देशातील ३१ पैकी ११ मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल

0
122

>> सर्वात श्रीमंत चंद्राबाबू नायडू ः अरुणाचलचे प्रेमा खांडू सर्वात तरुण

नॅशनल इलेक्शन वॉॅच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांनी देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्राच्या केलेल्या विश्‍लेषणात एकूण ३१ मुख्यमंत्र्यांपैकी ११ मुख्यमंत्र्यांच्या (३५ टक्के) विरोधात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, झारखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पॉण्डीचेरी, जम्मू आणि काश्मिर, बिहार या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याविरोधात गुन्हे दाखल झालेले आहे. त्यातील ८ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तर २० मुख्यमंत्र्याच्याविरोधात (६५ टक्के) एकही तक्रार नाही.
तसेच २५ मुख्यमंत्री करोडपती (८१ टक्के) असल्याचे आढळून आले आहे.

सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्र्यामध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आघाडीवर आहेत. त्यांची १७७ कोटी रूपयांची मालमत्ता आहे. दुसर्‍या क्रमांकावर अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू (१२९ कोटी) आणि तिसर्‍या क्रमांकावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (४८ कोटी) आहेत. तर सर्वात कमी उत्पन्न असलेल्या मुख्यमंत्र्यामध्ये प्रथम क्रमांकावर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार (२६ लाख), दुसर्‍या क्रमांकावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (३० लाख) आणि तिसर्‍या क्रमाकांवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (५५ लाख) आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मालमत्ता ६.२९ कोटी एवढी आहे.
देशातील मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता १६.१८ कोटी एवढी आहे. दोन मुख्यमंत्र्यांची मालमत्ता १०० कोटींच्यावर आहे. सहा मुख्यमंत्र्यांची मालमत्ता १० ते ५० कोटी, सतरा मुख्यमंत्र्यांची मालमत्ता १ ते १० कोटी आणि सहा मुख्यमंत्र्यांची मालमत्ता एक कोटीपेक्षा कमी आहे.

अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू (३५ वर्षे) हे देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. तरूण मुख्यमंत्र्यामध्ये दुसर्‍या स्थानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (४४ वर्षे) आणि तिसर्‍या स्थानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (४५ वर्षे) आहेत. सर्वांत वयोवृध्द मुख्यमंत्र्यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (७४ वर्षे) यांचा समावेश होत आहे. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री विजयन (७२ वर्षे) आणि मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानावाला (७१) याचा क्रमांक लागतो. तीन मुख्यमंत्री बारावी उत्तीर्ण (१० टक्के), बारा मुख्यमंत्री पदवीधर (३९ टक्के), दहा पदवीधर व्यावसायिक (३२ टक्के), पाच मुख्यमंत्री पदव्युत्तर पदवीधारक (१६ टक्के) आणि एका मुख्यमंत्र्याने डॉक्टरेट (३ टक्के) मिळविलेला आहे. देशातील ३१ मुख्यमंत्र्यांपैकी केवळ ३ मुख्यमंत्री महिला (१० टक्के) आहेत.