धरणांत 50 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

0
12

>> जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती; गरज भासल्यास खाण खंदकांतील पाण्याचा उपसा करणार

राज्यातील धरणांमध्ये आगामी 50 दिवस पुरेल एवढेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. गरज भासल्यास खाण खंदकांतील पाणी उपसण्याची तयारी सरकारने ठेवली आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली. दुसऱ्या बाजूला ‘स्कायमेट’ खासगी हवामान संस्थेने पुढील चार आठवडे मान्सून कमकुवत राहील, असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचे आगमन होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी शेतीची कामे तर खोळंबलेली आहेच, त्याचबरोबर धरणांतील पाणीही आटत चालल्याने पाणीटंचाईचे संकटही गहिरे झाले आहे.

आतापर्यंत मोऊस पाऊस कमी प्रमाणात कोसळल्याने पाण्याच्या प्रश्नावर गंभीरपणे विचार केला जात आहे. राज्यातील साळावली, आमठाणे, चापोली, गावणे येथील धरणामध्ये आत्तापर्यंत पाण्याचा साठा चांगला आहे. त्यामुळे आगामी 50 दिवस पुरेल एवढे पाणी उपलब्ध आहे. आमठाणे धरणाला तिळारीमधून पाण्याचा पुरवठा होत आहे. ओपा जलप्रक्रिया प्रकल्पातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जात आहे. ओपा नदीतील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी गरज भासल्यास खाण खंदकातील पाणी पंप बसवून खेचण्याची तयारी ठेवण्यात आली आहे; मात्र आत्तापर्यंत खाण खंदकातील पाणी खेचण्याची गरज भासलेली नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

फोंडा तालुक्यातील पंचवाडी येथील धरण पाण्याअभावी कोरडे पडले आहे. अंजुणे धरणामध्ये केवळ 4 टक्के पाणी शिल्लक आहे. दक्षिण गोव्यात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली या प्रमुख धरणामध्ये 21 टक्के पाण्याचा साठा आहे. आमठाणे धरणामध्ये 44 टक्के, काणकोण तालुक्यातील चापोली धरणामध्ये 42 टक्के आणि गावणे धरणामध्ये 36 टक्के पाण्याचा साठा आहे.
राज्यात मोसमी पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यभरात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मोसमी पाऊस लांबणीवर पडल्यास राज्यातील पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

13 दिवसांत केवळ 3.81 इंच पाऊस
राज्यात चोवीस तासांत 0.53 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पावसाचे प्रमाण कमीच असून, मागील 13 दिवसांत केवळ 3.81 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाने दडी मारल्याने उष्णतेचे प्रमाण कायम आहे.

फोंड्यात सर्वाधिक पाऊस
राज्यात गेल्या 1 जूनला चांगल्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर 11 जूनला 1.33 इंच अशा चांगल्या पावसाची नोंद झाली होती. राज्यात 10 जून ते 14 जूनपर्यंत दरदिवशी कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत फोंडा येथे 1.10 इंच अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जुने गोवे येथे 0.85 इंच, सांगे येथे 0.77 इंच, म्हापसा येथे 0.66 इंच, साखळी येथे 0.62 इंच पावसाची नोंद झाली. पेडणे, पणजी, काणकोण, दाबोळी, मडगाव, मुरगाव येथेही तुरळक पावसाची नोंद झाली.

तापमानातील वाढ कायम
राज्यात चोवीस तासांत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले असून, सामान्य तापमानापेक्षा ते 4.1 अंश सेल्सिअस जास्त होते. किमान तापमान 24.7 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. आगामी चोवीस तासांत तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गोव्यासह काही राज्यांत आज, उद्या मुसळधार पाऊस
देशातील 6 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत दि. 14 आणि दि. 15 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने काल वर्तवला. या राज्यांमध्ये गोवा, गुजरात, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक यासह दमण व दीव, लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे.