ध्वनिप्रदूषणप्रश्नी जिल्हानिहाय संयुक्त विशेष विभाग स्थापन

0
22

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण प्रश्नी एका संयुक्त विशेष विभागाची स्थापना काल केली. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष विभागामध्ये उच्चस्तरीय सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष विभागामध्ये उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांची संबंधित जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गतवर्षीच्या सनबर्न संगीत महोत्सव आयोजनासाठी देण्यात आलेली परवानगी बेकायदा असल्याचा निवाडा देताना राज्य सरकारला सनबर्न व इतर मोठ्या महोत्सवांच्या आयोजनासाठी परवानगी देण्यासाठी विशेष विभागाची स्थापना करण्याचा आदेश दिला होता. खंडपीठाने ध्वनिप्रदूषण प्रकरणी कडक उपाययोजना करण्याचा निर्देश दिले होते.
गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सरकारने मोठे कार्यक्रम आयोजनाची परवानगी देण्यासाठी विशेष विभागाची स्थापना अखेर काल केली. या विशेष विभागामध्ये गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका न्यायदंडाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम
पाहणार आहेत.