देशात म्युकरमायकोसिसचे ११,७१७ रुग्ण

0
128

>> गुजरातमध्ये सर्वाधिक २८५९ तर गोव्यात १० बाधित

देशात आता म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची मंगळवार दि. २५ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतची आकेडवारी दिली आहे. त्यानुसार देशभरात आतापर्यंत एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची बाधा झाली आहे. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रात असून गोव्यात १० रुग्णांची नोंद आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयानेही चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७० आणि आंध्रप्रदेशमध्ये ७६८ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत ही आकडेवारी दिली आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसने ६२० जण बाधित असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या आकडेवारीत ही संख्या ११९ आहे.

कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३५, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४, दिल्लीत ११९ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. तर चंदीगडमध्ये ८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून गोव्याला औषध पुरवठा ः मंत्री गौडा
म्युकरमायसोसिसच्या उपचारासाठी लागणार्‍या ‘अम्फोटेरिसिवियल बी’ या औषधाच्या ५० कुप्या केंद्राने गोवा सरकारला वितरित केल्या असल्याची माहिती केंद्रीय खते व रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. वरील रोगावरील उपचारासाठीच्या ‘अम्फोटेरिसिवियल बी’ इंजेक्शनच्या १९४२० कुप्यांचे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. यापूर्वी २१ मे रोजीही याच इंजेक्शनच्या २३६८० कुप्यांचे वाटप केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, १८ राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून भविष्यात राज्यांना या इंजेक्शनच्या आणखी कुप्या पाठविण्यात येणार असल्याचेही गौडा यांनी स्पष्ट केले आहे.