धेंपोचे कळंगुटवर चार गोल

0
135

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवताना काल शुक्रवारी कळंगुट असोसिएशनला ४-० असे तुडवले. गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील हा सामना म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. अल्बर गोन्साल्विस याने दोन तर पेद्रू गोन्साल्विस व बीवन डिमेलो यांनी प्रत्येकी एक गोल केला. कळंगुटच्या सिद्धांत शिरोडकर व मारिओ मास्कारेन्हस यांनी मिळालेल्या संधी वाया घालवल्या. दुसरीकडे धेंपोचा पहिला प्रयत्नदेखील यशस्वी होऊ शकला नाही. अल्बर गोन्साल्विसच्या क्रॉसवर ज्योकिम अब्रांचिस याने लगावलेला हेडर दिशाहीन ठरला. यानंतर काही मिनिटांतच अब्रांचिसला अजून एक संधी लाभली. अल्बरने रजतकडे चेंडू पास दिल्यानंतर रजतने प्रसंगावधान राखून चेंडू अब्रांचिसकडे सोपविला.

पण, अब्रांचिसने अल्बर-रजतच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम केले. ही संधी हुकलेली असतानाच निक्सन कास्तानाच्या क्रॉसवर अल्बरने लगावलेला हेडर थोडक्यात हुकल्याने कळंगुटने सुस्कारा सोडला. परंतु, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. २७व्या मिनिटाला पेद्रूने गोलरक्षक आपल्या नियोजित जागेवर नसल्याचे हेरून २५ यार्ड अंतरावरून जोरदार फटका लगावत चेंडूला गोलजाळीत मारले. या गोलमुळे धेंपोने १-० अशी आघाडी घेतली. कळंगुटला यानंतर गोल नोंदविण्याची संधी चालून आली होती. पण, सिद्धांतने लगावलेला फटका धेंपोच्या खेळाडूला लागल्याने चेंडूंची गती मंदावली व धेंपोच्या गोलरक्षक आग्नेलो याने तो सहज अडविला. मध्यंतरापर्यंत ‘गोल्डन ईगल्स’ धेंपो १-० असे आघाडीवर होते.

दुसर्‍या सत्रात धेंपोने आक्रमक धोरण अवलंबले. कळंगुटचा गोलरक्षक बुडगे याच्या कमकुवत पकडीचा लाभ उठवत अल्बरने धेंपोची आघाडी २-० अशी फुगवली. अनेक संधी वाया घालवल्यानंतर बीवन डिमेलोने ७२व्या मिनिटाला गोल करत धेंपोला ३-० असे पुढे नेले. अल्बर फर्नांडिस याने यानंतर स्वतःचा दुसरा व संघाचा चौथा गोल लगावला.