पंखांमध्ये बळ देण्या…

0
178
  • पौर्णिमा केरकर

शिक्षण आणि संस्कार यांची अशी आदर्श परंपरा ज्या मातीत रुजली आणि प्रवाहित राहिली, त्याच मातीतील आजचे शिक्षणाचे स्वरूप पाहता निराश व्हायला होते. आखून दिलेल्या चौकटीतील गुणांची टक्केवारी मुलांची संवेदनशीलता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास मारून टाकते.

माझे वडील शिक्षक…. भाऊही शिक्षक… नवराही शिक्षकीपेशातील! ‘शिक्षक’ या शब्दाला असलेले दिव्यत्व मी लहानपणापासून अनुभवत आलेली आहे. त्यामुळे न कळत्या वयापासून मनाच्या हळव्या कोपर्‍यात ‘शिक्षक’ होण्याचेच स्वप्न मी बाळगलेले होते. सुदैवाने ते पूर्णत्वास आले आणि जगणेच अर्थपूर्ण झाले. गोवा पोर्तुगिजांच्या जोखडाखाली होता. त्याकाळी माझ्या वडिलांनी वाड्यावरील अनेक मुलांना हाताशी धरून ज्ञानदानाचे पुण्यकर्म केले होते. ही त्यांची समाजभावना होती. पेडणे तालुक्यातील एका दूरच्या- महाराष्ट्राच्या एका सीमेवरील खेड्यात- पालयेसारख्या छोट्या गावात त्यांचे त्या परिस्थितीतील हे मोठे काम होते. परंतु आपण काहीतरी मोठे आणि जगावेगळे काम करीत आहोत हा आव त्यांनी कधीही आणला नाही. त्यांचे काम काही पैशांच्या मोबदल्यात नव्हते, तर स्वतः मुंबईत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी नवीन विचारधारा आत्मसात केली होती.

शिक्षण, वाचन, सांस्कृतिक उपक्रम, नाटकांतील सहभाग, लेखन या सर्व गोष्टींत त्यांचा व्यासंग असल्याने समाजमनात त्यांनी सन्मानाचे स्थान मिळविले, आणि ते शेवटपर्यंत टिकवूनही ठेवले. नियमित वर्तमानपत्रांचे वाचन स्वतः करणे व आमच्याकडूनही न चुकता वाचून घेणे हा क्रम काही त्यांनी कधी चुकविला नाही. त्यामुळेच तर अगदी बालपणापासून वाचनाची आवड मनात रुजली. ती टीकूनही राहिली. वर्षे भराभर निघून गेली. गोवा मुक्तीनंतर मग दादांना म्हणजे वडिलांना प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पुढे माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक अशी बढती घेऊन निवृत्तीपूर्वी गावातच संत सोहिरोबानाथ आंबिये वाचनालयात काम सांभाळले. दादांचा सर्वच प्रवास जवळून अनुभवताना त्यांच्यातील स्वयंशिस्त आणि करारी बाणा अधिक भावला.

पेडण्यातील केरी गावात पालयेहून पायी चालत जाताना डोंगर ओलांडून ते जायचे. परत त्याच मार्गाने यायचे. शाळेत नियोजित वेळेत पोहोचायचे याकडे कटाक्षाने लक्ष! त्यासाठी दुपारच्या जेवणाची वेळ त्यांनी पक्की केली होती. शिजवलेले आणि ताटातले अन्न बाहेर टाकता कामा नये हा त्यांचा दंडक होता. तशी शिस्त त्यांनी संपूर्ण घराला लावली होती. विद्यार्थ्यांच्या घराला भेटी देणे, परीक्षेच्या वेळी आजारी असलेला एखादा विद्यार्थी किंवा इतर काही कारणांमुळे त्याला परीक्षेला बसता आले नाही तर त्याच्या घरी जाऊन परीक्षा घ्यायचे. त्याचे वर्ष वाया जाऊ देत नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पुढचे दरवाजे खुले झाले. ज्यांना या गोष्टीचा फायदा झाला त्यांच्या आठवणीत हे प्रसंग आजही आहेत. शीलवान, क्षमाशील आणि कर्तृत्ववान या तीन तत्त्वांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात उपजतच असल्याने त्यांचा आदर्श नजरेसमोर होता. पांडुरंग मास्तर- मास्तराची बायको ‘मास्तरीण’ आणि ‘पांडुरंग मास्तरांची मुले’ असे बिरुद आमच्या सर्व कुटुंबाला दादांच्या अंतःकरणातील सच्चा शिक्षकामुळेच प्राप्त झाले. फक्त शाळा आणि घर असा त्यांचा एकसुरी प्रवास कधीच नव्हता. सार्वजनिक शारदोत्सव असो अथवा साक्षरतेचे अभियान… त्यात त्यांनी जीव ओतला. मुंबईत असताना अनेक नाटकांत काम केले. नाट्यकलाकार आणि नाट्यदिग्दर्शक म्हणून नाव प्रस्थापित केले. शेवटच्या क्षणापर्यंत नाटकांचे दिग्दर्शन गावातील नाटकासाठी तर केलेच, त्याबरोबर शेजारच्या गावी जाऊनही दिग्दर्शन केले. रात्रभर जागरणे करून परत वेळेत शाळेत जाणे, गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात सहभाग घेऊन आपले योगदान दिले.

गावात सातवीनंतर शाळेची सोय नव्हती याची जाणीव दादांना होती. पुढील शिक्षणासाठी शेजारच्या गावात जावे लागायचे. ही स्थिती हेरून समवयीन विचारांच्या मित्रमंडळीना घेऊन ‘श्री भूमिका शैक्षणिक संस्थे’ची स्थापना केली. गावातील देवस्थानाचे काम असो किंवा सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम- दादांचा सहभाग नेहमीच महत्त्वाचा असे. अडलेल्या नडलेल्यांना आर्थिक मदत केली. एक शिक्षक या नात्याने मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली.

प्रतिकूल परिस्थितीत गोवा मुक्तीपूर्वीपासून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य सुरूच ठेवले होते. गोवा मुक्तीनंतर त्याला सरकारी आर्थिक पाठबळ लाभले. त्यांचा करारी, आत्मविश्वासू बाणा, नजरेतील भेदकता, अंतःकरणातील ऋजुता आणि प्रामाणिकपणातून प्रतिबिंबित होणारा स्वाभिमान त्यांच्या व्यक्तित्वातून सहजपणे जाणवतो. गांधीजींच्या विचारावर निष्ठा असलेल्या दादांनी आयुष्यभर सुती पांढर्‍या रंगाचेच कपडे वापरले. सदरा आणि लेहंगा- तेही फक्त दोनच जोड. ते खराब झाले की नवीन शिवायचे. दोन रुमाल, दोन विजारी. धुवून स्वच्छ करून खराब होईपर्यंत त्यांचा वापर करीत. ताटात कमीच अन्न, त्यात पालेभाजी हवीच हा कटाक्ष होता. बाजारात जाताना कपड्याची पिशवी सोबत घेऊन जाण्याची सवय त्यांची कधीच मोडली नाही. त्याचबरोबर आम्ही सर्व भावंडे वयाने वाढत गेलो तरीही देवळाकडून, बाजारातून, तसेच बाहेरगावाहून घरी येताना ते कधीच रिकाम्या हाताने आले नाहीत. पेपरमिंट, गड्डे, मेरी-पार्ले बिस्कीट आमच्यासाठी आणायचे. लिंबाच्या फोडीच्या आकाराची पेपरमिंटची आंबटगोड चव आजही जिभेवर रेंगाळत आहे. आपल्या मुलांना सोन्याचे दागिने न करता विचारांचे, आत्मविश्वासाचे धडेच त्यांनी दिले. पूर्वी शाळा आणि शिक्षक ही दोन महत्त्वपूर्ण साधने होती समाज घडविण्याची. शिक्षक, गुरू समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व. त्याच्या भोवती पावित्र्याचे, सांस्कृतिक संचिताचे, अध्यात्माचे वलय होते. आपल्या देशाला तर अशा गुरूंची, शिक्षकांची एक मोठी परंपरा लाभली आहे.

ज्यांची नावे आजही हृदयावर कोरली गेलेली आहेत अशा असंख्य व्यक्तिमत्वांनी या भूमीचा वैचारिक पाया प्रगल्भ केला. आमच्या पिढीपर्यंतच्या व्यक्तिमत्त्वांना मराठी प्राथमिक शाळेत गुरुजींनी, बाईंनी शिकविलेल्या कविता अजूनही आठवणीत असतील. एक पाटी आणि पुस्तक, पेन्सिल पिशवीत भरून शाळेत जायचे. मैलोन् मैल चालत जाऊन अनेकांनी जसे शिक्षण घेऊन स्वतःला घडविले, तसेच हलाखीच्या परिस्थितीत कधी वार लावून तर कधी मध्यरात्रीनंतर रस्त्यावरील दिव्याखाली बसून शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम, साने गुरुजी ही अवघी काही महान नावेच नजरेसमोर ठेवली तरी शिक्षण, संस्कार, समाज यांचे नाते अधोरेखित होते. शिक्षण आणि संस्कार यांची अशी आदर्श परंपरा ज्या मातीत रुजली आणि प्रवाहित राहिली, त्याच मातीतील आजचे शिक्षणाचे स्वरूप पाहता निराश व्हायला होते. आखून दिलेल्या चौकटीतील गुणांची टक्केवारी मुलांची संवेदनशीलता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास मारून टाकते. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर मला माझे वडील आठवले ते याचसाठी! शिक्षणाची कोणतीच सुविधा गावात नसताना त्यांनी गरज ओळखून पैशांची अपेक्षा न बाळगता वाड्यावरील देवाच्या मांगरात मुलांना साक्षरतेचे धडे दिले. परीक्षेच्या काळात एखादं दुसरा विद्यार्थी आजारी पडला तर स्वतःच्या जबाबदारीवर त्या-त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांनी परीक्षेसंदर्भात कधी धीर दिला तर कधी पेपर लिहून घेतले.

शाळेत शिकविण्याबरोबरच समाजातील त्यांचा सक्रिय वावर ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा होती. आज शिक्षकीपेशा हा भरपूर सुट्टी आणि भरमसाठ पगार मिळवून देणारा आहे म्हणूनही अनेकांचे लक्ष या पवित्र पेशाकडे वळले असतीलही. सर्व बाजूंनी विविध तर्‍हेने शिक्षकांविषयी बोलले जाते आहे. त्यात नकारात्मकता अधिक आहे. मात्र स्वतः सतत शिकत राहिल्याखेरीज कोणताही शिक्षक खर्‍या अर्थाने कधीही शिकवू शकत नाही.

स्वतःची वात तेवत ठेवू शकणारा दीपच दुसर्‍या दिव्याला प्रकाशाचे दान करू शकतो. जो शिक्षक आपल्या विषयात नव्याने शिकण्याजोगे काही उरले नाही असे मानून पुस्तक मिटतो, जो आपल्या ज्ञानमार्गावर जिज्ञासेने, जिवंतपणे वाटचाल करीत नाही, जो शिक्षक विषयाची तीच तीच पुनरावृत्ती करतो, तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर फक्त ज्ञानरूपी ओझ्याचा ढीग घालून त्याला चेपून टाकतो. असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात चापल्य निर्माण करू शकत नाही, हे रवींद्रनाथ टागोरांचे विचार दादा आपल्या उभ्या हयातीत तंतोतंत जगले. मीही त्याच विचारात वाढले, विकसित झाले… एका शिक्षकाची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहेच. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत दादांची हीच प्रेरणा पंखांमध्ये बळ देण्यास कारणीभूत ठरली.