Home बातम्या नवरात्र आणि माता भगवती

नवरात्र आणि माता भगवती

0

– विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे

मंगळवार १६ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री. मात्र यंदा नवरात्रोत्सव आठ दिवसांचा आला आहे. साहजिकच विजयादशमी अपहरान्हकाली आलेली आहे.

नवरात्रीचे मला नेहमीच आकर्षण आहे. जेव्हा अनाचार माजला, तेव्हा दैत्य म्हणजेच दृष्ट प्रवृत्ती शिरजोर बनल्या आणि देव म्हणजे राज्यकर्ते शक्तिहीन बनले, तेव्हा आदिमायेला म्हणजेच एका स्त्रीला शस्त्र हातात घेऊन दुष्ट प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून द्यावी लागली. स्त्री ही अबला नसून सबला आहे श्री देवी भगवतीने महिषासूरासह सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून सृष्टांना अभय मिळवून दिले. त्यासाठी श्री देवी भगवती, ती आदिमाया, तिला तामसी रूप धारण करावे लागले.

महिलावर्ग जर नवरात्रीचा खरा अर्थ समजून घेईल तर समाजातील अनेक दुष्ट प्रवृत्ती आपोआप नांगी टाकतील आणि महिलांना जीवन सुसह्य होईल. नवरात्र हा स्त्रीला अर्पण केलेला महोत्सव. म्हणून नऊ दिवसही देवी पूजनाचे. दहावा दिवस हा श्री देवीचा पराक्रमाने सालंकृत झाला म्हणून तो दसरोत्सव.

शरद ऋतू आश्‍विन महिना आणि नवरात्र या तिन्ही घटना एकाच महिन्यात येतात. तसे पाहता या महिन्याला ‘उत्सव महिना’ नाव योग्य वाटते. या महिन्याची सुरूवात घटस्थापनेने होते. नंतर पाचवा दिवस उपांग ललिता मातेचा. सातवा दिवस श्री सरस्वती पूजनाचा. नववा दिवस महानवमी, दहावा दिवस दसरा. पंधरावा दिवस कोजागिरी, नंतर गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, दीपावली आणि शेवटचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. उत्सवच उत्सव.

मात्र या महिन्याला ‘आश्‍विन’ असे नाव आहे. ज्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र आश्‍विन नक्षत्राच्या आसपास असतो, तो महिना आश्‍विन मास. पार्से येथील आई भगवतीचा कौल याच आश्‍विन पुनवेला होतो. या महिन्यात चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि पुनवेच्या रात्री भगिनी लक्ष्मीमातेच्या तेजाने तळपत असतात. घराघरात सुखसमृद्धीचे चांदणे बरसावे म्हणून. माझ्या पूर्वजांनी हा दिवस कौलासाठी निवडण्याचे त्यामुळेच औचित्य साधले.

नवरात्र हा सत्-रज-तम अशा त्रिगुण विशेषात अवतरलेल्या महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव. महाकाली हे आदिमायेचे तामसी रुप. महासरस्वती ही सात्विक तेजाची देवता, तर महालक्ष्मी हे राजस तत्त्वांचे निदर्शक.

त्रिगुणांच्या रुपातील श्री देवी भगवतीने आपल्या भक्तांना आश्‍वस्त केले आहे. की ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अनाचार माजेल, सज्जनांना सुखाने जगणे अशक्य होईल, त्या त्यावेळी मी अवतार घेऊन दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करीन. नवरात्रकालात द्वैत, दुजाभाव यांचा त्याग करावा. जगदंबा भगवती म्हणजेच जगाची आई. दैत्यनाशिनी हे तिचेच एक नाव.

आई भगवतीजवळ दृष्टीला न दिसणारा असा एक त्रिनेत्र आहे. जे जीव संकटाच्या अंधारात चाचपडत असतात, अंधाराच्या गुहेत भटकत असतात त्यांना आई भगवती आपल्या या तिसर्‍या नेत्राद्वारे योग्य मार्गदर्शन करते. आनंदाचा एक नवा प्रकाश, सुखाचा उजेड आई भगवती या नेत्राद्वारे आपल्या भक्तांना देते. मी याचा अनुभव पहिल्यांदा १८ डिसेंबर १९६१ रोजी बॉम्बस्फोटामुळे बहिरेपणा आल्यानंतर घेतलेला आहे. आज जो मी आहे, तो आई भगवतीच्या तिसर्‍या नेत्रामुळेच. नपेक्षा मनःस्वास्थ बिघडून आत्महत्याच केली असती. त्यानंतर आलेल्या अनेक कठीण प्रसंगांतूनही मला आई भगवतीने याच नेत्राद्वारे मार्ग दाखविला.

‘नमो शारदा मूळ चत्वार वाचा’ हे चौथ्या दिवसाचे वैशिष्ट्य. शारदा सरस्वती ही आपल्या वाणीवर अधिष्ठीत असून वाचाशक्ती, शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य मिळविण्यासाठी या दिवशी श्री देवीचे स्तवन करावे.

‘चतुर्थ दिनी ती चतुर्थवाणी, विस्मय होय मनी

नादरुपिणी, शब्दप्रकटिनी, शब्दांतीत ध्वनी

शब्दस्वरुपी होऊनी दिधला, भक्तादेश मनी

नमन करूया नादरंगणी

नादानंदा मनोन्मनी

पाचवा दिवस हा उपांग ललिता मातेचा.

त्रिपुरासुंदरी हे तिचे दुसरे नाव. भक्तरूप लेकरांचे लाड करते, जोपासते म्हणून प्रेमांकित जननी हे आणखी एक नाव. ती माता. सहावा दिवस हा देवीचा वज्रेश्‍वरीचा. या दिवशी देवीने वज्र धारण करून असुरांचा संहार केला. हा दिवस रिपू दमनाचा. सातव्या दिवशी आई भगवती भक्तांच्या आशाकांक्षा पूर्ण करण्याच्या रुपात प्रगटते. हा दिवस सात्विक रुपात प्रगट होण्याचा. आठवा दिवस हा कालिरुपाचा. हे तामसी रुप. याच दिवशी आई भगवतीने महिषासूराचा वध करून अखिल विश्‍वाला भयमुक्त केले.

अष्टमदिनी अष्टांग भेदूनी वधिला दैत्यमणी

महिषामर्दिनी दुर्गभेदिनी दुर्गांबाजयनी

सतत वर्षवी अमर वारुणी

भक्तांप्रिय करूनी

नमन करूया विश्‍वरुपिणी, विश्‍वेश्वर जयिनी

आई भगवती ही जयिनी म्हणजेच निरंतर जय पावणारी. तिचे दुसरे नाव विजया असेही आहे.

नववा दिवस हा आदिमायेचा विजयदिन.

नवम दिनी उत्थापन झाले

उत्सव झाला उन्मनिचा

भक्ता उठवूनी दिला प्रसाद अक्षय सहजावस्थेचा

अंतरंगी दंग होऊनी गुरूप्रसादे रमण्याचा

कृतज्ञ होऊन शरण जाऊनी उदो उदो करुया भगवतीचा. नऊ दिवस आदिमाया भगवती साजशृंगार करून भक्तांना दर्शन देते. प्रत्येक स्त्रीला नटण्याची जन्मजात सवय. आदिमाया पण अपवाद नाही. मात्र तिच्या राजस, लोभसवाण्या रुपाकडे वाईट नजरेने बघणार्‍यांचा ती महिषासूर करते. सत्व, रज आणि तम हे आपण एकाच रुपात पाहू शकतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था ती एकटीच धारण करते. कारण ती एक स्त्री आहे. कोणतीही स्त्री सर्व काही एकाहाती निभावून नेऊ शकते. म्हणूनच नवरात्र देवीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या नऊ दिवसात आई भगवती विविध नावे धारण करून लेकरांच्या कल्याणासाठी भूतलावर अवतीर्ण होते.

दुष्टजनांचा नायनाट करून जीवनाचा मार्ग निष्कंटक करणारी महालक्ष्मी (देवी भगवती) यमनियम पाळून तसेच स्वकर्तव्याचे भान ठेवून स्वतःबरोबर दुसर्‍याचाही विचार करून जगावे कसे त्याचे अचूक मार्गदर्शन करणारी महासरस्वती आणि ऐहिक वैभव, सुखसमृद्धी देणारी महालक्ष्मी परमवंद्य आहे.