दिवस श्रद्धेचे, कृतज्ञतेचे…

0
224
  • मीना समुद्र

भारतीय संस्कृतीत कृतज्ञता हा असाच एक सर्वोच्च कोटीचा गुण आहे. तो मनुष्यमात्रांत सामंजस्य राखण्यात आणि स्वतःचे व्यक्तित्व आणि चारित्र्य उज्ज्वल आणि ऊर्जस्वल राखण्यास अत्यंत सहाय्यभूत होता.

आमच्या ओळखीच्या त्या तरुणाचे वडील मृत्युशय्येवर होते. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या या लाडक्या गुणी लेकाचे दोनाचे चार हात झालेले पाहण्याची त्यांची अत्यंत इच्छा होती. डॉक्टरांनी वडिलांची अगदी चारदोन दिवसांचीच शाश्‍वती दिली तेव्हा चातुर्मासानंतर लग्नमुहूर्त ठरला असतानाही घरच्यांनी मुलाचे लग्न लावले ते ऐन पक्षपंधरवड्यात, तेही अमावस्येदिवशी. मुलगा-सून त्यांच्या पाया पडली आणि त्यांनी अतिशय सुखासमाधानाने डोळे मिटले.

  • या गोष्टीची चर्चा मग पुढे सगळीकडे चालू होती, कारण घरच्या सार्‍याच लोकांनी या अशुभ दिवसात, तेही अशुभ मुहूर्तावर लग्न पार पाडले होते. इतरांच्या शंका-कुशंकांपेक्षा त्या प्रेमळ जात्या जिवाची इच्छा मान्य करून त्या तरुणाने त्यांचे आशीर्वाद घेतले होते आणि कोणतेही अघटित न घडता त्यांचा संसार गेली २०-२२ वर्षे सुखाने चालू आहे. मुलाबाळांनी घर गजबजले आहे.

एकूणच समाजमानसात कोणत्याही मंगलकार्यासाठी अशुभ मानला गेलेला भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर भाद्रपद वद्य अमावस्येपर्यंतचा हा श्राद्धपक्षाचा काळ आहे. यालाच ‘पितृपक्ष’ किंवा ‘म्हाळ’ असेही म्हटले जाते. या दिवसांत पितर यमलोकांतून पृथ्वीवर येऊन वायुरूपात संचार करतात. त्यांच्यासाठी पिंडदान, शांती, तर्पण, दीपदान, अन्नदान, गोदान असे विधी पितरांच्या पुण्य तिथीला म्हणजेच त्यांच्या श्राद्धतिथीला केले जातात. एका दृष्टीने श्राद्ध हा वाईट किंवा अशुभ विधी नसून तो श्रद्धेचा, विश्‍वासाचा उत्सव आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, त्यामुळे जीवात्मा संतुष्ट होतो म्हणून ब्राह्मणभोजन, गरिबागरिबांना भोजन देणे, गरजूंना अन्न देणे आणि त्यातून पुण्य जोडणे म्हणजेच दानाने मिळणारे समाधान आणि मनःशांती प्राप्त करून घेणे हा उद्देश असतो. त्यासाठी वस्त्रदान, अनाथांना भोजन, गरजूंना लागतील त्या वस्तू, पैसे असेही दान दिले जाते. घरात किंवा गया, नाशिक, अलाहाबाद अशा तीर्थस्थानी वा मंदिरातही दान दिले जाते.

आत्मा अमर आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपात पुन्हा जन्म घेतो. एके ठिकाणी अस्त तर दुसर्‍या ठिकाणी उदय हा निसर्गनियम आणि एका गोष्टीचा नाश, लय तिथे दुसर्‍या गोष्टीची उत्पत्ती हा विज्ञाननियम- या दोन्ही गोष्टी माणसाच्या लक्षात आल्या आणि त्यामुळे आपल्या पितरांचे, पूर्वजांचे आशीर्वाद आपल्यापाठी असावेत, आपल्या हातून हेतुतः किंवा परिस्थितीवश त्यांचा अवमान, अनादर झालेला असेल तर त्याचा दोष आपल्याला वा आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या आपल्या मुलाबाळांना लागू नये, हे शिव्याशाप वा तळतळाट कोणत्याही प्रकारे भोगायला लागू नयेत ही त्याची आंतरिक इच्छा असते. काही गोष्टी त्या-त्या अवस्थेतून, अनुभवातून जातानाच माणसाला कळतात. त्यामुळे त्या चुकांचे परिमार्जन, पश्‍चात्ताप, उपरती हेही त्यामागे असते. तारुण्याच्या गुर्मीत किंवा लांब असल्यामुळे मातापित्यांचा वा आपल्यावर प्रेम करणार्‍या आप्तेष्टांचा छळ केला गेला असेल, त्यांची हेळसांड झाली असेल, अपशब्द वापरले असतील तर त्या सर्वांची मनापासून क्षमा मागावी हाही हेतू त्यामागे असेल.

माणसावर पितृऋण, देवऋण आणि ऋषिऋण असते. ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवताना हालअपेष्टा सोसल्या, कष्ट आणि परिस्थितीच्या झळा सोसल्या, आपल्याला शिकवले, सर्वार्थाने मोठे केले त्या मातापित्यांबद्दल श्रद्धा तर असायलाच हवी मनात. दैवदत्त संधी आणि ऋषितुल्य माणसांनी दिलेले ज्ञान आणि दाखविलेली वाट यावरून आपला जीवनमार्ग सुकर होत असतो. या सर्वांचे ऋण आपल्यावर असते आणि ते फेडणे हे आपले परमकर्तव्य असते. त्यामुळे मातापित्या, देवतुल्य आणि ऋषितुल्य माणसांचा आदर-सन्मान ठेवणे अत्यंत जरूरीचे असते. ऋण फेडले नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जीवनाच्या सर्व भोगांतून, त्रासांतून पुन्हा जावे लागते. मनुष्यजन्म हा फार कष्टसाध्य असतो, आणि जाणिवेचा भाग माणसाजवळच असतो. काही पशुपक्ष्यांमध्येही तो आढळत असला तरी माणसांमध्ये तो जास्त प्रखरतेने असल्याने त्याने स्मरणपूर्वक या सर्व ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग काढला असावा. जिवंतपणी कर्तव्ये निभावणे आहेच, पण मृतांची आठवणही अनिवार्य आहे. सर्वांना प्रेमाने वागवणे, मानसन्मान-आदरसत्कार करणे ही भावना तर असतेच, पण मातृदिन, पितृदिन, शिक्षकदिन साजरे करताना आपण त्या सार्‍यांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करीत असतो. गुरुदक्षिणा, वंदन करणे, सेवा करणे, मदत करणे, आवडीचे काम करणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत आहे. ‘रिटर्न गिफ्ट’सारखी ही परतफेडीची भावना यात नसते तर आदरयुक्त विनम्र भावना आणि प्रेम त्यात निहीत असते.

यादृष्टीने पक्षपंधरवडा वा पितृपक्ष हा मला अतिशय मोठा ‘कृतज्ञता उत्सव’ वाटतो. त्यामुळेच त्याचा शेवट ‘महालय’ असतो. कुठल्याही देश-प्रांत वा भूभागातला मनुष्य हा एक सामाजिक प्राणी असतो. त्यामुळे स्व-विकास, कौटुंबिक विकास यांबरोबरच समाजविकास हे त्याचे कर्तव्य असते. हे साधणारी गुणी व्यक्ती समाजात आदर्श ठरते. त्यासाठी संपूर्ण प्रगतीशील मानवी संस्कृतीत आचार-विचारांचे, विहार-व्यवहारांचे काही नीतिनियम बनविले जातात आणि समाजात शिस्तबद्धता येण्यासाठी आणि मानवी हितसंबंधी व्यवहार सुरळीतपणे चालू राहण्यासाठी व्यक्ती-व्यक्तीने ते पाळणे आवश्यक असते.

सत्यम्-शिवम्-सुंदरम्‌ची उपासना करणार्‍या आणि ज्ञानाची कास धरणार्‍या भारतीय संस्कृतीत कृतज्ञता हा असाच एक सर्वोच्च कोटीचा गुण आहे. तो मनुष्यमात्रांत सामंजस्य राखण्यात आणि स्वतःचे व्यक्तित्व आणि चारित्र्य उज्ज्वल आणि ऊर्जस्वल राखण्यास अत्यंत सहाय्यभूत होतो. समाज म्हटले की सहकार आला, देवाणघेवाण आली, मिसळणं आलं. अशावेळी संबंधित व्यक्तींनी एकमेकांविषयी आदर व कृतज्ञता ठेवणे, व्यक्तीच्या चांगल्या कार्याची बूज राखणे अत्यंत आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तीतलं नातं त्यामुळे अखंड, अबाधित आणि सुदृढ राखून स्नेहभावही वृद्धिंगत होतो. मूळ मनुष्य स्वभाव हा स्वार्थी, अहंकारी असतो. अपेक्षा ठेवणारा असतो. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दलही अपेक्षा बाळगली जाते. नाहीतर उपकारकर्त्याचा, मदतकर्त्याचा अहंकार दुखावला जातो. ‘थँक्यू’ हा आजच्या जगाचा उपकारातून मुक्त होण्याचा परवलीचा शब्द आहे. पण पडलेली वस्तू उचलून देणे, आजारी माणसाला वेळेवर औषध आणून देणे, एकट्याच राहणार्‍या आजीबाईला देवपूजेसाठी चार फुलं देणे याबदल्यात त्यांच्या चेहर्‍यावरचे प्रसन्न हास्य किंवा ‘बरं झालं तू वेळेवर आलास’ एवढे शब्द पुरेसे असतात. मैत्रीत उपकार मानणे हे कृत्रिमपणाचे ठरते. हे झाले जित्याजागत्या माणसाच्या बाबतीत, पण आताचा हा संपन्न अन्नधान्याचा आणि सुखद हवामानाचा काळ, तेव्हा आपल्यासारखेच आपले पूर्वज संतुष्ट होऊन त्यांनी कुठल्याही रूपात येऊन आपल्याला आशीर्वाद द्यावेत म्हणून मोठ्या श्रद्धेने त्यांची आठवण करण्याचा हा काळ काहीतरी अर्पण करून साजरा करूया!