देशात आजपासून क्रिकेटचा महाकुंभ

0
9

>> विश्वचषक स्पर्धेत 10 संघ भिडणार; 10 शहरे, 46 दिवस अन्‌‍ 48 सामने; भारतीय क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला

क्रिकेटचा महाकुंभ अर्थात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून देशात सुरुवात होणार आहे. 12 वर्षांनंतर प्रथमच भारत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर असे 46 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कालावधीत 10 शहरांत 10 संघांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दुपारी गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याने या विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणारी विश्वचषक स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा महाअंतिम सामना रंगणार आहे. भारताचा पहिला सामना रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे, तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार दि. 15 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघ इतर संघासोबत एक एक सामना खेळणार आहे. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

1975 मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक सुरू झाला, तेव्हापासून 2007 पर्यंत कोणताही यजमान देश विश्वविजेता होऊ शकला नाही. 2011 मध्ये भारताने ही परंपरा खंडित केली आणि जगज्जेता बनणारा पहिला यजमान देश बनला. तेव्हापासून 2019च्या शेवटच्या विश्वचषकापर्यंत केवळ यजमान देशालाच विश्वविजेते बनण्याचा मान मिळत आहे. यावेळी भारत यजमान आहे आणि भारतीय संघ देखील तगडा आहे. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा ऑस्ट्रेलियानंतरचा सर्वात यशस्वी संघ आहे. 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 1987 मध्ये इंग्लंडने, 1996 मध्ये श्रीलंकेने, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने आणि 2019 मध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत भारताला पराभूत केले होते. 2007 नंतर भारतीय संघाने प्रत्येक विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत किंवा त्यापुढेही प्रवेश केला होता.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी.

विश्वचषकात सहभागी
संघ व कर्णधार

संघ : कर्णधार
ख् भारत – रोहित शर्मा
ख् ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स
ख् इंग्लंड – जॉस बटलर
ख् न्यूझीलंड – केन विल्यमसन
ख् दक्षिण आफ्रिका – तेंबा बवुमा
ख् श्रीलंका – दासुन शनाका
ख् पाकिस्तान – बाबर आझम
ख् अफगाणिस्तान – हश्मतुल्लाह शाहिदी
ख् बांगलादेश – शाकिब अल हसन
ख् नेदरलँड्स – स्कॉट एड्वर्डस