धर्मेश सगलानी यांना अटक

0
21

>> खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा अन्वेषणची कारवाई

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने खंडणी प्रकरणी कॉंग्रेसचे नेते तथा साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना काल अटक केली. या प्रकरणात गुंतलेल्या अन्य संशयितांनाही अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या कथित खंडणी प्रकरणी आगशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा अन्वेषण विभागाकडे सदर कथित खंडणी प्रकरण पुढील तपासासाठी सोपविण्यात आले होते. गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपास अधिकार्‍यांनी धर्मेश सगलानी यांना सोमवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांना रितसर अटक करण्यात आली.
मूळचा फरिदाबाद, हरयाणा येथील आणि सध्या पर्वरी येथे राहणार्‍या अंकित जजोडिया यांनी आगशी पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. धर्मेश सगलानी यांच्यासह पाच जणांनी बांबोळी येथील एका बंगल्यात आपल्याला कोंडून ठेवून जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी नोंदवली आहे.

धर्मेश संगलानी यांच्यासह राजेश कुमार, शंशाक सिंग आणि मनिष जैन आणि बाऊन्सरांनी आपल्याला १७ डिसेंबर २०२१ रोजी मनिष जैन याच्या बांबोळी येथील बंगल्याच्या खोलीत कोंडून ठेवून ५० लाख रुपयांची मागणी केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी सगलानी यांच्यासह इतर संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.