धेंपो, साळगावकर ‘एफसी गोवा’तून बाहेर

0
88

आयएसएल अपील्स कमिटीने काल धेंपो स्पोटर्‌‌स क्लब व साळगावकर स्पोर्टस् क्लब यांना ५ मे २०१६ रोजी आयएसएल रेग्युलेटरी कमिटीने ठोठावलेल्या दंडातून दिलासा देणारा निवाडा दिला असतानाच गोव्याच्या उभय दिग्गज क्लबांनी एफसी गोवा फ्रँचायजीमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

धेंपो स्पोर्टस् क्लबचे मालक श्रीनिवास व्ही. धेंपो व साळगावकर स्पोर्टस् क्लबचे मालक दत्तराज व्ही. साळगावकर यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे प्रसारमाध्यमांना आपल्या वरील निर्णयाची माहिती दिली आहे. आयएसएल रेग्युलेटरी कमिटीने ५ मे २०१६ रोजी एका आदेशाद्वारे धेंपो व साळगावकर यांच्यावर आयएसएलमध्ये बंदीबरोबरच १५ गुण डॉकिंग व १० कोटी रुपयांचा दंड केला
होता. उभय क्लबानी या आदेशाला आयएसएल अपील्स कमिटीसमोर आव्हान दिले होते. त्यावर काल या कमिटीने निवाडा देताना उभय क्लबांवरील बंदी मागे घेतली. तसेच गुणांचा दंडही शून्यावर आणला व दंडाची रक्कम १० कोटींवरून ६ कोटी रुपयांवर आणली. मात्र अपील्स कमिटीच्या निवाड्या पाठोपाठ उभय क्लबांनी एफसी गोवा फ्रँचायजीमधून बाहेर पडण्याचा आपला निर्णयही जाहीर केला. या संदर्भातील या क्लबांच्या निवेदनात म्हटले आहे, ‘आमच्या कुटुंबांनी पाच दशकांहून अधिक काळ फुटबॉलला पाठबळ दिले आहे आणि त्यातूनच आम्ही आयएसएलला आमचे सहकार्य दिले. फुटबॉलप्रती आमच्या निस्सिम प्रेमापोटी आम्ही आयएसएलमध्ये गुंतवणूक केली. फुटबॉलच्या क्षीतिजावर आम्हाला गोव्याला अग्रस्थान द्यायचे होते. आम्ही योग्य चैतन्य व संस्कृतीसह एफसी गोवाची निर्मिती केली आणि फुटबॉल परंपरेनुसार सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. एफसी गोवा या ब्रँडने गोव्यात एकतेची वातावरणनिर्मिती केली.’
निवेदनात पुढे म्हटले आहे की २० डिसेंबर २०१६ च्या अंतिम लढतीनंतरच्या आपल्या कृतीविषयी खेद व्यक्त करणारे चेन्नईयन एफसीच्या इलानो ब्लूमर याच्या निवेदनाची प्रत आम्हाला मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमचे असंख्य चाहते आणि संघ यांच्या हिताचा विचार करून अत्यंत दु:खदपणे एफसी गोवामधून बाहेर पडण्याचा वेदनादायक निर्णय आम्ही घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सर्वांचे आभार
चांगल्या व खराब प्रसंगीही नेहमी आम्हाला पाठबळ दिल्याबद्दल आम्ही एफसी गोवाचे तमाम चाहते यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानतो असे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर एफसी गोवाचे खेळाडू, कोच झिको यांच्याप्रमाणेच एफसी गोवाचे अन्य सहमालक विराट कोटली, वेणू गोपाल धूत आणि गोवा सरकारचेही आभार मानले आहेत.