रम राबविले जात असल्याने ऍपच्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली. कुटुंबाच्या व्यवसायामुळे झुवारीच्या खताची विक्री विद्यार्थीदशेत असताना करण्याची संधी प्राप्त झाली, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. जय किसान ऍपद्वारे शेतकर्‍यांना शेती व पूरक क्षेत्राबाबत विविध माहिती उपलब्ध केली जाणार आहे. ऍपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कृषी सेवा आणि तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येऊ शकतो. पीक लागवड, पीक पोषण, पीक संरक्षण, बियाणे, रोग-किडी निदान माती परीक्षण आदी सेवा विषयी माहिती अपॅद्वारे दिली जाणार आहे. या ऍपला दहा हजार शेतकर्‍यांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे, असे कृष्णन यांनी सांगितले. ग्रुपद्वारे युथ फॉर टुमारो २०१७ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शालेय मुलांसाठी तीन दिवसीय उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सांगता १ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, शिक्षण संचालक गजानन भट उपस्थित राहणार आहेत.