धान्य घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी

0
10

>> कॉंग्रेसची मागणी; भाजप सरकार अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील

नागरी पुरवठा खात्यात झालेल्या तांदुळ व गव्हाच्या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काल कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत केली. काल झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ही मागणी केली.

कॉंग्रेस पक्ष ह्या धान्य घोटाळ्याबरोबरच बेरोजगारी, म्हादईचा प्रश्‍न, वैद्यकीय आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती यांच्यावर झालेला अन्याय, खाण व्यवसाय सुरू करण्यात सरकारला आलेले अपयश हे सर्व प्रश्‍न कॉंग्रेस पक्ष राज्यपालांसमोर मांडणार असल्याचे आलेमाव यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील असून, हे सरकार सर्व क्षेत्रात अपयश ठरल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.
राज्य सरकारने अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची गेल्या दोन वर्षांत जी खरेदी व वितरण केले आहे, त्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आम्ही हे सर्व प्रश्‍न राज्यपालांसमोर मांडणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

फुटीरांविरोधात लवकरच याचिका
कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी सभापतींसमोर दाखल करण्यासाठी तयार केलेल्या याचिकेवरही बैठकीत चर्चा झाल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले. दरम्यान, ही याचिका लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.