नव्या सरकारची स्थापना होळीनंतर

0
14

भाजप विधिमंडळ नेत्याची निवड तसेच नव्या सरकारची स्थापना ही होळीनंतर होणार असून केंद्राने त्यासाठी नेमलेले निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर (केंद्रीय कृषिमंत्री) व सहनिरीक्षक एल. मुरुगन (मत्स्योद्योग व पशुसंवर्धन मंत्री) हे आणखी पाच दिवसानंतरच राज्यात येणार असल्याची माहिती काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आपण पक्षाचे संघटन सचिव सतीश धोंड व गोवा प्रभारी, सी. टी. रवी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचीही माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली. यावेळी पंतप्रधान मोदी तसेच नड्डा यांनी गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल डॉ. प्रमोद सावंत व आपले अभिनंदन केल्याचे ते म्हणाले. दिल्लीत पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट होती, असे तानावडे यांनी स्पष्ट केले. गोव्यातील मतदारांनी परत एकदा भाजपला सत्ता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर भेटीच्यावेळी गोमंतकीयांचे आभार मानले.

काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजप विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्याबाबत दिल्ली भेटीत बोलणी झाली काय असे विचारले असता, त्यांनी तशी बोलणी झालेली नसून ही निवड केंद्रीय निरीक्षक होळीनंतर गोव्यात येतील तेव्हाच होणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

पक्षश्रेष्ठींनी होळीनंतर चारही राज्यात एकाचवेळी नव्या सरकारचा शपथविधी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे तानावडे यांनी सांगितले. दरम्यान, विधिमंडळ पक्षाच्या निवडीसाठी होळीनंतरच राज्यात बैठक होणार आहे.
दरम्यान, अनधिकृतरित्या मिळालेल्या माहितीनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव भाजप विधिमंडळ नेतेपदासाठी निश्‍चित झाले आहे. मात्र या वृत्ताला भाजपमधून दुजोरा मिळू शकला नाही. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक राज्यात आल्यानंतरच भाजपचा विधिमंडळ नेता ठरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्पष्ट केले.