नव्या संधींचे सूतोवाच

0
25

मोप विमानतळामुळे गोव्याला आपल्या विमानोड्डाणांच्या नकाशावर वाढीव स्थान देण्यासाठी देशातील आघाडीच्या विमान कंपन्या किती उत्सुक आहेत हे आताच दिसू लागले आहे. ‘इंडिगो एअरलाइन्स’ने गोव्याला आपले पश्‍चिम विभागातील एक महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा इरादा घोषित केला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोपवरून थेट विमानसेवा सुरू करतानाच, येथे पहिले विमान उतरवण्यातही त्यांनी आघाडी घेतली आहे. ‘गो फर्स्ट’ आणि या क्षेत्रात नव्या असलेल्या ‘आकाशा’नेही मोप विमानतळावरून देशाच्या विविध भागांत आपल्या थेट सेवा सुरू केल्या आहेत. हे प्रमाण असेच वाढते राहायला हवे. इतर विमानसेवा कंपन्याही मोप विमानतळाकडे आकृष्ट होतील, येथे आपली विभागीय केंद्रे सुरू करतील व देश विदेशांत आपली थेट विमानसेवा सुरू करतील अशी अपेक्षा आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी त्यातून गोमंतकीय होतकरू तरुणांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. दाबोळीप्रमाणेच हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि अहोरात्र उड्डाणांची येथे सोय असल्याने लवकरच येथून जगभरातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणांवरही थेट विमानोड्डाणे सुरू होतील अशी आशा करूया.
मोप विमानतळावरून देशाच्या विविध भागांत थेट विमानसेवा सुरू होणे याचा अर्थ विमानप्रवाशांना गोवा – मुंबई या सदैव व्यग्र आणि महागड्या मार्गाचा भार झेलावा न लागता स्वस्त दरात तिकिटे उपलब्ध असणे असा असायला हवा. गोवा हे आजवर एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून देश विदेशात विख्यात आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाने नवी झेप घ्यायची असेल, तर गोव्याचा हा नवा विमानतळ देशाच्या कानाकोपर्‍यांस थेट जोडला जाणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारनेही तसा आग्रह धरायला हवा. विशेषतः केंद्र सरकारच्या ‘उडाण’ योजनेखालील विमानोड्डाणे अधिकाधिक प्रमाणात येथून झाली पाहिजेत. म्हैसूरला गोव्याशी या योजनेखाली जोडण्याची घोषणा यापूर्वीच झालेली आहे, परंतु देशातील इतर दुय्यम शहरांना थेट जोडणारी विमानसेवा या योजनेखाली सुरू होऊ शकली तर गोव्याच्या पर्यटनक्षेत्राला चालना तर मिळेलच, परंतु भारतभ्रमण करणार्‍या तमाम गोमंतकीयांनाही त्याचा फायदा होईल.
गोव्याला देशविदेशातील प्रमुख स्थळांशी जोडण्यासाठी विमानकंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर राज्य सरकारने विमान इंधनावर सवलत देण्यापासून नानाविध सुविधा देण्याबाबत विचार केला पाहिजे. येत्या अर्थसंकल्पात त्यादृष्टीने घोषणा व्हावी. त्याचा खूप मोठा फायदा गोव्याला मिळू शकतो. हा विमानतळ केवळ प्रवासी आणि पर्यटक यांच्यापुरता सीमित नाही. याचा पुढचा टप्पा हा मालवाहतुकीला समोर ठेवून उभारला जाणार आहे. गोवाच नव्हे, तर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील फळफळावळ, भाजीपाला, मासळी या सगळ्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाल करण्यासाठी या विमानतळाचा पुढील काळात वापर होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी तशी घोषणा पूर्वी केली होती. तिचा योग्य पाठपुरावा राज्य सरकारला करावा लागेल.
विमानतळ नवा आहे. त्यामुळे ज्याला इंग्रजीत ‘टीथिंग प्रॉब्लेम’ म्हणतात अशा प्रारंभिक समस्या येत राहतील. विमानप्रवाशांच्या राज्यांतर्गत प्रवासाबाबत गांभीर्याने विचार न झाल्याची परिणती पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या गैरसोयीत झाली. ही बेपर्वाई अक्षम्य आहे. सुदैवाने टॅक्सींचा विषय संपुष्टात आला आहे. त्यामुळे लवकरच या विमानतळावर उतरणार्‍या प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना राज्यात सुखाने प्रवास करता येईल अशी अपेक्षा आहे. मोप विमानतळावरील उड्डाणांची संख्या सध्या मर्यादित असली, तरी येणार्‍या काळात ती कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे पणजीपर्यंतच्या मार्गावरील वाहतूकही अर्थातच वाढेल. त्यामुळे विशेषतः पर्वरी भागात गंभीर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. पर्वरीबाबत सरकारने प्राधान्याने विचार करायला हवा. पत्रादेवी पोळे महामार्गाच्या सुकूर आणि पर्वरीच्या भागाचे काम रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे अडले, नाही तर गिरीपर्यंत आलेला चौपदरी रस्ता एव्हाना अटलसेतूला जोडला गेला असता. या अतिक्रमणांवर वरवंटा फिरलाच पाहिजे. तरच येथील वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल. मॉलपासून कॅसिनोंपर्यंतचे हितसंबंध त्यासाठी सरकारला दूर सारावे लागतील. मोप विमानतळ ही गोव्याची भाग्यरेषा आहे. विमानप्रवासासाठीचे केवळ एक नवे ठिकाण एवढ्याच दृष्टीने मोपकडे गोमंतकीय पाहत नाहीत. पर्यटनाबरोबरच गोव्याच्या शेतीपासून उद्योगांपर्यंत सर्वांना याचा फायदा मिळाला पाहिजे. तरच त्यासाठी आजवर केलेला संघर्ष फळाला येईल.