धेंपोची घोडदौड खंडीत

0
67

स्पोर्टिंग क्लब दी गोवाने धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या स्वप्नवत वाटचालीला ब्रेक लगावताना काल गुरुवारी गोवा प्रो लीग स्पर्धेतील सामन्यात त्यांच्यावर १-० असा विजय मिळविला. धुळेर मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत नायजेरियाचा आघाडीपटू अबियोला याने ६३व्या मिनिटाला विजयी गोल नोंदविला. या विजयासह स्पोर्टिंगने ४ सामन्यांतून १० गुण घेत पहिला क्रमांक मिळविला आहे. ९ गुणांसह धेंपोची दुसर्‍या स्थानी घसरण झाली आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून स्पोर्टिंगने आघाडीचा प्रयत्न केला. त्यांच्या मारुस मास्कारेन्हस, वितोरिनो फर्नांडिस व नायजेरियन स्ट्रायकर अबियोला अफुवापे यांनी गोल नोंदविण्याच्या संधी गमावल्या. धेंपोचा गोलरक्षक आग्नेलो गोम्स याने अप्रतिम गोलरक्षणाचे दर्शन घडवत स्पोर्टिंगच्या आघाडीपटूंना थोपवून धरले. दुसरीकडे धेंपोने स्ट्रायकर बीवन डिमेलोकरवी आक्रमणाचे सूत्र अवलंबले.

याचा फायदा त्यांना जवळपास झाला होता. परंतु, मारियो मास्कारेन्हसच्या क्रॉसवर बीवनने लगावलेला हेडर काही इंचांनी हुकला. पहिल्या सत्रात स्पोर्टिंगने वर्चस्व गाजवले असले तरी दुसर्‍या सत्रात धेंपोने संधी निर्माण केल्या. कपील होबळेच्या अचूक क्रॉसवर बीवन नियंत्रण मिळवू न शकल्याने या सत्राच्या प्रारंभीच धेंपोला आघाडीची संधी गमवावी लागली. धेंपोचा संघ आक्रमणावर भर देत असताना स्पोर्टिंगने बचावात्मक पवित्रा घेत संधीचा वाट पाहिली. याचा लाभ त्यांना ६३व्या मिनिटाला झाला. विक्टोरिनोच्या पासवर अबियोलाने धेंपोचा चपळ गोलरक्षक आग्नेेलोचा बचाव भेदत सामन्यातील गोल्डन गोल केला. धेंपाने यानंतर बरोबरीचे प्रयत्न केले. परंतु, स्पोर्टिंगने आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.