- माधुरी रं. शे. उसगावकर
(फोंडा)
गृहस्थाश्रमात संकटांचा पाऊस बाराही महिने पडत असतो. ही संकटे दूर व्हावी म्हणून कर्मकांडं केली जातात. अनेक प्रकारच्या साधना करतात. शुद्ध, सात्विक साधना समजून घ्याव्यात. पटल्या तर अंगिकृत कराव्यात, अन्यथा जीवनात शांतीऐवजी गोंधळच निर्माण होण्याचा जास्त संभव असतो.
अनुभूती अनुभवातून जाणवतात. त्यामुळे आपले मन व त्यावरील अंकुश यांचे नियमन संतुलित होते. आपली आध्यात्मिक स्थिती आजमावता येते. अनुभूती येणे म्हणजे ध्यानमार्गातील मापदंड असे मी म्हणेन. त्यामुळे त्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. अनुभुतीतून आत्मविश्वास घडून येतो. आत्मज्ञान मिळते, आत्मबल वाढते. पण एक लक्ष्य कायम लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे नियमित वेळेत ध्यान.
जसा मानवी जीवनासाठी आवश्यक आहार-विहार असतो तसंच ध्यान हाही आपला एक दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण कार्यभाग होऊन बसणे हेही तितकेच गरजेचे. हे सरावाअंती सहज शक्य होते. एवढंच नव्हे तर नित्य कार्यभाग भावपूर्णरित्या होऊन जातो, हा माझा स्वतःचा दांडगा अनुभव आहे. याचीच अनेक उदाहरणे इतर साधकांतही पहावयास मिळतात. संतुलित विचाराने संतुलित जीवन हाच तर समर्पण ध्यानाचा गभिर्र्तार्थ आहे.
दुर्गाभाट – फोंडा येथे समर्पण व्हिडिओ शिबिराचा चौथा दिवस होता. (आठ दिवसीय शिबीर) आठ वर्षापूर्वीची अनुभूती. त्या दिवशी का कोण जाणे माझ्या मनात तीव्र इच्छा झाली की निदान आजच्या दिवशीतरी माझे यजमान व चिरंजीव यांनी शिबिरास यावे. तशी मी घरी श्रीस्वामीजींच्या चरणी इच्छा प्रकट केलीच होती. शेवटी आपल्या इच्छेनुसार घडो असे विनवून मी तो विचार डोक्यातून काढूनच टाकला. डिटॅच झाले. दुसरं माझ्या हातात होतं तरी काय? नेहमीप्रमाणे संध्याकाळी अर्धा तास अगोदर मी शिबिराच्या पूर्वतयारीसाठी गेेले. सामुहिकतेत तयारी जवळ जवळ आटोक्यात आली. एवढ्यात श्री. गावणेकर मला म्हणाले की, ‘‘तुमच्या मिस्टरांनी गुरुकार्य केले हं’’ गुरुकार्य आणि माझे मिस्टर….. माझा विश्वासच बसेना. मग कळलं की आमच्या घरुन शिबिरापर्यंत काही साधकांना त्यांनी पोचवलं. मी म्हणाले, ‘‘आज या शिबिरात हजर राहण्याची त्यांना इच्छा होवो’’. ‘‘ते रावपाचे जाल्यार हजर रावतले. कायच चिंता करप ना’’, इति श्री. गावणेकर.
अग्निमंत्र झाला. समई प्रज्वलीत झाली. गुरुआवाहन सुद्धा केलं. शिबिराला सुरुवात होणार एवढ्यात अंधुक आशेने आसनस्थ स्थितीत मागे वळून पाहते तर काय! मिस्टर मुलाच्या समवेत हजर. खरोखर हे घडून येणं म्हणजे केवढी गुरुकृपा! स्वामी म्हणतात त्याप्रमाणे मनात शुद्ध इच्छा ठेवावी पण अपेक्षापूर्तीची आस नसावी.
अशा विविध अनुभूती समर्पण ध्यानास जोडण्यापासून अनुभवता येत आहेत. कोणा ना कोणाच्या रुपात स्वामींकडून दिलासा मिळतो. ‘सद्गुरुवीण सर्वथा सद्मार्ग नसे’ हे बोधवचन माझ्या मनात खोलवर रुजले.
मागे एकदा बरेच दिवस माझ्या पोटात दुखू लागले. प्रथमोपचार केले तरी सार्थकी लागेना. ‘आज ना उद्या डॉक्टरी ट्रीटमेंट घेऊ…’ असे करून चालढकल झाली. शेवटी डॉक्टरांनी तपासणी केल्याअंती मुतखड्याचा त्रास त्यांच्या निदर्शनास आला. डॉ. म्हणाल्या, ‘लेझर करावे लागेल’ आणि त्यांनी त्यासाठी ठराविक दिवसपण निश्चित केला. म्हटलं अजून चार-पाच दिवस तर आहेत. एकेठिकाणी शिबीर चालू होते. अधिकृत माध्यम झोनल आचार्य असल्याने माझी शिबीर संचालनाची जबाबदारी होती. अर्थात सामुहिकतेच्या सहकार्यातच. या कार्यात चार-पाच दिवस कधीच सरले. नंतर डॉक्टरांकडे मी गेले. चिकित्सा होत होती. मी जरा तणावग्रस्त होते. एवढ्यात ‘मुतखडा वगैरे काही नाही, लेझरची आवश्यकता नाही’ असे डॉ. हसत म्हणाल्या. हे ऐकताच कोणत्या पेशंटला आनंद होणार नाही? क्षणार्धात स्वामींची सस्मित सूक्ष्मरुपी मूर्ती माझ्या अंतःचक्षूंसमोर झळकली आणि मनोमन मी त्यांचे गदगदून आभार मानले. यानंतर शिबीर संपन्न झाले आणि माझ्याकडून चैतन्याभुतीतून अनुष्ठानही पूर्ण झाले. अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी मी अनुभूती सत्रात अनुभूती कथन केली व फळनिष्पत्तीचे रहस्य हे असं असतं याचा प्रत्यय मला आला. ‘सद्गुरु कृपेविण काही भवतरणोपाय नाही!’
पावसाळ्यात पाऊस चार महिने पडतो. परंतु गृहस्थाश्रमात संकटांचा पाऊस बाराही महिने पडत असतो. ही संकटे दूर व्हावी म्हणून कर्मकांडं केली जातात. अनेक प्रकारच्या साधना करतात. शुद्ध, सात्विक साधना समजून घ्याव्यात. पटल्या तर अंगिकृत कराव्यात, अन्यथा जीवनात शांतीऐवजी गोंधळच निर्माण होण्याचा जास्त संभव असतो. अंधारात चाचपडत रहावे लागते आणि याचा दोष नाहक सद्गुरूंना दिला जातो. सत्यासत्यतेचा पडताळा जरुर करावा. दुसर्याच्या सांगण्यावरून त्यावर विश्वास ठेवणे अथवा कोणत्याही परीक्षणाशिवाय ते स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धेला आवाहन केल्यासारखेच ना? समर्पण ध्यानमार्ग हा सुखप्राप्तीची वाट चुकलेल्या पांथस्थांचा दीपस्तंभच आहे.
शत शत प्रणाम बाबा स्वामी शतशत प्रणाम|
ईश्वराने दिया जीवन और तुमने दिया ज्ञान॥