दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

0
94

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कोकण रेल्वेच्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, तत्काळ रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत रेलसेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कर्नाटक हद्दीत दूधसागरजवळ सोनावळी येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने आज सकाळी मुंबईला जाणार्‍या मंगळुरू – मुंबई स्पेशल ट्रेनचे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरले. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ५ तर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील १ अशा ६ गाड्या रद्द करण्यात आल्या.

घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ही दरड कोसळून माती रुळावर आल्याने हा अपघात घडला. ही गाडी नंतर कुळे रेल्वे स्थानकावर आणून गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बसमधून मडगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.