दुटप्पीपणा

0
39
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

दुटप्पीपणा हा माणसाच्या प्रामाणिकपणाला सर्वप्रथम कात्री लावतो. प्रामाणिकपणा एकदा कापून फेकून दिला की शिल्लक राहतो तो खोटारडेपणा. सत्य बाजूला काढले म्हणजे असत्याचा महिमा वाढायला लागतो.

आजच्या काळात माणसे सरळपणे बोलत नाहीत, वागत नाहीत व चालत नाहीत. दुटप्पीपणाचे वागणे हुशारपणाचे लक्षण मानण्याचा हव्यास लोकमानसामध्ये पसरलेला दिसतो. मनात एक आणि जनात दुसरेच असे काहीसे वर्तन समाजात स्थिर होताना पाहायला मिळते. आधुनिकतेच्या नावाखाली जे वेडे-वाकडे वळण समाजाला मिळाले आहे, ते मानवतेच्या कल्याणाचे अजिबात नाही.

एकाचा हा नकली हुशारपणा पाहून पाठीमागचा दुसरा तोच चुकीचा आदर्श गिरवतो. अगोदर पहिला, नंतर दुसरा, तिसरा, चौथा… अशा प्रकारे सगळेच जण गैरमार्गाने चालायला लागतात. हळूहळू सगळा समाजच चुकायला लागतो.

दुटप्पीपणा हा माणसाच्या प्रामाणिकपणाला सर्वप्रथम कात्री लावतो. प्रामाणिकपणा एकदा कापून फेकून दिला की शिल्लक राहतो तो खोटारडेपणा. सत्य बाजूला काढले म्हणजे असत्याचा महिमा वाढायला लागतो. कौटुंबिक जीवनात हा दुटप्पीपणा आल्यावर कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हे ठरवतानाच आपला मोठा गोंधळ उडतो.

कोणी जर आपले प्रामाणिक मत सांगितले तर ते आपल्याला आवडले नाही तरी ते हितकारकच असते. दुटप्पीपणाच्या आधाराने जर एखादा खोटा अभिप्राय देत असेल तर त्याने आपली हानीच होणारी असते. खोटी स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे खुशमस्करे खूपच असतात. पण स्पष्टपणे सत्य सांगून आपली कानउघाडणी करणारे फारच थोडे असतात.
आजच्या काळात खरे बोलायला खूप धाडस लागते. आपले खरे बोल जिव्हारी लागल्यावर ऐकणारे शत्रू बनतात आणि संधी मिळताच सूडदेखील घेतात. म्हणून आपण मनातल्या मनात म्हणतो, का म्हणून शत्रुत्व पत्करावे? त्यापेक्षा कोणतीही टीका न करता मित्रत्व स्वीकारण्यात आपला जास्त फायदा असतो.

पोकळ व्यक्तिमत्त्वाची रचना आज रूढ झालेली दिसते. धीरोदात्त, धीरललित आणि धीरशालीन व्यक्तिमत्त्वे आज दिसायला दुर्मीळ बनली आहेत. आपल्या जगण्याचा उद्देश काय? या प्रश्नाचा विचार आजच्या बहुतेकांनी कधी केलेलाच नसतो. जगायला हवे म्हणून आपण अन्न खातो आणि खायला मिळते म्हणून आपण जगतो. राहायला हवे म्हणून आपण घर बांधतो. याच्यापलीकडे आपल्या अध्यात्माचे, तत्त्वज्ञानाचे, अस्तित्वाचे चिंतन करायला आपल्याला वेळ नसतो. ऐहिक सुख ओरबाडून घेणे इथपर्यंतच आपली झेप असते.
व्यापाऱ्यांचा, धंदेवाल्यांचा, जमीनदारांचा दुटप्पीपणा आपण नेहमीच पाहत आलो आहोत. या सगळ्यांमध्ये खरा कळस गाठला आहे राजकारण्यांनी. दुटप्पीपणा स्वीकारणे हा राजकारण्याला पहिला धडा त्याच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच त्याला मिळतो.

पराजय त्याच्या डोळ्यांसमोर त्याला दिसतो, पण निवडणूक होऊन मत-मोजणी होईपर्यंत तो आपणच जिंकणार असा आत्मविश्वास मतदारांना बोलून दाखवतो. आश्वासने देताना, मतदारांना आशेचे गाजर दाखवताना आपण जिंकणारच नाही हे उमेदवाराला पक्के माहीत असते. पहिल्यांदा विजयी तरी होऊ; आश्वासनांचे नंतर पाहू अशी मनाची समजूत त्यांनी करून घेतलेली असते. तीच-तीच आश्वासने चार-पाच निवडणुकांत परत-परत देऊन प्रत्येक वेळी विजयी झालेले उमेदवार आपल्या गोव्यात आजदेखील मिरवत आहेत. दिलेल्या आश्वासनांची पूर्ती कधी झाली नाही व पुढे होणारही नाही याची संपूर्ण खात्री मतदारांना असते. तरीदेखील तीच-तीच चूक परत-परत करण्यात आपल्या मतदारांना कमालीचा आनंद मिळतो. निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांनी भरणारी एक जत्रा असते. त्या जत्रेत सगळेच सहभागी होतात व आपापल्या कुवतीप्रमाणे सहभाग दाखवतात.

राजकारणी हे महाधोरणी असतात. दुटप्पीपणाचे अमृत जणू त्यांना संजीवनीच देत असते. लोकांजवळ बोलताना अतिशय सावधपणे बोलणे ही कला त्यांनी आत्मसात केलेली असते. बोललेला बोल आपल्या अंगलट येणार नाही याची काळजी घेण्यात ते निपूणच असतात.
शिक्षकाच्या आणि डॉक्टरांच्या व्यवसायामध्ये मात्र दुटप्पीपणाला स्थानच नसते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करताना निःपक्षपातीपणे शिक्षकाने ते करायला हवे. रोगाचे योग्य निरीक्षण करून रुग्णाला व कुटुंबीयांना खरी परिस्थिती समजावून देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. येथे दुटप्पीपणात विश्वासघात घडू शकतो, म्हणून दुटप्पीपणाला टाळणेच श्रेयस्कर असते.