नराधमांना सजा

0
281

सहा वर्षांपूर्वी गोव्याला हादरवून सोडणार्‍या दुहेरी खून खटल्यात ऑस्बान लुकास फर्नांडिस आणि रमेश बागवे या दोघा आरोपींना बाल न्यायालयाने जन्मठेपेची सजा ठोठावली आहे. आरोपी कसले, या दोघांना नराधमच म्हणायला हवे एवढा हा घृणास्पद आणि अमानुष गुन्हा आहे. जन्मठेपेची शिक्षाही अपुरी वाटावी आणि फाशीच्या सजेचा आग्रह धरला जावा अशा तीव्रतेचे हे हत्याकांड होते. ऑस्बान या कंत्राटदाराने आपल्याकडे कामाला असलेल्या मजुराला खांबाला बांधून अमानुष मारहाण केली. त्यात तो मृत्युमुखी पडला. त्याची पत्नी पोलिसांत तक्रार नोंदवील आणि आपण खुनाच्या गुन्ह्यात सापडू या भीतीने त्या मजुराच्या पत्नीला आणि दोन मुलांना गावी सोडतो असे सांगून अनमोड घाटात नेऊन तिचा काटा काढला गेला. अल्पवयीन मुलांचे गळे दाबून त्यांनाही निर्दयपणे दरीत फेकून देण्यात आले. आपल्या पत्नीला बेळगावला सोडून परतणार्‍या बोनाव्हेंचर डिसोझा यांना वाटेत रात्रीच्या अंधारात एक नग्नावस्थेतील छोटी मुलगी रस्त्याच्या कडेने रडत जाताना दिसली आणि भुताखेताच्या कल्पनांवर विश्वास न ठेवता त्यांनी माघारी फिरून तिची विचारपूस केली, त्यातून पुढे हे भयंकर दुहेरी खुनाचे प्रकरण उलगडत गेले. बोनाव्हेंचर यांचे याबाबत कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी दाखवलेले धाडस आणि माणुसकी यांचा समाजाने यथार्थ सन्मान केला पाहिजे. वाटेत ओझरत्या दिसलेल्या त्या मुलीत आपण जणू आपल्याच मुलीला पाहिले आणि असे बोनाव्हेंचर म्हणाले ते खरोखर ह्रदयस्पर्शी आहे. एकीकडे आपला गुन्हा लपवण्यासाठी राक्षसीपणाचे टोक गाठणारे हैवान कोठे आणि दुसरीकडे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या मुलीच्या मदतीला धावून जाणारा हा देवदूत कोठे! ज्याची हत्या झाली तो बिचारा एक परप्रांतीय मजूर होता. तो परप्रांतीय आहे म्हणजे त्याच्या जिवाची काही किंमतच नाही या उन्मादात कंत्राटदाराने त्या मजुराच्या संपूर्ण कुटुंबाची वासलात लावण्याचा जो काही प्रयत्न केला तो अतिशय धक्कादायक आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून दरीत फेकली गेलेली ती मुले वाचली आणि खुनाला वाचा फुटली. कुळे पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता आणि गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची सजा देण्यापर्यंत केलेला ठोस तपास प्रशंसनीय आहे. एखाद्या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांना करता आला नाही तर आपण त्यांना दोष देतो, परंतु अशा प्रकारचे गुंतागुंतीचे गुन्हे पुराव्यांचे एकेक दुवे जोडून न्यायालयात उभे करण्याचे आव्हान जेव्हा पोलीस पेलतात तेव्हा त्याचेही खुल्या मनाने कौतुक व्हायला हवे. अशा प्रकरणांत पोलिसांकडून केला जाणारा तपास हा केवळ सोपस्कार नसतो वा केवळ कर्तव्यपूर्ती नसते, त्यांच्यातल्या माणसाला आणि माणुसकीलाच ते जणू आव्हान असते. समाजाचा चांगल्या गोष्टींवरील विश्वास ते टिकवून ठेवत असतात. अनाथ मुलांना आपल्या मुलांच्या ठायी पाहून त्यांना न्याय देण्यासाठी जी प्रयत्नांची शर्थ संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी केली तीही कौतुकास्पद आहे आणि त्यांचाही त्यासाठी उचित सन्मान व्हायला हवा. बाल न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा ही खरे तर या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याची केवळ पहिली पायरी आहे. अजून या प्रकरणात प्रदीर्घ लढाई लढली जाऊ शकते. आपल्या देशामध्ये हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असे न्यायव्यवस्था मानत असल्यामुळे आपला बचाव करण्याची पुन्हा पुन्हा संधी आरोपींना मिळत असते. त्यामुळे या खटल्यातील दोघे दोषीही आपल्याला निर्दोष साबीत करण्यासाठी आटोकाट धडपडतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत या नराधमांना मोकळे सुटता येऊ नये यासाठी यापुढील न्यायालयीन टप्प्यांवरही कोणत्याही राजकीय दबाव, दडपणांची फिकीर न करता पोलिसांना मोर्चेबंदी करावी लागेल. या गुन्हेगारांना केवळ जन्मठेप नव्हे, तर फाशी व्हावी यासाठी खरे म्हणजे सरकारने आग्रह धरायला हवा. त्यांचा गुन्हाच एवढा नृशंस आणि घृणास्पद आहे. माणसे गरीब आहेत, परगावची आहेत म्हणजे त्यांना जणू जगण्याचा हक्क नाही अशा कुठल्या मस्तीत हे गुन्हेगार वावरले? हा कसला माज होता? पैशाचा की सत्तेचा? अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि नामचिन गुन्हेगारांनाही जरब बसावी अशी शिक्षा असल्या नराधमांना मिळायला हवी. दोन्ही अनाथ मुलांना बाल न्यायालयाने प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यास सरकारला फर्मावले आहे. या मुलांवर केवढा मोठा मानसिक आघात झालेला असेल आपण कल्पना करू शकतो. गेल्या सहा वर्षांत कदाचित ती सावरलीही असतील, परंतु आपल्या आईवडिलांना एका काळरात्री मुकाव्या लागलेल्या आणि त्या कटू आठवणींचा कधीही दूर न होणारा विळखा पडलेल्या या दुर्दैवी मुलांचे आयुष्य उभे राहावे यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांच्याकडे पैसे येतील तेव्हा त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही हे पाहावे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची हिंमत द्यावी. आधार द्यावा. गोव्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि माणुसकीही शिल्लक आहे हा विश्वास द्यावा.