दोन महिलांच्या हत्यांनी हादरला गोवा

0
125

 

>> सांगोल्ड्यात गंधतज्ज्ञ मोनिका घिर्डेची बलात्कारानंतर हत्या
>> काकोडा येथे दिवसाढवळ्या महिलेची गळा आवळून हत्या

गोव्यात कालची सकाळ दोन महिलांच्या निर्घृण हत्यांच्या बातमीसह उजाडली. उत्तर गोव्यात सांगोल्डा येथे विख्यात गंधतज्ज्ञ मोनिका घिर्डे (३८) ह्या विवस्त्रावस्थेत, हात – पाय पाठीमागून बांधलेल्या स्थितीत मृत आढळल्या, तर दुसरीकडे दक्षिण गोव्यातील म्हादेगाळ – काकोडा येथील ६५ वर्षीय शोभा करमली यांचीही गळा आवळून हत्या झाल्याचे आढळून आले. या दोन्ही घटनांनी गोवा हादरला आहे.

मोनिका ह्या सपना राज व्हॅली संकुलातील तळमजल्यावरील दोन क्रमांकाच्या सदनिकेत एकट्याच राहात असत. त्यांचा मृतदेह हात – पाय बांधलेल्या स्थितीत व नग्नावस्थेत आढळून आलेला असल्याने बलात्कारानंतर त्यांची हत्या झाल्याचा कयास आहे. शवचिकित्सेनंतर त्याला दुजोरा मिळू शकेल. घरातील चीजवस्तूही पळवण्यात आल्या आहेत. मात्र, हा जबरी चोरीचा प्रकार आहे की या हत्येमागे आणखी काही इरादा होता याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्या शेजार्‍यांची, इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची चौकशी करण्यात आली, परंतु त्या सदनिकेत कोणी प्रवेश केला होता त्यासंबंधी माहिती मिळू शकली नाही. मोनिका यांच्या मानेवर झटापटीच्या खुणा आढळून आल्या असून त्यांनी जोरदार प्रतिकार केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी गावातील काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी ६ रोजी दुपारी मोनिका यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येणारी बाई साडेअकराच्या दरम्यान आली व तिने दार खटखटावले. मात्र, दार उघडले न गेल्याने ती दुसर्‍या घरी स्वयंपाकासाठी गेली व तेथील काम आटोपून परतली, तेव्हाही दार खटखटवले तरी प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजार्‍यांना माहिती दिली. त्यांनी मोनिका यांच्या विभक्त झालेल्या व पर्वरीतच राहणार्‍या पतीशी संपर्क साधला. त्याने येऊन शेजारील महिलेजवळील किल्लीने दरवाजा उघडण्यात आला असता मोनिका मृतावस्थेत आढळून आल्या. या हत्येची माहिती मिळताच शेजार्‍यांनी पर्वरी पोलिसांशी संपर्क साधला, परंतु सांगोल्डा भाग पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत नसल्याने पोलिसांनी या घटनेची माहिती साळगाव पोलीस स्थानकाला दिली. पोलीस निरीक्षक राजकुमार हे आपल्या सहकार्‍यांसह रात्री अकराच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला.
बुधवारपासून सदनिकेत
या इमारतीचे सुरक्षा रक्षक जॉन रॉड्रिगिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका ह्या बुधवार दि. ५ रोजी आपल्या टीएन ०७ बीएफ ७१६९ या कारमधून सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान तांदुळ घेऊन आल्या होत्या व कार इमारतीखाली उभी करून ठेवली होती. त्यानंतर त्या सदनिकेत गेल्या त्या बाहेर पडलेल्या दिसल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, पोलीस महाअधीक्षक विमल गुप्ता, पोलीस अधीक्षक उमेश गावकर, उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक राजकुमार, पोलीस निरीक्षक जिवबा दळवी आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
नातवंडे येण्यापूर्वीच काळाचा घाला
अरविंद यांची एक मुलगी दावणगिरी येथे लग्न करून दिली आहे, तर त्यांचा मुलगा मुंबईला असतो. सुटीनिमित्त करमली यांची विवाहित कन्या दावणगिरीहून आज शनिवार दि. ८ रोजी मुलांसमवेत येणार होती. आपल्या नातवंडांना पाहून शोभा यांना अतिशय आनंद व्हायचा. त्यामुळे आपल्या नातवंडांच्या भेटीसाठी आतुर असलेल्या शोभा यांना त्यापूर्वीच जीव गमवावा लागल्याने उपस्थितांत तीव्र हळहळ व्यक्त होत होती. शोभा या मनमिळावू व अडीअडचणीतील लोकांना मदत करणार्‍या होत्या असे त्यांच्या परिचितांनी सांगितले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे करमली यांच्या हातात चार बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र तसेच बोटात अंगठ्या असे दागिने होते. त्यांना चोरट्याने हातही लावलेला नसल्याने या हत्येबाबत गूढ निर्माण झाले आहे.

शोभा करमली यांची हत्या
दुसरीकडे, म्हादेगाळ – काकोडा येथील ‘हिरामंगल’ या बंगल्यावर अज्ञातांनी ९.३० ते १०.०० या अल्पावधीत जबरी चोरी करून घरातील मोठा टीव्ही, तसेच १ लाख वीस हजार रुपयांचा ऐवज पळविण्यात आला. यावेळी घरात असलेल्या शोभा अरविंद करमली यांचीही चोरट्यांनी गळा आवळून हत्या केली, अशी माहिती केप्याचे उपअधीक्षक सॅमी तावारिस यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, मृत शोभा व त्यांचे पती अरविंद हे दोघेच घरात राहात होते. घरातील कामे करण्यासाठी एक मोलकरीण यायची. गेल्या सोळा – सतरा वर्षांपासून ही मोलकरीण त्यांच्याकडे काम करीत आहे. अरविंद ऊर्फ पुंडलिक करमली यांचा वाघोण येथे ‘आस्वाद काजू इंडस्ट्री’ हा काजूबियांचा कारखाना आहे, तसेच ‘बागायतदार’जवळ त्यांचे काजू बियांचे दुकानही आहे. काल सकाळी साडे सातच्या सुमारास ते कारखान्यात गेले होते.
सकाळी फोनही केला होता
त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता शोभा यांनी त्यांना मासे घेऊन येण्यास सांगणारा दूरध्वनीही केला होता. त्यानंतर सव्वा दहाच्या दरम्यान त्यांची कामवाली घरी आली असता मालकीण कॉटच्या शेजारी पडल्या होत्या. तिने जवळ जाऊन पाहिले असता शोभा यांच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवून तोंड बंद करण्यात आले होते, तसेच गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यांच्या अंगात धुगधुगी दिसल्याने मोलकरणीने त्यांना पिण्यासाठी पाणी आणले, मात्र त्या पाणी पिऊ शकत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच मालकांना दूरध्वनी केला, तसेच शेजार्‍यांना कळवले.
पोलीस स्थानकात या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर लगेच पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई, उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर व उपअधीक्षक सॅमी तावारिस, अधीक्षक शेखर प्रभुदेसाई आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण करून घटनेसंबंधीचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. श्‍वानपथकाला पाचारण केले असता ते घरासमोरील रस्त्यापर्यंत गेले. त्यामुळे मारेकर्‍याने गाडी अथवा स्कूटरचा वापर केला असावा असा पोलिसांचा कयास आहे.
तीन वर्षांपूर्वी शोभा यांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शोभा या अरविंद यांच्या द्वितीय पत्नी होत. अरविंद यांचा पहिला विवाह मोहना यांच्याशी झाला होता व त्यांना डॉ. रोहन व रूही अशी दोन मुले आहेत. डॉ. रोहन हे मुंबईला असतात, तर रूही ह्या दावणगिरी, कर्नाटक येथे राहतात.
परिचित व्यक्तीचा हात?
शोभा ह्या कधीही अनोळखी व्यक्तीस दरवाजा उघडत नसत. सकाळी साडे सात वाजता पती कारखान्यात जाताच त्या बंगल्याबाहेरील लोखंडी दरवाजा व आतील लाकडी दरवाजा बंद करायच्या. कोणी परिचयाची व्यक्ती आली तरच त्या दरवाजा उघडायच्या. अन्य कामासाठी कोणी आले असेल तरी खिडकीतूनच व्यवहार करायच्या. असे असताना त्यांनी काल दरवाजा कसा उघडला असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्यामुळे या हत्येमागे परिचित व्यक्तीचाच हात असावा असा संशय निर्माण झाला आहे. सकाळी ९.३० ते १०.१५ एवढ्या अल्प काळात घरातील एलईडी टीव्ही वगैरे पळवून नेण्याचे काम घराची पक्की माहिती असलेली व्यक्तीच करू शकते असे त्यांना वाटते. विशेष म्हणजे त्यांच्या बंगल्याशेजारीच त्यांच्या निकटवर्तीयांचे आणखी दोन बंगले असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने या निकटवर्तीयांनाही धक्का बसला आहे.
म्हादेगाळ – काकोडा हा गजबजलेला परिसर आहे. अरविंद यांचा बंगला हमरस्त्यापासून अवघ्या शंभर मीटरवर असून काकोडा – मळकर्णे रस्त्याच्या कडेला दहा मीटरवर आहे. बंगल्याच्या बाजूने कुंपण असून समोर मोठी लोखंडी गेट आहे. कोणीही व्यक्ती या घरात आल्यास रस्त्यावरून सहजपणे दिसू शकते, त्यामुळे मारेकरी माहितगार असावा असा कयास आहे. खुनी लवकरच गजाआड होईल असा विश्‍वास पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी व्यक्त केला.

मोनिका यांची हत्या ५ किंवा ६ रोजी ः उपमहानिरीक्षक
मोनिका घर्डे यांची हत्या ही बुधवार दि. ५ ऑक्टोबर ते गुरुवार दि. ६ ऑक्टोबर या दरम्यान झाली असावी अशी शक्यता पोलीस उपमहानिरीक्षक वि. आ. गुप्ता यांनी काल व्यक्त केली. मोनिका यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आलेला नाही वा खिडकीचे गज कापण्यात आलेले नाहीत, त्यामुळे मनीषा यांच्याशी परिचित व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा संशय आहे. मोनिका या विवस्त्रावस्थेत आढळल्या असल्या तरी त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही हे शवचिकित्सा अहवालानंतरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
मोनिका या मूळच्या नागपूरच्या असून सुरवातीला छायाचित्रकार म्हणून त्या काम करीत होत्या. तेव्हा छायाचित्रण शिकत असताना त्यांची भरत रमा अमृतन् या तामिळी ब्राह्मणाशी ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात होऊन २००४ साली त्या विवाहबद्धही झाल्या होत्या. मात्र, नंतर त्यांचे संबंध बिनसले. तेव्हा त्यांचे वास्तव्य चेन्नईत होते. मात्र, नंतर त्या पतीशी कायदेशीररीत्या विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू केली व गोव्यात वास्तव्याला आल्या.
५ रोजी मोनिका घरी नव्हत्या. त्या दिवशी रात्री साडे सात नंतर त्यांनी दार उघडलेच नव्हते. दुसर्‍या दिवशी मोलकरीण घरी आली असता दरवाजा उघडला गेला नाही, त्यामुळे मोलकरणीने आपल्या पतीला कळवले. सदनिकेची एक किल्ली जवळच राहणार्‍या एका अमेरिकी महिलेपाशी असे. तिच्याजवळील किल्लीने दार उघडले असता झोपण्याच्या खोलीत मोनिका यांचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. नंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला व श्‍वानपथकही आणण्यात आले. याप्रकरणी कसून चौकशी केली जात असून पोलिसांचे एक पथक गोव्याबाहेर तपासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. मोनिका ह्या व्यवसायानिमित्त सातत्याने फिरत असत. अनेक व्यक्तींशी त्यांचा त्यामुळे संपर्क आला होता. या परिचितापैकीच कोणीतरी त्यांचा घात केल्याचा संशय आहे. मोनिका यांचा एक भाऊ मुंबईत राहतो असे गुप्ता यांनी सांगितले.