दुनिया गवाक्षातली…

0
288

(लोगो- भोवताल)

  • अंजली आमोणकर

गवाक्ष म्हणजे ‘मनाची खिडकी.’ ही जर आपल्या मनाची असेल तर आपण केव्हाही उघडू-बंद करू शकतो; मात्र जर ते गवाक्ष दुसर्‍याच्या मनाचं असेल तर मात्र ना ती कधी उघडता येत, ना बंद करता! मनाच्या खिडकीची शक्ती इतकी जबरदस्त असते की जग उलटंपालटं करण्याची ताकद तिच्यात येते.

लॉकडाऊनच्या काळात सर्व लोकांना जबरदस्तीची कैद भोगावी लागली. अनेक ज्येष्ठ तर अजूनही फारसे घराबाहेर पडत नाहीयेत. पण त्यापायी एक निराळीच दुनिया डोळ्यांसमोर उलगडली गेली. गवाक्षातली दुनिया. त्याचबरोबर घरातील अनेक हयात नसलेल्या ज्येष्ठांच्या आठवणीही सभोवती पिंगा घालून गेल्या. खास करून अति ज्येष्ठ जे वयोमानामुळे वर्षानुवर्षे घराबाहेर पडले नव्हते. खिडकीत बसून रस्त्यावरची रहदारी, वर्दळ न्याहाळायची एवढीच त्यांची गंमत, एवढेच त्यांचे मनोरंजन.

बालपणाला मात्र या गवाक्षाची, खिडकीची विलक्षण अपूर्वाई असते. कुठंही हिंडायला- फिरायला गेलं की खिडकीजवळ कोण बसणार इथपासून ती सुरू होते. त्यापायी केवढी ती खडाजंगी व्हायची मग मुलांच्यात! खिडकीजवळील जागा- मग ती मोटारीतली असो, बसमधील असो, रेल्वेतली असो वा विमानातली! …मी तर अजून या वयातही हरखून जाते. काय दिसत नाही त्या खिडक्यांतून? निसर्गाची अप्रतिम व भयावह अशी दोन्ही रूपं दिसतात. मोटार व बसमधून गावं, शहरं व माणसांचे विविध कळप यांची विविध रूपं दिसतात; तर रेल्वेतून निसर्गाची रमणीय व विस्मयकारी रूपं… जी घरातच काय, पण इतर कोणत्याच वाहनातून दिसणार नाहीत. ही रूपं जितकी मनोहारी असतात त्याच्या काही पट अनेकदा थरकाप घडवणारीही असतात. पिवळीधम्मक, सोनेरी, वार्‍यावर डुलणारी उभी शेतं, हिरवीगार कुरणं अन् डोंगर झपकन नजरेआड होतात व वाळून कोळ झालेली निष्पर्ण झाडं व भेगाळलेल्या जमिनीचे पट्टे नजरेत येतात. शांत वाहणार्‍या नदीवरचा पूल पार करता-करताच दुसर्‍या एखाद्या नदीनं कवेत घेऊन- बुडवून टाकलेलं गाव नजरेत येतं. संध्याकाळी, पहाटेच्या संमोहनकारी वेळांना लुकलुकणार्‍या असंख्य नक्षत्रांची जरतारी शाल पांघरलेलं आकाश, धुंवाधार पावसाच्या तावदानावर आपटून आत घेण्याबद्दल विनवणार्‍या पावसाच्या धारा, बकर्‍या-मेंढ्यांच्या कळपाबरोबर गात जाणारा धनगर व अनेक वर्‍हाडींच्या मस्त नाचाने गात-नाचत चाललेली वरात!!
पण हे काही क्षणांपुरतंच दिसणारं जीवित जरी असलं तरी त्यात डोळे विस्फारून टाकण्याची किंवा तोंडाचा ‘आ’ करून ठेवण्याची क्षमता असते. हे क्षणभंगुर जग तुम्हाला फक्त विस्मितच करतं असं नाही तर त्यात विरघळून गेल्याचा (फोल) अनुभवही देतं. जसा विमानाच्या खिडकीतून बाहेर बघताना मिळतो तसा! काय ती कापसासारख्या ढगांची चित्रविचित्र रंगीत शेतं! खाली लुकलुकणारी शहरं व वर लुकलुकणारे आकाश! आणि मध्ये…. विहरणारे आपण! पण हे अनुभवही क्षणभंगुरच ठरतात. डोळ्यांची तहान भागत नाहीच! त्या एवढ्याशा गवाक्षातून जे दिसतं ते झपकन बदलतंच राहातं आपलं.

खिडकीत बसून बाहेर बघण्यात जी गंमत किंवा विरंगुळा अनुभवता येतो तो बाहेरून खिडकीच्या आतलं जग बघण्यात मुळीच येत नाही. कारण खिडकीच्या आतलं जग हे बहुधा केविलवाणं, दुर्दैवी, दारिद्य्रात होरपळत असलेलं व कमनशिबी असतं. त्या खिडक्या मग रेडलाईट एरियातल्या असोत, चाळीतल्या असोत, झोपडपट्टीतील झोपड्यांच्या असोत, नाहीतर मध्यमवर्गीयांच्या ब्लॉकरूपी बांधलेल्या खुराड्यांच्या असोत! खिडकीतून आत दिसणारं जग मात्र क्षणभंगुर नसतं. तुम्ही जितक्या वेळा त्याच्याकडे पाहाल, त्या प्रत्येकवेळी तेही नजर रोखून तुम्हाला पाहते. ‘आमची परिस्थिती बदलवण्याचा आहे का तुमच्याकडे काही उपाय?’- असंच विचारत असतात बहुधा. खिडक्यांशी जेव्हा झरोखे किंवा गवाक्षांचं नातं जोडलं जातं, तेव्हा त्यांची जातकुळीच बदलून जाते. ‘गवाक्ष’ म्हटलं की एकतर ते वाड्याचं हवं, नाहीतर महालाचं. मला नेहमी नवल वाटतं की, जयपूरच्या ‘हवामहल’च्या ९५३ खिडक्या रोज कसलं दृश्य पाहत असतील? गुलाबी जयपूरच्या गतकालीन सौंदर्याचं की आताच्या जयपूरच्या कष्टप्रद जीवनाचं? इथे गवाक्षाच्या आतलं जीवन, जग जेवढं नवलपूर्ण तेवढंच त्याच्या बाहेरचं जगही हृदयस्पर्शी. जगात एकच दैवी गवाक्ष असं आहे ज्याच्या आतलं व बाहेरचं जग आपण रंगवू तसं असतं! ते गवाक्ष म्हणजे ‘मनाची खिडकी.’ ही जर आपल्या मनाची असेल तर आपण केव्हाही उघडू-बंद करू शकतो; मात्र जर ते गवाक्ष दुसर्‍याच्या मनाचं असेल तर मात्र ना ती कधी उघडता येत, ना बंद करता! मनाच्या खिडकीची शक्ती इतकी जबरदस्त असते की जग उलटंपालटं करण्याची ताकद तिच्यात येते.

एका हॉस्पिटलच्या एका वॉर्डला एकुलते एक गवाक्ष असते. त्याला चिकटून निजणारा पेशंट सतत बाहेर बघायचा व बाहेरच्या जगाची नितांत सुंदर वर्णनं इतर पेशंटस्‌ना ऐकवायचा. सर्वजण पक्षघाताचे रोगी असल्याने अंथरुणावर खिळलेले होते व उठून शहानिशा करू शकायचे नाहीत. मात्र कधी आपल्याला तिथे निजून बाहेरची रंगबिरंगी दुनिया बघता येईल याची वाट पाहायचे. शेवटी गवाक्षाच्या जवळचा तो रोगी दगावतो; दुसर्‍याची वर्णी त्या कॉटवर लागते. अत्यानंदानं तो बाहेर बघतो तो काय? पहिला रोगी जी अफाट वर्णनं करायचा त्यापैकी तिथे काहीच नसते. असते फक्त भकास स्मशान, जिथे आता त्या रोग्याचे प्रेत जळत असते. अशी असते मनाच्या गवाक्षाची किमया व शक्ती! खिडकीला आणखीही एक महत्त्व आहे बरं का! प्रेमिकांच्या जगात तिला खास स्थान आहे. ‘मेरे सामने वाली खिडकी में’ असो, नाहीतर ‘शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो’- असो. चोर मंडळींनासुद्धा घरफोडी करायला खिडकी लागतेच लागते.

असे हे बहुरूपी गवाक्ष! बाहेरची दुनिया आत व आतली बाहेर करणारे! उत्तर भारतात जेव्हा पर्यटनस्थळे म्हणून आपण तिथले किल्ले, महाल व मशिदी बघतो तेव्हा दहा दहा फूट उंचीची, जाळीदार नक्षीची गवाक्षं मन मोहून घेतात. शिवाय अनेक ठिकाणी मनात काहीतरी इच्छा धरून गवाक्षांना दोरे बांधण्याची चाल आहेच. ‘मन की मुराद’ पुरी करणारे हे लांब-रुंद-उंच गवाक्ष आपल्या पोटात काय काय गुपीतं दडवून असतील?