खाण व भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे-सोनाळ या ठिकाणी बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून सुमारे 10 लाखांची यंत्रसामुग्री जप्त केली. तसेच 10 कामगारांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी रामा खरवत (रा. धावे-तार, सत्तरी) आणि निलेश राणे (रा. सोनाळ सत्तरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या जमिनीमध्ये हा चिरेखणीचा व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू होता, त्या जमीनमालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चिरेखाण रामा खरवत हा चालवत असल्याची माहिती उघडकीस आली. या चिरेखाणीतून दिवसाला हजारो चिरे उत्खनन करण्यात येत होते. तसेच गेल्या पाच वर्षांपासून येथे चिरेखाणीचा व्यवसाय सुरू होता.