दु:साहस पाकिस्तानला महागात पडेल : जेटली

0
92
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाक सैन्याकडून भारतीय नागरी वस्त्यांवरील हल्ले चालूच राहिल्याने तेथील लोकांवर बेघर होण्याची पाळी येऊन त्यांना अशा छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.

पंतप्रधान मोदींकडूनही इशारा
शस्त्रसंधीचे उल्लंघन अखंडीतपणे चालू ठेवलेल्या पाकिस्तानला अखेर काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग तसेच संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी सज्जड इशारा दिला. येथे पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी पाकिस्तानने जे दु:साहस केले आहे ते त्यांना महागत पडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकिस्तानकडून होणारे हल्ले त्यांना न परवडणारे ठरतील असा दम त्यांनी दिला.पाक सैन्याकडून १३० गावे, ६० चौक्या लक्ष
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारत-पाकिस्तानच्या सैन्यांदरम्यान कालच्या दिवशीही चकमकी चालूच राहिल्या. त्यात पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील १३० खेड्यांसह भारताच्या ६० चौक्यांना लक्ष्य केले. नागरी वस्तीतील घरांवर पाक सैनिकांनी उखळी तोफांचाही मोठ्या प्रमाणात मारा केला. गोळीबार व उखळी तोफांच्या मार्‍यामुळे बीएसएफच्या ३ जवांनांसह १२ भारतीय नागरिक जखमी झाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारत पाकच्या या कारवायांना भारताकडून चोख उत्तर दिले जात असल्याचे सांगितले. बुधवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या जम्मू, सांबा व कथुआ या जिल्ह्यांमधील खेड्यांना पाक सैनिकांनी लक्ष्य केले. गोळीबार व तोफांचा मारा काल सकाळी ११ वा. पर्यंत सुरू होता अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पाकिस्तान रेंजर्सनी रात्रभरात संपूर्ण १९२ कि. मी.च्या सीमेलगत तोफांचा मारा केल्याचे सांगण्यात आले. यामुळे या भागांमधील सुमारे ३० हजार लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. परिणामी ११३ खेडी निर्मनुष्य झाली आहेत.
बीएसएफकडून ताकदीनिशी प्रतिकार
सांबा, हिरानगर, रामगढ, अर्निया, आर. एस. पुरा, कनाचक व परगवाल या संपूर्ण सीमावर्ती पट्ट्यावर पाक सैन्याने बीएसएफच्या चौक्यांवर स्वयंचलीत शस्त्रांसह तोफांचाही भडीमार केला, अशी माहिती बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिली. पाकिस्तानच्या या कारवायांना बीएसएफनेही पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.
भारत कोणापुढेही नमणार नाही : राजनाथ
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह पाक सैन्याच्या शस्त्रीसंधी उल्लंघनाला भारताकडून चोख उत्तर दिले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. देश कोणापुढेही नमणार नाही असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लवकरच सर्व ठीक होईल, असे वक्तव्य केल्यानंतर काल राजनाथ सिंह यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचे स्थितीवर लक्ष आहे असे ते म्हणाले.