देशाची वाटचाल शून्य वीज बिलाकडे : मोदी

0
2

>> गुवाहाटी येथे 11,599 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांहस्ते उद्घाटन

केंद्रातील भाजप सरकार देशातील घरांचे वीज बिल शून्य करण्याकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी गुवाहाटी येथे बोलताना सांगितले. गुवाहाटी येथे 11,599 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केल्यापासून लोक इंटरनेटवर सोलर पॅनेलची माहिती गोळा करत आहेत. या योजनेंतर्गत एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या घरांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. या योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून ज्यांच्या घरात हे फलक बसवले जातील त्यांनाही 300 युनिट मोफत वीज मिळणार असल्याची माहिती यावेळी पंतप्रदान मोदी यांनी दिली.

गेल्या 10 वर्षात आम्ही प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याची मोहीम राबवली. आता आम्ही वीज बिल शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अर्थसंकल्पात सरकारने मोठी रुफटॉप सोलर योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार एक कोटी कुटुंबांना मदत करेल असे मोदी यांनी सांगितले.

सध्या या योजनेवर शासनाकडून काम सुरू असून येत्या तीन वर्षांत ती पूर्णत्वास जाईल. म्हणजेच 2027 पर्यंत देशातील एक कोटी लोकांच्या घरांवर सोलर पॅनल बसवण्याची योजना असल्याचे मोदी पुढ्‌े‍ म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गुवाहाटी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर देवी कामाख्या मंदिर कॉरिडॉरसह आसाममधील 11 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाकाल आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरप्रमाणेच 498 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

आज देशात पर्यटनाचा उत्साह वाढत आहे. पूर्वी आसाममध्ये 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज 12 आहेत. भाजप सरकार ईशान्येच्या विकासावर विशेष भर देत आहे. गेल्या 10 वर्षांत येथे विक्रमी संख्येने पर्यटक आले आहेत. 2014 पर्यंत ईशान्येत फक्त 10 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या 10 वर्षांत आम्ही 6 हजार किमी नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधले असल्याची माहिती यावेळी मोदी यांनी दिली.