उत्तराखंड मंत्रिमंडळाची समान नागरी कायद्यास मंजुरी

0
0

>> विधेयक मंगळवारी विधानसभेत मांडणार

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याला मंजुरी दिली. आता उद्या मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेत या संबंधी विधेयक मांडले जाणार आहे.
धामी सरकारने काल रविवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत समान नागरी कायद्याचा मसुदा सादर करण्यात आला. यानंतर धामी मंत्रिमंडळाने तो मंजूर केला. आता ते विधेयकाच्या रूपात विधानसभेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. त्यामुळे समान नागरी कायदा लागू होणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरेल.

उत्तराखंडमध्ये हा कायदा आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. यावर धामी सरकारने 27 मे 2022 रोजी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आणि मसुदा समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना अहवाल सादर केला.

उत्तराखंडसाठी समान नागरी संहिता (यूसीसी) तयार करणाऱ्या समितीच्या प्रमुख शिफारशींमध्ये बहुपत्नीत्व आणि बालविवाहावर पूर्ण बंदी, सर्व धर्मातील मुलींसाठी समान विवाहयोग्य वय आणि घटस्फोटासाठी समान कारणे आणि प्रक्रिया यांचा समावेश आहे.

मुला-मुलींना समान वारसा हक्क असेल, विवाह नोंदणी अनिवार्य केली जाईल आणि मुलींसाठी लग्नाचे वय वाढवले जाईल, जेणेकरून त्या लग्नापूर्वी पदवीपर्यंत पोहोचू शकतील, अशी शिफारसही आयोगाने केली आहे. ज्या जोडप्यांची विवाह नोंदणी झालेली नाही, त्यांना कोणतीही शासकीय सुविधा मिळणार नसून गावपातळीवर विवाह नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
समान नागरी संहिता राज्यातील सर्व नागरिकांसाठी एकसमान विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा कायद्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल.