नक्षल्यांची वळवळ

0
15

छत्तीसगढच्या दांतेवाडामधील अरानपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भीषण आयईडी स्फोटाद्वारे पुन्हा आपले अस्तित्व दाखवून दिले. देशाच्या इतर राज्यांतून नक्षलवादाची पाळेमुळे पूर्णपणे उखडली गेली आहेत, परंतु छत्तीसगढ, ओडिसा आणि झारखंड या तीन राज्यांच्या सीमा जिथे एकत्र येतात, त्या या बस्तरच्या दक्षिणेकडील सुकमा – दांतेवाडाच्या दुर्गम जंगलांत नक्षलवादी अजूनही टिकाव धरून आहेत. पूर्वीसारखे सुरक्षा दलांशी आमनेसामने हल्ले चढवण्याऐवजी अशा चोरट्या आयईडी स्फोटांद्वारे हत्या घडवण्याची नवी रणनीती त्यांनी अवलंबिली आहे. एकूण सात वाहनांच्या ताफ्यातील एक वाहन या स्फोटात उडाले. अशा प्रकारच्या हल्ल्यांत मोठी प्राणहानी होऊ नये यासाठी सुरक्षा दलांच्या वाहनांमध्ये शंभर ते दीडशे मीटरचे अंतर राखले जाते. त्यामुळेच इतर वाहनांतील जवानांचा जीव वाचला, अन्यथा या संपूर्ण ताफ्यात सत्तरच्या आसपास जवान होते व स्फोट घडवण्यासाठी प्रत्यक्षात पन्नास किलो स्फोटके वापरली गेली होती व स्फोट होताच तब्बल दहा फूट खोल खड्डा निर्माण झाला आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. सुरक्षा दलांवरील यापूर्वीच्या हल्ल्यांपासून धडा घेऊन एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात आलेले आहे. वाहनांमध्ये पुरेसे अंतर राखणे, गेलेल्या मार्गानेच परत न येणे, मोठा ताफा पाठवण्यापूर्वी रस्ता खुला करणारे पथक पाठवून स्फोटके पेरलेली नाहीत ना हे शोधणे वगैरे वगैरे नियम घालून दिले गेले आहेत. या स्फोटात सापडलेले वाहन हे भाड्याचे खासगी वाहन होते, जवान आधी गेलेल्या मार्गानेच त्यातून परतत होते आणि दुपारी दीडची वेळ असल्याने बहुधा ते गाफीलही असावेत. त्यामुळे सुरक्षा दलांकडून काही निष्काळजीपणा झाला का हेही पाहणे जरूरी असेल. घटनास्थळी दीडशे मीटर तारही सापडली. म्हणजेच वाहन येत असल्याचे पाहून दूरवरून कोणीतरी हा आयईडी स्फोट घडवला. ठार झालेले जवान हे जिल्हा सुरक्षा दलाचे आहेत. यापूर्वीच्या हल्ल्यातही त्यांनाच लक्ष्य बनवले गेले होते. त्यामुळे निमलष्करी दलांच्या तुलनेत हे जवान सॉफ्ट टार्गेट का ठरतात हे शोधले जाण्याची जरूरी आहे.
नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे आणि त्यात बऱ्यापैकी यशही आले आहे. लोकसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार नक्षलवादी घटनांत 77 टक्के घट दिसून आली आहे. या चळवळीच्या शहरी सूत्रधारांच्या नाड्या आवळल्या गेल्या, त्यांची आर्थिक रसद तोडली गेली, शिवाय ऑपरेशन ग्रीनहंटद्वारे शेजारच्या अनेक राज्यांतून नक्षलवाद्यांचा एकतर नायनाट केला गेला वा त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे ते बिथरलेले आहेत. बस्तरच्या जंगलांमध्ये मार्चपासून पानगळ सुरू होत असल्याने जंगलांत दृश्यमानता मोठी असल्याने, मार्च ते मे या काळात नक्षलवादी असे मोठे हल्ले योजतात, कारण दूरवरून हल्ला करून पळून जाणे या काळात सोपे असते. त्यामुळे सुरक्षा दलांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असते. जराशीही चूक महाग पडते हेच परवाची घटना दर्शवते आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वांत मोठा नक्षली हल्ला आहे. गेल्या पाच वर्षांत जवळजवळ 119 जवान नक्षल्यांच्या हल्ल्यांत मृत्युमुखी पडले आहेत.
या वर्षअखेर छत्तीसगढमध्ये विधानसभेची निवडणूक व्हायची आहे. त्यामुळे त्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी व आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी नक्षलवादी शक्ती यावर्षी मोठे हल्ले चढवण्याचा प्रयत्न करणारच. नक्षल्यांचा लोकशाही राजकीय व्यवस्थेवर विश्वास नसतो. छत्तीसगढमधील मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी मतदानाच्या वेळीच घातपात घडवला होता. तत्पूर्वी 2013 साली काँग्रेसचे केंद्रीय नेते विद्याचरण शुक्ला यांच्यासह स्थानिक नेतृत्वच या नक्षल्यानी घातपाती हल्ल्यात संपवून टाकले होते हे विसरता येणार नाही. त्यामुळे यंदा निवडणुकीच्या वर्षात नक्षलवादी सर्वशक्तीनिशी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा सामना करण्यासाठी अधिक ताकद लावण्याची गरज असेल. दोन वर्षांपूर्वी चारशे नक्षलवाद्यांनी एकत्र येऊन आपल्या दोन हजार जवानांवर हल्ला चढवला होता. वास्तविक, लष्कराने छत्तीसगढच्या जंगलांत आपले अनेक तळ वसवले आहेत, ज्यामुळे नक्षल्यांच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळेच आपण मागे हटलेलो नाही हे दाखवण्यासाठीच त्यांनी या कारवाया सुरू ठेवल्या आहेत. यांना शस्त्रास्त्रे, बॉम्ब बनवण्यासाठी अजूनही पैसा कुठून येतो यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. केवळ खंडणीखोरीतून एवढा पैसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ही रसद तोडली जाईल तेव्हाच नक्षल्यांचा कणा मोडता येईल.