नगरपालिका कर्मचारी संघटनेचा संप मागे

0
76

>> मागण्या पूर्ण करण्याचे मंत्र्यांचे आश्‍वासन

अखिल गोवा नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मागण्या ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन काल झालेल्या बैठकीत नगर विकासमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी दिल्याने पालिका कर्मचारी संघटनेने संप मागे घेतल्याचे संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी सांगितले.

कित्येक वर्षांपासून पालिका कर्मचार्‍यांच्या पाच प्रमुख मागण्या प्रलंबित होत्या. वारंवार निवेदने देऊनही त्या मान्य न केल्याने कर्मचारी संपावर होते. काल नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांना बैठकीस बोलावले. बैठकीला पालिका प्रशासन संचालक, पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शिरोडकर यांच्यासह सदस्य दिलीप खानापूरकर, महादेव शेटकर व इतर सदस्य उपस्थित होते. मंत्र्यांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्या. मडगाव पालिकेतील अडून राहिलेली डीपीएसी दहा वर्षे सेवेत पूर्ण झालेल्यांना वेतनश्रेणी वाढ, रोजंदारीवर काम करणार्‍यांना कायम करणे या प्रमुख मागण्या होत्या. त्यातील डीपीएसी व वेतनश्रेणीची मागणी त्वरीत मान्य करून डीपीएसी फाईलवर सही करुन मडगाव पालिकेत काल उशीरा पाठविल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.