पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो ट्रेनचे उद्घाटन केले. कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून ही मेट्रो सुस्साट धावणार आहे. या मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शाळकरी मुलांसोबत मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी त्यांनी मुलांशी संवादही साधला. हा पाण्याखालील मेट्रो बोगदा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागादरम्यान धावेल. हा मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली बांधण्यात आला आहे. भारतातील कोणत्याही नदीखाली बांधलेला हा पहिला वाहतूक बोगदा आहे.
पंतप्रधान मोदी काल पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी पंतप्रधानांनी ऑनलाईन पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. याबरोबरच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.