दोनापावला येथे परवान्यांसाठी लिलाव; पहिल्या टप्प्यात 13 उत्खनन क्षेत्रे लिलावात येणार
भारताच्या अद्याप वापर न झालेल्या महत्त्वाच्या आणि भूगर्भात खोलवर असलेल्या खनिज स्रोतांचे भांडार खुले करण्यासाठी देशाचा पहिला उत्खनन परवाना लिलाव सुरू करण्यासाठी खाण मंत्रालय सज्ज झाले असून, हा लिलाव गुरुवार दि. 13 मार्च रोजी गोव्याच्या दोनापावला येथील ताज कन्वेन्शन सेंटर येथे होणार आहे. यावेळी केंद्रीय खाण मंत्री जी. किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहतील.
एमएमडीआर सुधारणा कायदा, 2023 लागू झाल्यानंतर, कायद्याच्या नवीन सातव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या लिथियम, तांबे, कोबाल्ट, सोने, चांदी, आरईई आणि पीजीईसह अतिमहत्त्वाच्या आणि खोलवर असलेल्या 29 खनिजांच्या उत्खननासाठी खाजगी सहभागास परवानगी देण्यासाठी परवाने सुरू करण्यात आले आहेत.
सुरळीत अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्याच्या कलाम 20ए अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आणि 21 ऑक्टोबर 2024 रोजी उत्खनन परवाने लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक आदेश जारी केला.
पहिल्या टप्प्यात मंत्रालय 13 उत्खनन खंडांचा लिलाव करेल. आरईई, जस्त, हिरा, तांबे आणि पीजीई यांच्या या खाणी असून, त्यांचा लिलाव ऑनलाईन निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून केला जाणार आहे. या टप्प्यासाठी निविदा कागदपत्रे एमएसटीसी लिलाव प्लॅटफॉर्मवर 20 मार्चपासून उपलब्ध होतील.
या पावलामुळे उत्खननाचा वेग वाढून, खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ होईल आणि भारताच्या खनिज सुरक्षा आणि अतिमहत्त्वाच्या खनिज उत्पादनातील स्वयंपूर्णता वाढू शकेल.
दरम्यान, या कार्यक्रमात अतिमहत्त्वाच्या खनिज खंडांच्या पाचव्या टप्प्याविषयी रोड शो आणि एआयचा वापर करून खनिजांना लक्ष्य करण्यावर आधारित खनिज उत्खनन हॅकेथॉन, एआय हॅकेथॉन 2025 चे आयोजनही होणार आहे.