देशात ऑक्टोबरपासून ५ जी सेवा सुरू होणार

0
25

नुकताच ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारने दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला. लिलावानंतर ५ जी सेवा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिले. देशभरात १२ ऑक्टोबरपर्यंत ५ जी सेवा सुरू करण्यात येणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे, असेही वैष्णव म्हणाले.

पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशभरात ५ जी सेवा पोहचवण्याचे आमचे ध्येय आहे. ही सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खबरदारी घेऊ, त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.

भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.