ध्वजातून अशोकचक्र गायब

0
107

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताचा गौरव असणार्‍या तिरंग्यामधील अशोक चक्रच गायब करण्याचा कारनामा केला आहे. लंडनमध्ये येत्या २१ जुलैपासून महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी लंडनच्या थेम्स नदीकिनारी एका प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या १४ संघाच्या कर्णधारांची छायाचित्रे यावेळी काढण्यात आली. यात भारतीय महिला हॉकीचे नेतृत्व सांभाळणारी राणी रामपालही सहभागी झाली होती. आयोजकांनी सर्व देशांच्या झेंड्याचे प्रतीक थेम्सच्या नदी किनारी अंडाकृती आकारात ठेवले होते.

त्यावेळी भारताच्या ध्वजामध्ये अशोक चक्रच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. याचे छायाचित्र सध्या व्हायरल होत असून ‘एफआयएच’च्या या गंभीर चुकीची निंदा करण्यात येत आहे.
दरम्यान, एफआयएचच्या या चुकीवर अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.