Home बातम्या धेंपोचा विजयी शुभारंभ

धेंपोचा विजयी शुभारंभ

0
धेंपोचा विजयी शुभारंभ

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने पिछाडीवरून दोनदा दमदार पुनरागमन करताना वास्को स्पोटर्‌‌स क्लबवर ३-२ अशी मात करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली.
धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात वास्कोने पहिल्या सत्रात १६व्या मिनिटाा बेनेस्टन बार्रेटोने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर १ -० अशी आघाडी घेतली होती. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी मारिओ मस्कारेन्हासने धेंपोला (५८वे मिनिट) बरोबरी साधून दिली. ६८व्या मिनिटाला मिनेश कुंकळ्ळीकरने वास्कोला १-२ अशा आघाडीवर नेले. तर नंतर बीवन डिमेलोने दोन गोल नोंदवित धेंपोला पूर्ण गुणांची कमाई करून दिली.

धेंपोने प्रारंभीच धोकादायक चाल रचली होती. परंतु बीवन डिमेलोने घेतलेला जोरकस फटका वास्कोचा बचावपटू ट्रेयसन डिकॉस्ताच्या पायाला लागून कॉर्नरकिकसाठी गेला. १६व्या मिनिटाला वास्कोने आपले खाते खोलले. उजव्या विंगेतून क्लाइव कुयेल्होने दिलेल्या अचूक पासवर बेनेस्टन बार्रेटोने गोल नोंदवित वास्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या सत्रात मारिओ मस्कारेन्हासने थेट फ्री-किकवर वास्कोच्या गोलरक्षकाला चकवित ५८व्या मिनिटाला धेंपोने १-१ अशी बरोबरी साधली. ६८व्या मिनिटाला मिकी फर्नांडिसने ३० यार्डवरून घेतलेल्या फ्रीकिकवर मिनेश कुंकळ्ळीकरने हेडरद्वारे चेंडूला जाळीची दिशा दाखवित वास्कोला पुन्ह १ -२ अशा आघाडीवर नेले. ८२व्या मिनिटाला योगेश कदमच्या क्रॉसवर वास्कोच्या गोलरक्षकाला चेंडू अचूकपणे थोपविता आला नाही आणि डी कक्षेत खुल्या असलेल्या बीवन डिमेलोने चेेंडू जाळीत सारत धेंपोला २ -२ अशा बरोबरीवर नेले. लगेच दोन मिनिटानंतर वास्कोच्या ट्रेसन डिमेलोने जयसन वाझला डी कक्षेत धोकादायकरित्या खाली पाडल्याने रेफ्रीने धेंपोला पेनल्टी बहाल केली. आणि त्यावर कोणतीही चूक न करता बीवनने स्वतःचा दुसरा व धेंपोच्या ३ -२ अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा तिसरा गोल नोंदविला.आज या स्पर्धेत कळंगुट असोसिएशन आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यात सामना होणार आहे.