ध्रुवीकरणास वाव

0
24

अयोध्येचा प्रश्न मार्गी लागलेला असताना काशीपाठोपाठ आता मथुरेचा वाद ऐरणीवर आला आहे. काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील शाही ईदगाहच्या जागी पूर्वी हिंदू मंदिर होते का ह्याची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे न्यायालयाची हिवाळी सुटी सुरू होण्याच्या आधी म्हणजे 18 डिसेंबरला ह्या सर्वेक्षणाची रूपरेषा ठरवली जाईल. मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीस खेटूनच औरंगजेबाच्या फर्मानावरून उभारला गेलेला शाही ईदगाह उभा आहे. हा ईदगाह उभारताना त्या जागी असलेले पुरातन मंदिर उद्ध्वस्त करूनच तो बांधला गेल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. त्यासंदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मुळात औरंगजेबाचे फर्मानच उपलब्ध आहे, ज्यात त्याने तेथील मंदिरातील मूर्ती फोडून आग्य्रातील बेगमच्या मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरण्याचे आदेश दिलेले होते. त्यामुळे जसे अयोध्येतील बाबरी ढाँचा पाडला गेल्यानंतर त्याखाली केलेल्या उत्खननात तेथे पूर्वी मंदिर होते ह्याचे भक्कम पुरावे सापडले, तसेच ह्या ईदगाहखाली पूर्वी मंदिर असल्याचे संकेत त्याच्या बांधकामात मिळतील व तिच्या भिंतींवर, पायामध्ये, खांबांमध्ये हिंदू प्रतिके असल्याचा याचिकादारांचा दावा राहिला आहे. त्यासाठीच ह्या सर्वेक्षणाची मागणी याचिकादारांनी लावून धरली आहे. औरंगजेबाने भारतामध्ये जो धर्मांध उच्छाद मांडला, त्यात त्याने काशी आणि मथुरेतील मंदिरे पाडून मशिदी उभारल्या. मथुरेत सदर ठिकाण हे कृष्णजन्मस्थान मानले गेेलेले असल्याने साहजिकच हिंदू समाजाची त्या ठिकाणाप्रती पूर्वापार आस्था आहे आणि पिढ्यानपिढ्या ती श्रद्धा कायम राहिली आहे. याच श्रद्धेपोटी वेळोवेळी राजेरजवाड्यांनी, अमीर उमरावांनी तेथे मंदिरे उभारली. ओर्छाचे राजे वीरसिंग बुंदेला यांनी इ. स. 1618 मध्ये श्रीकृष्णजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारले होते, परंतु औरंगजेबाने 1670 मध्ये ते उद्ध्वस्त केले. मोगल साम्राज्याच्या पतनाच्या काळात हा भाग मराठ्यांच्याही ताब्यात होता. महापराक्रमी महादजी शिंदे स्वतः कृष्णभक्त होते आणि राजधानी उज्जैन सोडून ते अनेकदा मथुरेला जाऊन राहात असत. त्यांचे लढवय्ये योद्धा लखबादादा लाड यांनी ह्याच भागात आपला पराक्रम दाखवला. पुढे मराठा साम्राज्याचा जोर ओसरल्यावर ब्रिटीश काळात ईस्ट इंडिया कंपनीने ही जागा बळकावली, तेव्हा बनारसच्या राजा पटनीमल नावाच्या उमरावाने ही जमीन ईस्ट इंडिया कंपनीकडून लिलावात विकत घेतली. पुढच्या काळात आपल्या दानशूरतेसाठी आणि धार्मिकतेसाठी विख्यात असलेल्या जुलगकिशोर बिर्ला शेटनी ही जमीन बनारसच्या राजा पटनीमलच्या राय किशनदास आणि आनंद दास या वारसांकडून विकत घेऊन तेथे भव्य केशवदेव मंदिर उभारले, जे आजही त्या ईदगाहला खेटून उभे आहे. ह्या मंदिराच्या जमिनीची पुन्हा कधीही विक्री होऊ नये किंवा ती तारण ठेवली जाऊ नये अशी तरतूद असलेल्या श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्टची स्थापना करून बिर्लाशेटनी तेव्हा ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा प्रयत्न केला. मात्र, मंदिर व्यवस्थापनासाठी पुढे कृष्ण जन्मस्थान सेवा संघ ही नवी व्यवस्था निर्माण करण्यात आली. येथे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ईदगाहच्या अडीच एकर जागेसह मंदिर व आजूबाजूची संपूर्ण 13.37 एकर जमीन ही श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या मालकीची आहे आणि 1968 साली जो समझोता ह्या जमिनीसंदर्भात मुसलमान समाजाशी झाला, तो मंदिराच्या व्यवस्थापनासाठी संस्थापित कृष्ण जन्मस्थान सेवासंघाने केलेला होता, त्यामुळे तो ग्राह्य नाही असा याचिकादारांचा युक्तिवाद आहे. त्यामुळेच ह्या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. न्यायालयाची मदत घेऊन कायदेशीर लढा लढला जात असल्याने याचिकादारांच्या मागणीला वैधानिक आधार मिळाला आहे आणि उद्या प्रत्यक्षात जेव्हा हे सर्वेक्षण होईल तेव्हा त्यातून तेथे पूर्वी मंदिर होते व त्यावरच ईदगाह उभारला गेला असे सज्जड पुरावे पुढे येऊ शकतात, हे जरी खरे असले, तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे असले भावनिक मुद्दे ऐरणीवर येणे हे राजकारण्यांच्या पथ्थ्यावर पडणारे आहे. धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे आपापल्या मतपेढ्या दृढ करण्यासाठी ह्या विषयाचा वापर आता सुरू होईल. पारतंत्र्याच्या आणि वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकल्या गेल्या पाहिजेत, राष्ट्रीय स्वाभिमान जपला पाहिजे ह्याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही, परंतु इतिहास आपण कुठल्या पातळीपर्यंत दुरुस्त करत राहणार, काळाचे काटे किती मागे फिरवणार आणि रोजच्या जगण्याशी संबंधित विषयांना महत्त्व देण्याऐवजी ही जुनी गाडलेली भुते किती उकरत बसणार एवढाच प्रश्न आहे.