देशी भाषाप्रेमींत खळबळ; संघ स्वयंसेवकांत संभ्रम

0
100

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करण्यासाठी भाभासुमंच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याच्या कारणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोवा विभाग संघचालकपदावरून प्रा. सुभाष वेलिंगकर यांची उचलबांगडी केल्याने भारतीय भाषाप्रेमींमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेलिंगकर यांना या विषयावर समजावण्याचा आग्रह संघाच्या केंद्रीय नेत्यांपाशी धरला होता. वेलिंगकर यांच्यासोबत असलेल्या संघाच्या अन्य काही कार्यकर्त्यांनी हल्ली भाभासुमंबाबत मवाळ धोरण अवलंबिले होते. प्रा. वेलिंगकर यांचे मन वळविणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी संघ प्रमुखांची भेट घेऊन इंग्रजीचे अनुदान रद्द केल्यास भाजपवर गोव्यात काय परिणाम होईल हे संघाला पटवून देण्यात ते यशस्वी ठरले होते.
परंतु प्रा. वेलिंगकर आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यांनी तत्व सोडण्यास नकार दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधीसभेत देशी भाषांच्या संरक्षणाचे धोरण अवलंबिले होते. संघाचे व आपले तत्व वेगळे नाही असे प्रा. वेलिंगकर सतत सांगत होते; परंतु वरील निर्णयामुळे संघ स्वयंसेवकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या घोषणेमुळेच प्रा. वेलिंगकर यांना पदावरून हटविल्याचे संघाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. संघ परिवारात प्रा. वेलिंगकर यांचा प्रचंड प्रभाव असून त्यांच्याबद्दल आदर असणार्‍यांची संख्या संघात बर्‍याच प्रमाणात असल्याने भाभासुमंच्या भूमिकेवर वरिल निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे भाभासुमंच्या एका नेत्याने सांगितले. नवा पक्ष स्थापन करण्याच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीच्यावेळी प्रा. वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती, त्याचीही दखल संघाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे.