देशातील लोकशाही काळ्या छायेखाली : राहुल

0
93

विद्यमान मोदी सरकारच्या राजवटीत देशातील लोकशाही कधी नव्हे एवढी काळ्या छायेखाली आहे. हातात असलेल्या सत्तेचा गैरवापर करीत हे सरकार विरोध व्यक्त करणार्‍यांचा आवाज बंद करू पाहत आहे. अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला.

कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत झालेल्या कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या महत्वाच्या बैठकीवेळी राहुल गांधी बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या बुरख्याआडून प्रश्‍न विचारणार्‍या नागरिकांना धमकावले जात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘टिव्ही चॅनल्सना शिक्षा ठोठावली जात आहे आणि बंद ठेवण्याचे आदेश जारी केले जात आहेत. गैरप्रकारांना सरकारला जबाबदार धरून प्रश्‍न विचारणार्‍या विरोधकांना अटक केली जात आहे. या सर्वांवरून देशातील लोकशाही काळ्या सावटाखाली आली असल्याचे दिसून येत आहे’ अशी टिप्पणी राहुल यांनी केली.
सत्ताधार्‍यांचे धोकादायक मनसुबे उधळून लावण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस अधिक बळकट करणे यामुळे अधिक सोपे होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मोदी सरकारकडे कोणत्याच प्रश्‍नाचे उत्तर नाही. त्यामुळेच हे सरकार प्रश्‍न विचारल्यास बेचैन होते. येत्या संसदीय अधिवेशनात तसेच अन्य व्यासपीठांवर सरकारच्या अपयशी कारभाराचा पर्दाफाश करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या सरकारच्या काळातच भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. गेल्या अनेक दशकांत असे घडले नव्हते असा दावा त्यांनी केला.