नवीन साखर कारखाना ः व्यवहार्यता सल्लागाराच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा

0
270

राज्यात नवीन साखर कारखान्याची व्यवहार्यता आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी येत्या आठ दिवसांत निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा जुनाट झाल्याने यावर्षी गळीत हंगामाला कारखाना सुरू करण्यात आलेला नाही. शेतकर्‍यांचा ऊस खानापूर येथील एका साखर कारखान्यात पाठविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ६ हजार ३५० मेट्रिक टन ऊस पाठविण्यात आला आहे. राज्यातील उसाच्या कापणीच्या कामात ४२ तुकड्या गुंतलेल्या आहेत. तसेच उसाच्या वाहतुकीसाठी ४८ वाहनांचा वापर केला जात आहे. सर्व शेतकर्‍यांचा ऊस खरेदी करून कारखान्यात पाठविला जाणार आहे. उसाच्या तोडणीबाबत काही जणांकडून दिशाभूल केली जात आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

यंत्रांच्या दुरुस्तीवर व्हायचे
वार्षिक ३ कोटी खर्च
संजीवनी साखर कारखान्यातील जुनाट यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी दर वर्षी दोन-तीन कोटी रुपये खर्च करावे लागत होते. २०१९ च्या हंगामात यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ५.५० कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. दरवर्षी जुनाट यंत्रणेवर खर्च करण्यापेक्षा नवीन अद्ययावत कारखाना उभारण्यावर विचार केला जात आहे. हा कारखाना ३६५ दिवस कार्यरत राहावा असा उद्देश आहे. आत्ताचा कारखाना वर्षात केवळ ५५ ते ७५ दिवस कार्यान्वित केला जातो. नवीन कारखान्यातून साखर उत्पादनाबरोबरच इथोनेलचे उत्पादन घेण्याचा विचार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

गोव्यात परराज्यातून १५ हजार लिटर दूध
गोवा डेअरीला राज्यात आवश्यक प्रमाणात दूध उपलब्ध होत नसल्याने परराज्यातून अकरा ते पंधरा हजार लीटर दूध खरेदी करावे लागत आहे. परराज्यातून दुधाच्या खरेदीचा व्यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे. ३० रुपये लीटर दराने गोवा डेअरीला दूध देणार्‍यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी निविदेची तारीख आणखी आठ दिवसांनी वाढविण्याची तयारी आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.