…तर दहावी-बारावी अनुत्तीर्ण मुलांनाही सरकारी नोकरीची संधी

0
15

>> मुख्यमंत्री; आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास दहावी-बारावी उत्तीर्ण समकक्ष प्रमाणपत्र मिळणार

जे विद्यार्थी दहावी व बारावी इयत्तेत अनुत्तीर्ण होतात, त्या विद्यार्थ्यांनी नंतर आयटीआय अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला, तर त्यांचे शिक्षण हे दहावी व बारावी इयत्तेएवढे झाल्याचे गृहीत धरून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने बोलताना काल सांगितले. ते प्रमाणपत्र सरकारी नोकरीसाठी देखील उपयोगी पडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दहावी इयत्तेत अनुत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी एका वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करतील, त्यांचे शिक्षण दहावी इयत्तेएवढे झाल्याचे गृहीत धरून त्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच जे विद्यार्थी बारावी इयत्तेत अनुत्तीर्ण होतील, त्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काल पर्वरी येथील गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तीन मजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गोवा बोर्डाला पुढील 2025 साली पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच नवीन वास्तूत पूर्ण सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वास्तूतूनच पेपर तपासणी, प्रश्नपत्रिका तयार करणे यासारख्या सोयी दिल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, आमदार केदार नाईक, दाजी साळकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, उपाध्यक्ष रुपेश ठाणेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी 700 शैक्षणिक संस्थांनी नोंदणी अर्ज सादर केले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांना नजरेपुढे ठेवून सरकार शिक्षणात नवनवे बदल घडवून आणत आहे. पूर्वी बोर्डाच्या परीक्षेत केवळ 50 टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. आता निकाल 70 ते 80 टक्के एवढा लागत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा बोर्ड ही एक प्रमुख संघटना असून शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडवून आणण्यासाठी गोवा बोर्डाने शिक्षण खात्याला मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया सुलभ बनवा
बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया ही सुलभ बनवण्याचा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा बोर्डाला दिला. गोवा बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे बरेच विद्यार्थी राज्याबाहेरील बोर्डांची बाह्य परीक्षा देऊन उत्तीर्ण होतात; पण त्यासाठी त्यांना भरपूर शुल्क भरावे लागते. गोवा बोर्डानेही अशा विद्यार्थ्यांसाठी बाह्य परीक्षेची सोय करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.