इन्डियन ‘चायनामॅन’

0
116

– श्रद्धानंद वळवईकर

विशिष्ट शैलीचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या स्वरुपात स्पर्धात्मक जागतिक क्रिकेटमध्ये ‘चायनामॅन’ गोलंदाजाचा उदय झाला आहे. कानपूर-उत्तर प्रदेशच्या या १९ वर्षीय युवा गोलंदाजाची विद्यमान वेस्ट इंडीज संघाविरुध्दच्या आंतरराष्ट्रीय वनडे मालिकेसाठी टीम इंडिया संघात लागलेली वर्णी स्वागतार्ह आहे.डावखुर्‍या हाताने खासकरून मनगटाच्या साहाय्याने विशिष्ट शैलीत गोलंदाजी टाकणार्‍या फिरकी गोलंदाजाला क्रिकेटच्या भाषेत ‘चायनामॅन’ म्हणून संबोधले जाते. दक्षिण आफ्रिकन पॉल ऍडम्स यांचे सर्वोत्तम उदारहण ठरावे. आजचे व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षक तथा दक्षिण आफ्रिकेचे एकेकाळचे खंदे फलंदाज गॅरी कर्स्टन यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीदरम्यान पॉल ऍडम्सची संघात वर्णी होती. डाव्या हाताने विशिष्ट शैलीत आणि पंचांच्या जवळून क्रिझचा वैविध्यपूर्ण वापर करून स्वत:चा चेहरा आकाशाकडे वेधत पॉल ऍडम्स गोलंदाजी करायचा. त्याचे चेंडू विशेष वळत नसले तरी फलंदाजाला विचारात पाडण्याइतपत त्याची गोलंदाजी प्रभावी असायची. क्रिकेटच्या बदलत्या पर्वानुसार पॉल ऍडम्स्‌ची आंतरराष्ट्रीय क्रिकेट रसिकांना स्वत:च्या ‘चायनामॅन’ गोलंदाजीने आकर्षून टाकणार्‍या पॉलच्या आज राहिल्या त्या स्मृती.
अवाढ्य भारतात क्रिकेटचा खेळ शहरांपासून ग्रामांपर्यंत आणि खेड्यांपासून गल्लीपर्यंत फोफावला आहे. येथून गुणवत्ताप्रधान क्रिकेटपटूंची निर्मिती होत असली तरी राज्य रणजी संघ आणि पुढे विभागीय संघ ते भारतीय संघ येथपर्यंत सर्वांनाच सुसंधी प्राप्त होण्याची शक्यता नसते. मात्र, युवा कुलदीप यादव याबाबत अत्यंत सुदैवी ठरलाय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखालील स्पर्धात्मक क्रिकेट ज्यामध्ये प्रामुख्याने रणजी क्रिकेटचा समावेश होतो, यात कुलदीप अजून पदार्पण करायचा आहे. देशी क्रिकेटच्या गेल्या दहा वर्षांच्या इतिहासात एकही प्रथम श्रेणीचा क्रिकेट सामना न खेळता टीम इंडियात वर्णी लागलेला कुलदीप हा एकमेव क्रिकेटपटू ठरलाय, हे विशेष.
१४ डिसेंबर, १९९४ रोजी उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे जन्मलेल्या कुलदीपने सर्वप्रथम लक्ष्य वेधले ते त्याचे प्रशिक्षक कपील पांडसे यांचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा युवा गोलंदाज प्रारंभी ‘चायनामॅन’ नव्हे तर चक्क वेगवान गोलंदाजी करायचा. प्रशिक्षक पांडये यांनी त्याला विशिष्ट शैलीने फिरकी गोलंदाजी टाकण्याचा सल्ला दिला. प्रारंभी त्याने विरोध दर्शविला, पण पुढे वैयक्तिक क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने त्याने प्रशिक्षकांचा सल्ला मानून डावखुर्‍या हाताने ‘चायनामॅन’ गोलंदाजी टाकण्यास प्रारंभ केला. त्याच्या या बदलस्वरूपी निर्णयाची फलश्रृती आज त्याला मिळालीय. प्रथमश्रेणी क्रिकेटचा गंध नसताना निव्वळ आयपीएलच्या क्रिकेटविश्वाचा अनुभव घेऊन कुलदीपने ही विशिष्ट उपलब्धी प्राप्त केली आहे.
चालू वर्षीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कुलदीपने उत्तम गोलंदाजी करून जागतिक क्रिकेट तज्ज्ञांना आकर्षित केले. ऑस्ट्रेलियन ‘लीजेन्ड’ शेन वॉर्नच्या लेग स्पिन गोलंदाजीची डाव्या हाताने हुबेहुब नक्कल करून कुलदीप प्रतिस्पर्धी फलंदाजाला पेचात पाडण्यात माहीर आहे, कारण त्याच्या गोलंदाजीचा टप्पा आणि दिशा संभ्रमात टाकणारा आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट (आयसीसी उपक्रम) युवा उत्तर प्रदेशचा संघ यासह इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्स या संघांचे प्रतिनिधीत्व करून थेट राष्ट्रीय संघात झेप घेतलेल्या कुलदीपने देशातील इतर युवा प्रतिभाशील क्रिकेटपटूंसमोर स्वत:चा आदर्श पेश केलेला आहे. राष्ट्रीय संघात म्हणजेच टीम इंडियामध्ये झटपट क्रिकेटचा विशेषज्ज्ञ मानला गेलेला ऑफ स्पिनिंग अष्टपैलू रविचंद्रन आश्विन याच्या जागी कुलदीपला संधी प्रदान करण्याचा जुगार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळलेला आहे. या युवा इंडियन्सच्या ‘चायनामॅन’ गोलंदाजीने प्रभाव टाकला तर टीम इंडियासाठी तो ‘बोनस’ ठरावा.
‘एशियाड’ चा अभेद भारतीय ‘श्रीजेश’ 
१७व्या इन्चिऑन ‘एशियाड’मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावलेल्या हॉकी इंडियाचा चपळ गोलरक्षक श्रीजेश रविंद्रनने अभेद भारतीय होण्याचा गौरव प्राप्त करताना पाकिस्तानविरुध्दच्या निर्णायक अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होण्याची किंचितही संधी दिली नाही. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एरूमेली ग्रामात दि. ८ मे १९८८ रोजी प. व्ही. रविंद्रन आणि सौ. उषा या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीजेशने ‘एशियाड’मधील आपल्या सनसनाटी गोलरक्षणाने अवघ्या भारतीय हॉकी प्रेमींची वाहवा मिळविली आहे.
प्रतिस्पर्धी संघाचे पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोक यशस्वीरित्या थोपविण्याची तंत्र सक्षमता श्रीजेशपाशी असल्याने तो यात ‘तज्ज्ञ’ मानला जातो. २०१० सालच्या नवी दिल्लीतील आणि यंदाच्या ग्लासगो स्कॉटलंड येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतून रौप्य पदकीय यश संपादन केलेल्या हॉकी इंडियाच्या स्पृहणीय कामगिरीत गोलरक्षक तथा संघ उपकप्तान श्रीजेशने योगदान मोलाचे सिध्द झाले आहे. देशी पर्यटन केंद्राचे वलय प्राप्त असलेल्या केरळची खास विशेषता म्हणजे फुटबॉल आणि ऍथलेटीक. या दोन्ही क्रीडाप्रकारांतून या राज्याने उत्तम क्रीडापटू देशाला पुरविले आहेत.
शालेय स्तरावर श्रीजेशही ‘स्प्रिंटर’च्या भूमिकेत मैदानी उतरला होता. उंच उडी आणि व्हॉलीबॉल हे त्याचे सर्वांत आवडते खेळ प्रकार. परंतु, थिरुअनंतपूरम येथील जी. व्ही. राजा क्रीडा विद्यालयाचे प्रशिक्षक जयकुमार आणि रमेश कोलाप्पा यांनी श्रीजेशच्या अंगी असलेल्या चित्त्याच्या चपळाईचे निरिक्षण केल्यावर त्याच्यात दडलेली असामान्य प्रतिभा त्यांना कळून चुकली. त्यांनी त्याला हॉकी गोलरक्षणाकडे वळण्याचे मार्गदर्शन केले.
श्रीजेशने तज्ज्ञांचा सल्ला मानून राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीची कास पकडली. नवी दिल्लीत वार्षिक कार्यक्रमानुसार होणार्‍या नेहरू शालेय हॉकीत श्रीजेशची कामगिरी चमकली. हॉकीत भवितव्य घडविण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन येथूनच मिळाले.
२००४ साली श्रीजेशने कनिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. वरिष्ठांच्या हॉकी इंडिया संघात २००६ सालच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांतून (कोलंबो-श्रीलंका) यशस्वी पदार्पण करून त्याने आपल्या अभेद गोलरक्षणाची जणू झकलच पेश केली. २००८ सालच्या हॉकी आशियाई करंडक स्पर्धेत श्रीजेशने विजयी कामगिरी बजावून भारताला विजेतेपद पटकावून दिले. शिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा बहुमानही त्याने प्राप्त केला.
राष्ट्रीय संघातील अन्य दोन प्रमुख गोलरक्षक अँड्रीयन डिसौझा आणि भारत छेत्री यांच्याशी स्पर्धा करून सरस कामगिरीसह श्रीजेशने २०११ सालापासून हॉकी इंडिया संघातील आपले स्थान कायमचे निश्‍चित केले. २०१३ सालच्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत श्रीजेशने गोलपोस्टमधील आपल्या विद्युत चपळाईची उत्कृष्ट झलक पुन्हा एकदा पेश करून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला.
उच्च मनोबल आणि अभेद गोलरक्षण करण्याचा आत्मविश्वास यातून श्रीजेशने स्वत:ची वैभवी कारकिर्द साकारली आहे. २०१३ साली पूर्वश्रमीची ऍथलीट आणि विद्यमान आयुर्वेदा डॉक्टर असलेल्या अनिषा हिच्याशी विवाहबध्द झालेल्या श्रीजेशची एक मोठी आकांक्षा शिल्लक आहे, ती म्हणजे हॉकी इंडियाला ऑलिंपिक्स क्रीडा स्पर्धांचे सुवर्णपदक प्राप्त करून देण्याची. आगामी २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक्समध्ये देशासाठी विजयी योगदान देण्यासाठी त्याचे जिगरी प्रयत्न राहणार असून इतिहास विषयाचा पदवीधर असलेल्या इंडियन ओव्हरसिज बँकच्या या अधिकार्‍याच्या अभेद व्यक्तिमत्त्वाला हॉकी इंडियाच्या सांघिकतेचा यशस्वी स्पर्श होणेही तेवढेच आवश्यक ठरते.