धान्य घोटाळ्यातील संशयितांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

0
9

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या स्वस्त धान्य घोटाळाप्रकरणातील मुख्य संशयित सचिन नाईक बोरकर आणि संशयित वीरेंद्र म्हार्दोळकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सोमवार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी कुंडई, बोरी, कुर्टी-फोंडा येथे छापे घालून स्वस्त धान्य दुकांनात वितरणासाठी देण्यात आलेले सुमारे सात लाख रुपयांचे तांदुळ आणि गहू जप्त केले. या प्रकरणात आत्तापर्यंत पाचजणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन नाईक बोरकर आणि वीरेंद्र म्हार्दोळकर फरारी असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने धान्य घोटाळ्यातील दोन्ही संशयितांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी सचिन बोरकर याची कसून चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची देण्याची गरज आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.