येत्या आठवड्यात भरारी पथकांची स्थापना

0
16

>> धान्य घोटाळा : नागरी पुरवठा संचालकांची माहिती

नागरी पुरवठा खात्याची धान्य गोदाम आणि स्वस्त धान्य दुकानांतील धान्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची पुढील आठवड्यात स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी काल दिली.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने राज्यातील स्वस्त धान्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता नागरी पुरवठा खात्याला जाग आली आहे. तसेच मंत्री रवी नाईक यांनी नागरी पुरवठा खात्याची धान्य गोदामे आणि स्वस्त धान्य दुकानांतील धान्याच्या तपासणीसाठी भरारी पथक नियुक्त करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

राज्यात स्वस्त धान्य दुकाने आणि गोदामांमधील धान्याच्या तपासणीसाठी भरारी पथक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासंबंधीचा आदेश पुढील आठवड्यात जारी केला जाणार आहे, असे गोपाळ पार्सेकर यांनी सांगितले.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनकार्डधारकांना धान्य वितरणासाठी दोन दिवस बायोमेट्रिक यंत्राचा वापर न करण्याची दिलेली सवलत देखील मागील जुलै महिन्यापासून बंद करण्यात आली आहे, असेही पार्सेकर यांनी सांगितले.

नागरी पुरवठा खात्याच्या सर्व धान्य गोदामांमधील कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तथापि, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले आहे. याबाबत माहिती देताना, खात्याच्या धान्य गोदामांमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या स्थितीबाबत अहवाल मागविण्यात आला आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधील धान्याचा साठा योग्य आहे. त्यामुळे सरकारी गोदाम सीलबंद करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सांगितले.

अटकपूर्व जामिनावरील सुनावणी तहकूब
स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिन नाईक बोरकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. आता, या प्रकरणातील दोघाही संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे.

जीपीएस यंत्रणेचा वापर शक्य
नागरी पुरवठा खात्याकडून गोदाम आणि स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात येणार्‍या धान्य वितरणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोदामातील धान्याच्या वाहतुकीसाठी यापुढे जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांचा वापर करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. तसेच, स्वस्त धान्य दुकानांत सुध्दा जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांतूनच धान्य पोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या, स्वस्त धान्य दुकानदारांना भाड्याच्या वाहनातून धान्य कोटा न्यावा लागत आहे.