दिल्ली भेटीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल

0
11

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> पक्षांतर केलेल्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा व इतर आमदारांना घेऊन नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अजून निश्‍चित झालेली नाही. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांनी केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर निर्णय घेतला जाणार आहे, राज्य मंत्रिमंडळात तूर्त फेरबदल केला जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल भाजप गाभा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, कॉँग्रेस पक्षातून भाजपमध्ये केलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळात सासष्टी तालुक्याला अजूनपर्यंत प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी घेतली
राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची दोनापावल येथे राजभवनामध्ये काल सकाळी भेट घेतल्याने राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील नव्या राजकीय घडामोडीबाबत राज्यपालांना माहिती दिली. तथापि, मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर चर्चा झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यपालांची भेट ही पूर्व नियोजित होती. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पक्षाच्या हितासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजप सोडून भाजपचे सरकार पाडले होते. हा इतिहास विसरला जाऊ शकत नाही. तथापि, आजच्या परिस्थितीत पक्षाच्या हितासाठी वेगळा निर्णय घेणे गरजेचा होता, असेही तानावडे यांनी सांगितले.

गाभा समितीची तातडीची बैठक
राज्यातील आठ कॉंग्रेस आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशामुळे भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कोअर समितीची तातडीची बैठक भाजप मुख्यालयात काल घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे, बांधकाममंत्री नीलेश काब्राल, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर व इतरांनी उपस्थिती लावली.

या बैठकीला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याबाहेर असल्याने उपस्थित नव्हते. या बैठकीत आठ कॉंग्रेसच्या आमदारांच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली. तसेच, भाजपमधील एकंदर परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिली.

… तर कदाचित भाजपमध्ये
प्रवेश दिला नसता ः तानावडे

कॉंग्रेस पक्षातील आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आमदारांनी केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधला होता. कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आपणाकडे आला असता तर त्याला कदाचित विरोध केला असता. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाला मी बांधील आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गाभा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.
‘त्या’ आठ मतदारसंघातील भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आणि संबंधित मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते व प्रमुख कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी घेणार असून त्यांच्यात समन्वय साधला जाणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सांगितले.